न.मा. जोशी
व्होटरने सत्तांतर घडवले नाही; पण लोकतंत्र मजबूत केले. अहंकारी, उन्मादी, धर्मांध नेत्यांना आत्ममंथन करण्यास बाध्य केले आहे. ‘मोशा’ची खुमारी उतरविणार्या, मोदींच्या अजय प्रतिमेचे वस्त्रहरण व मोदी युगाच्या अंताची सुरुवात करणार्या, तसेच विरोधी पक्षांना संजीवनी देणार्या व्होटरला आपण ‘थँक्यू मिस्टर’ म्हटलेच पाहिजे.
काँग्रेसची लोकसभेत शंभरी!
काँग्रेसचे लोकसभेत ९९ सभासद असले, तरी ही संख्या शंभरी गाठणार असल्याचे संकेत आहेत. राहुल गांधी रायबरेली आणि वायनाडमधून निवडून आल्याने एका जागेचा राजीनामा देतील त्यामुळे ही संख्या ९८ होईल. बिहारमध्ये पप्पू यादव यांनी आपली जन अधिकार पार्टी काँग्रेसमध्ये विलीन केली आहे. ते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांची पत्नी रंजीता रंजन काँग्रेसची राज्यसभा खासदार आहे. पप्पू यादव लवकरच काँग्रेस प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्रात सांगली मतदारसंघातून वसंत दादा पाटलांचे नातू अपक्ष उमेदवार विशाल पाटील ७१ हजार मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसला पत्र लिहून पाठिंबा दिला आहे. याचा अर्थ काँग्रेस लोकसभेत शंभरी गाठणार हे स्पष्ट आहे.
काँग्रेसचे लोकसभेत ९९ सभासद असले, तरी ही संख्या शंभरी गाठणार असल्याचे संकेत आहेत. राहुल गांधी रायबरेली आणि वायनाडमधून निवडून आल्याने एका जागेचा राजीनामा देतील त्यामुळे ही संख्या ९८ होईल. बिहारमध्ये पप्पू यादव यांनी आपली जन अधिकार पार्टी काँग्रेसमध्ये विलीन केली आहे. ते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांची पत्नी रंजीता रंजन काँग्रेसची राज्यसभा खासदार आहे. पप्पू यादव लवकरच काँग्रेस प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्रात सांगली मतदारसंघातून वसंत दादा पाटलांचे नातू अपक्ष उमेदवार विशाल पाटील ७१ हजार मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसला पत्र लिहून पाठिंबा दिला आहे. याचा अर्थ काँग्रेस लोकसभेत शंभरी गाठणार हे स्पष्ट आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर कोणत्याही सुज्ञ नागरिकाच्या मुखातून ‘थँक्यू मिस्टर व्होटर’ हे शब्द निघाल्याशिवाय राहणार नाहीत, कारण या व्होटरने या देशाला हैती देश होण्यापासून वाचवले आहे. मागच्या अंकात मी लिहिले होते की ‘उत्तरी अटलांटिक महासागराच्या मध्ये, हिस्पानियोला द्वीपच्या पश्चिमी भागात हैती नावाचा देश आहे. तिथल्या पंतप्रधानांनी स्वतःला अवतार मानले आहे. अंधभक्तांची तिथेही कमी नाही. हैती आज रसातळाला गेलेला देश आहे!’ मानवतेचे महत्त्व नाकारून परमेश्वराचा अवतार मानणार्या नेत्याला व्होटरने ठिकाणावर आणून वैचारिक साम्य अजिबात नसलेल्या, ज्यांना जेलची हवा दाखवली त्या चंद्राबाबू नायडू आणि ज्यांच्या मित्रांच्या घरी इन्कम टॅक्सच्या धाडी टाकल्या त्या नितीशकुमार यांच्यासमोर केवळ सत्तेसाठी नाक घासत, कमर तुटेपर्यंत वाकत, ‘अब हम भी मुजरा करेंगा’ म्हणायला भाग पाडले. जिथे फुले वेचली तिथे गोवर्या वेचण्याची पाळी आणली. ‘एक अकेला सब पर भारी, त्यालाही दिला दणका भारी’,’नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’ हाच या देशाचा स्थायीभाव आहे हे दाखवून दिले.
