महाराष्ट्रातील अर्ध्या जागांवरचे मतदान आटोपले आहे. उरलेल्या जागांवरील मतदान दोन टप्प्यात होणार आहे. मुख्य संघर्ष महायुती आणि महाआघाडीत आहे, खरे तर निवडणुकीपूर्वी महाआघाडीला समन्वय स्थापित करणे कठीण जाईल, आघाडीतील पक्ष एकमेकांना मदत करतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती, त्या तुलनेत महायुतीला अधिक अनुकूल वातावरण असल्याचेही बोलले जात होते; परंतु पहिल्या तीन टप्प्यातील मतदानानंतर आणि उर्वरित दोन टप्प्यांचे मतदान बाकी असताना आघाडीपेक्षा महायुतीलाच परस्पर समन्वय स्थापित करणे कठीण जात असल्याचे चित्र समोर येत आहे. एकत्र येऊन प्रतिकार करण्याखेरीज महाआघाडीकडे पर्याय नव्हता, त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतभेद असले तरी अनेक ठिकाणी महाआघाडीचे नेते, कार्यकर्ते एकदिलाने काम करीत असल्याचे दिसले. विशेषत: मुस्लीम आणि दलित समाजाला आपल्याकडे खेचून घेण्यात आघाडीचे नेते यशस्वी झाल्याचे दिसले. हीच परिस्थिती कायम राहिली तर उर्वरित २४ जागांवरही महाआघाडी महायुतीसमोर मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. त्यातच महायुतीतील नेत्यांमध्ये अजूनही म्हणावा तसा समन्वय दिसत नाही. नाशिकमध्ये युतीचे आमदार सुहास कांदे यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर थेट टीका करीत भुजबळ नाशिकचा राग शेजारच्या मतदारसंघामध्ये काढत असल्याचे म्हटले. दिंडोरीत छगन भुजबळ आणि अजित पवार गटाचे इतर नेते तुतारीसाठी काम करीत असल्याचा उघड आरोप सुहास कांदेंनी केला आहे.
दिंडोरीमध्ये भाजपच्या डॉ. भारती पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि कांदा प्रश्नामुळे त्यांची बरीच अडचण होत असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी त्यांनी छगन भुजबळांची भेट घेऊन दिंडोरीत सहकार्य करण्याची विनंती केली होती; परंतु त्यानंतरही दिंडोरीत अजित पवार गट तुतारीसाठी काम करीत असल्याचा आरोप होत आहे. छगन भुजबळ नाशिकमध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, त्यांच्या उमेदवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील समर्थन दिले होते; परंतु शिंदे गटाने नाशिकचा मुद्दा प्रतिष्ठेचा करीत ही जागा आपल्याकडे खेचून घेतली. परिणामी भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याचा परिणाम नाशिकसह लगतच्या दिंडोरी मतदारसंघातही जाणवत आहे. जळगाव आणि रावेरमध्येही भाजपच्या उमेदवारांना युतीतील इतर पक्षांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचे चित्र समोर येत होते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत गुलाबराव पाटलांसारखे वजनदार मंत्री तटस्थ होते. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने युती असतानाही बंडखोर उमेदवार उभे करून आपल्याला अडचणीत आणले होते, याची खंत त्यांच्या मनात कायम होती; परंतु आता विलंबाने का होईना ते युतीच्या उमेदवारासाठी सक्रिय झाले आहेत. रावेरमध्ये खडसे कुटंबाशी राजकीय वैर असलेल्या चंद्रकांत पाटलांची समजूत काढताना युतीच्या नेत्यांना खूप घाम गाळावा लागला. अखेर अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसे यांची भेट झाली आणि चंद्रकांत पाटलांनी नाराजी बाजूला ठेवत रक्षा खडसेंसाठी प्रचाराला सुरुवात केली.
नंदुरबारमध्ये हिना गावित यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती, ती दूर करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना बरेच प्रयत्न करावे लागले; परंतु शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी अद्यापही त्यांच्या प्रचारात सक्रिय झालेले नाहीत. डॉ. विजयकुमार गावित यांच्यासोबत रघुवंशी यांचा नेहमीच राजकीय संघर्ष राहिला आहे. तिकडे मुंबईत एका मुलाखतीत रवींद्र वायकर यांनी आपण केवळ तुरुंगवास टाळण्यासाठी मोठ्या जड अंत:करणाने ठाकरे कुटुंबापासून दूर गेलो, असे विधान केल्याने खळबळ माजली आहे. रवींद्र वायकर शिंदे गटाकडून मुंबईत लढत देत आहेत आणि त्यांचा सामना ठाकरे गटाच्याच उमेदवारासोबत आहे. दबावामुळे आपल्याला पक्षांतर करावे लागले हे त्यांचे विधान त्यांनाच अडचणीत आणणारे ठरत आहे. एकंदरीत मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या पट्ट्यात होऊ घातलेल्या उर्वरित निवडणुकीत महायुतीला पक्षांतर्गत तसेच मित्रपक्षातील अंतर्विरोधाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असल्याचे दिसते. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने प्रचारातून हात आखडता घेतल्याची शिंदेसेनेची तक्रार आहे. शिंदेसेनेच्या या नाराजीचा फटका शेजारच्या जालना मतदारसंघात भाजपला बसू शकतो. एकंदरीत महाआघाडीच्या तुलनेत महायुतीला ही निवडणूक अधिक जड जात असल्याचे चित्र समोर येत आहे.