लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान शनिवारी संपले आणि विविध वृत्तवाहिन्यांवर ‘एक्झिट पोल’चा पोळा फुटला. देशातील काही प्रमुख वृत्तवाहिन्यांसाठी वेगवेगळ्या संस्थांनी मतदानोत्तर चाचणी केली, त्यासाठी मतदारांच्या प्रत्यक्ष मुलाखती, सामान्य लोकांच्या बोलण्यातून जाणवणारा कौल, विविध सामाजिक समीकरणे, जातींचा निवडणुकीवरील प्रभाव, त्या त्या पक्षाची मतदार संघावर असलेली पकड, मागच्या काही निवडणुकांमध्ये मतदारांचा दिसून आलेला कल, त्यात बदल होण्याची शक्यता असेल तर ती किती प्रमाणात अशा अनेक गोष्टींचा, घटकांचा अभ्यास करीत या संस्थांनी आपापले निष्कर्ष तयार केले आणि वृत्तवाहिन्यांनी ते सादर केले. या ‘एक्झिट पोल’चा इतिहास बघता बरेचदा यातून निघालेले निष्कर्ष साफ चुकल्याचेही दिसून आले आहे आणि बरेचदा अंतिम आकडेवारीशी ते बर्याच प्रमाणात मिळतेजुळतेही सिद्ध झाले आहेत. हे निष्कर्ष काढण्यासाठी अवलंबिली जाणारी पद्धत भलेही शास्त्रीय असली तरी शेवटी प्रत्येक मतदाराचे मत विचारल्या जाऊ शकत नाही, पाच ते दहा टक्के मतदारांचा कौल शंभर टक्के मतदारांचे प्रतिनिधीत्व करू शकत नाही, शिवाय जे लोक पाहणी दरम्यान आपले मत व्यक्त करीत असतात ते सगळेच प्रामाणिकपणे खरे बोलत असतील असेही म्हणता येत नाही, याचा अर्थ या पाहण्यांमध्ये त्रुटी राहू शकते, अंदाज चुकू शकतात, परंतु त्यानंतरही जनमानसाचा एकूण सरासरी कल अशा पाहण्यातून दिसून येतो, असे म्हणता येऊ शकते. यावेळी अशी पाहणी करणार्या बहुतेक सगळ्या संस्थांनी या निवडणुकीत भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला आहे.
भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा पार करेल, असेही या संस्थांच्या पाहणीचा निष्कर्ष आहे. विरोधी आघाडीला अर्थातच हे निष्कर्ष मान्य नाहीत आणि त्यासाठी त्यांच्याकडे तसे सबळ कारणही आहे. प्रचारादरम्यान प्रत्यक्ष जमिनीवर काम करणार्या विरोधी आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देशभर मोदी सरकारच्या विरोधात वातावरण दिसत होते. विरोधी नेत्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, छोट्या पडद्यावर ते दिसूनही येत होते. बिहार, उत्तरप्रदेश, प.बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक सारख्या मोठ्या राज्यांमध्ये विरोधी आघाडी अतिशय ताकदीने उभी असल्याचेही दिसून आले. या पृष्ठभूमीवर दोन्ही आघाड्यांमध्ये अतिशय चुरशीची लढत अपेक्षित होती आणि तसेच परिणाम ‘एक्झिट पोल’मध्ये दिसणे अपेक्षित होते, परंतु बहुतेक सगळ्या संस्थांनी भाजप आघाडीला अगदी एकतर्फी बहुमत मिळत असल्याचे सांगितले, त्यामुळेच या पाहण्यांमध्ये काही गडबड तर झाली नाही ना, अशी शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते यावेळी देशभरातील किमान ८० ते १०० जागा अशा होत्या की त्या ठिकाणी कोण विजयी होईल, हे सांगता येणे अतिशय कठीण होते, परंतु त्यापैकी बहुतेक जागांवर भाजप आघाडी विजयी होत असल्याचा निष्कर्ष या संस्थांनी काढला. हा निष्कर्ष जर उद्या चुकीचा निघाला तर आज ३५०चा आकडा गाठणारी भाजप आघाडी २५० किंवा त्यापेक्षाही कमी जागांवर येऊ शकते आणि त्याचवेळी ‘इंडिया’ आघाडी २७२च्या पुढचा टप्पा गाठू शकते. कदाचित त्यामुळेच हे सगळे निष्कर्ष धुडकावत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आम्ही यावेळी २९५ जागा जिंकत असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला असावा.
विशेषत: बिहार, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि प.बंगाल या राज्यांमध्ये ‘एक्झिट पोल’ने दाखविलेल्या आकड्यांमध्ये मोठा फेरबदल होऊ शकतो. या राज्यांमध्ये अतिशय चुरशीच्या लढती होत असतानाही एकाही संस्थेने विरोधी आघाडीला झुकते माप दिल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे हे निष्कर्ष ठरवून निश्चित केले असावेत, या तर्काला बळ मिळत आहे. किमान एक-दोन संस्थांनी तरी काही वेगळे चित्र समोर केले असते तर ही पाहणी निष्पक्ष असल्याचे म्हणता आले असते, परंतु बहुतेक सगळ्या संस्थांनी, केवळ एका संस्थेचा अपवाद वगळता जवळपास सारखी आकडेवारी दाखविली आहे. या पृष्ठभूमीवर हा ‘एक्झिट पोल’ नसून ‘मोदी पोल’ आहे, हा विरोधकांचा आरोप अगदीच फेटाळता येणार नाही. प्रत्यक्ष मतमोजणीनंतर खरे चित्र समोर येणार आहेच, परंतु मतमोजणीतही काही गडबड केली जाऊ शकते, ही भीती विरोधकांना आहे. मतदानानंतर काही दिवसांनी मतदानाची वाढलेली टक्केवारी घोषित करून निवडणूक आयोगानेच विरोधकांच्या शंकेला बळ दिले आहे. एकमात्र खरे की ‘एक्झिट पोल’चे आकडे सत्यात उतरले तर या देशातील निवडणूक प्रक्रियेवर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, सोबतच या देशातील लोकशाही देखील प्रश्नांकित होईल.