व्होटरने सत्तांतर घडवले नाही; पण लोकतंत्र मजबूत केले. अहंकारी, उन्मादी, धर्मांध नेत्यांना आत्ममंथन करण्यास बाध्य केले आहे. ‘मोशा’ची खुमारी उतरविणार्या, मोदींच्या अजय प्रतिमेचे वस्त्रहरण व मोदी युगाच्या अंताची सुरुवात करणार्या, तसेच विरोधी पक्षांना संजीवनी देणार्या व्होटरला आपण ‘थँक्यू मिस्टर’ म्हटलेच पाहिजे. या व्होटरने संविधान, लोकशाही आणि संघात्मक शासन पद्धतीला वाचवले आहे. अमेरिकेच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’लासुद्धा म्हणावे लागले की मोदींची ‘अजय’ छबी संपली आहे. बीबीसीने म्हटले आहे, की काँग्रेससाठी ही निवडणूक आश्चर्यकारक पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. द गार्डियन, वॉल स्ट्रीट जर्नल, चायना डेली आणि टाईम पत्रिकेने लिहिले आहे, की भारतात लोकतंत्र जिवंत असून या निवडणुकीने मोदी आणि भाजपला जबरदस्त झटका दिला आहे. जॉन हापकिन्स युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर देवेश कपूर यांनी म्हटले आहे, की व्होटरने स्वविवेकाने मतदान केले अन्यथा मोदींचा उधळलेला वारू थोपवणे कठीण होते. पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचे नैतिक धैर्य मोदींrमध्ये नाही, आपल्याला जनतेने झिडकारले हा जनादेश स्वीकारायला मोदी तयार नाहीत. संघ किंवा भाजपच्या एकाही नेत्यांमध्ये मोदींना राजीनामा मागण्याची धमक नाही हे व्होटर जाणून आहे. व्होटरने दाखवून दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचे गॅरंटी देणारे, विश्वगुरू, मसीहा हे नाणे म्हणजे ‘खोटा सिक्का है’. मुंगी हत्तीला बेचैन करू शकते हे सिद्ध केले आहे.
देशात लॉकडाऊन, मणिपूर, महिला कुस्तीगीर, शेतकरी आंदोलन, अग्निवीर, अशा अनेक समस्या होत्या, ज्यात सर्वसामान्य जनता त्रस्त होती आणि आहे; पण नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने यांवर कधीच जनतेप्रती संवेदनशीलता दाखवली नाही. आता जनतेने भाजपला उत्तर दिले आहे. व्होटरला, मोदी, की संविधान?, मोदी, की लोकशाही?, चक्रवर्ती- अवतारी राजाची मक्तेदारी, की संसदीय व्यवस्था?, तथाकथित सर्वज्ञ नेत्याची केंद्रीकृत सत्ता, की विकेंद्रित सरकार?, मनमानी, की नियंत्रण आणि संतुलन?, पोलीस, की कायदा?, समता, की विषमता?, निर्भयता, की भय?, बुद्धी, की मूर्खपणा?, अहंकार, की नम्रता? अहंकार, की निगर्विता? हा निर्णय घ्यायचा होता आणि त्याने योग्य निर्णय घेतला. संविधान आणि लोकशाही वाचवली. थँक्यू मिस्टर व्होटर.
स्वबळावर भाजपला सत्ता मिळणार नाही, अशी व्यवस्था करून व्होटरने आपल्याला काय हवे ते दाखवून दिले. ज्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सतत युवराज, शहजादा आणि पप्पू अशी संभावना करत, काँग्रेस आता संसदेत प्रेक्षक गॅलरीतच दिसेल, अशी खिल्ली उडवणार्या, ‘मोशा’ला व्होटरने राहुल गांधींच्या मार्फतच चपराक लगावली. रायबरेली आणि वायनाड दोन्ही मतदारसंघांतून राहुल गांधी पावणेचार लाख मताधिक्याने निवडून आले, अमेठीमध्येसुद्धा वाचाळ बोलघेवड्या ‘विस्मृती’ इराणीचा पराभव करीत गांधी कुटुंबीयांचे मित्र काँग्रेस नेते किशोरीलाल शर्मा निवडून आले, तर दोनदा पंतप्रधान राहिलेल्या मोदींना वाराणसीत ‘मां गंगा मैया’ने बुडता बुडता वाचवले, वाराणसीमधून मोदी केवळ दीड लाखाच्या फरकाने निवडून आले. मी रामाचे बोट धरून आणले, मी त्याची प्राणप्रतिष्ठा केली, असा अहंकार मिरवल्याने अयोध्येत रामानेच भाजपाच्या लल्लू सिंगचा ‘हे राम’ म्हणत ‘लल्लू’ केला आणि सपाचे अवधेश हे ‘अ’वध असल्याचे सिद्ध केले. विरोधकांना कस्पटासमान मानून त्यांची अवहेलना करणे, उपहास करणे, खिल्ली उडवणे, काँग्रेसमुक्त आणि विरोधी पक्ष मुक्त भारत, अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा उराशी बाळगणे अशा पंतप्रधानपदाला न शोभणार्या वृत्तीचा जनतेने धिक्कार केला आहे.
विकाऊ, विश्वासार्हता गमावलेल्या गोदी मीडिया आणि ‘लापता जंटलमन’ आणि ‘कागदी शेर’, अशी टीका झालेला निर्वाचन आयोग आता तरी सत्याची कास धरेल आणि सत्ताधीशांची लज्जास्पद लाचारी सोडेल, अशी आशा करणे व्यर्थ ठरेल काय? निवडणुका सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईला सुरुवात झाली. काँग्रेसची खाती जप्त झाली, इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून अब्जावधींचा भ्रष्टाचार केला, बाँड्सची माहिती देण्यास टाळाटाळ झाली. या सर्व गोष्टींमुळे जनतेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण झाले, जे निवडणुकीच्या निकालात दिसून आले.
इंदूरमध्ये भाजपच्या उमेदवाराने जागा वाचवली; पण नोटाला ज्या प्रकारे दोन लाख अशी ऐतिहासिक मते मिळाली, त्यातून भाजपलाही संदेश गेला की, तोडफोडीचे राजकारण जनतेला मान्य नाही. भाजपवाले अल्पसंख्याकांविरोधात वक्तव्ये करत राहिले. हैदराबादमध्ये भाजपच्या महिला उमेदवार माधवी लता यांनी मशिदीच्या दिशेने बाण सोडण्याचे प्रतिकात्मक कृत्य केले. मात्र, जनतेने असदुद्दीन ओवेसीलाच चार लाखांच्या मताधिक्याने निवडून दिले.
या निवडणुकांमध्ये देशातील व्होटरने खर्या अर्थाने लोकशाही आणि संविधान वाचविण्याचे काम केले आहे. राहुल गांधींच्या शब्दात ‘त्यांनी राजकीय शहाणपणा दाखवला आहे’. मात्र, आता उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये समीकरणे बदलताना दिसत आहेत. भारत जोडो यात्रांचे दोनदा आयोजन करून राहुल गांधींनी देशात एक नवीन प्रकारची राजकीय जागृती निर्माण केली आणि त्यानंतर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने ही जाणीव आणखी पसरवली. अथक परिश्रम करून सर्व २८ पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी देशात पुन्हा एकदा मोकळा श्वास घेता येईल, असे वातावरण निर्माण केले. आता पुन्हा लोकशाहीचे हृदयाचे ठोके ऐकू येत आहेत आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे निर्गमन होताना मुनव्वर रानाच्या शब्दात व्होटर म्हणत आहे,
‘बस तू मिरी आवाज़ से आवाज़ मिला दे,
फिर देख कि इस देश में क्या हो नहीं सकता.’
८८०५९४८९५१