ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे. निवडणुकीचे निकाल काहीही लागोत किमान महाराष्ट्रात तरी मोठी उलथापालथ नक्की होईल. लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित शरद पवारांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, अर्थात त्या नंतरही महाविकास आघाडीचे स्वरूप कायमच राहील. एकत्रित काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट परस्पर सहकार्यातून महाविकास आघाडीचे राजकारण पुढे चालवतील. परंतु लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही तर काँग्रेस सोबतची आघाडी पुढे सुरू ठेवायची की पुन्हा महायुतीकडे परतायचे हा प्रश्न उद्धव ठाकरे समोर नक्कीच उपस्थित होईल. त्यातच पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना काँग्रेस सोबत जाण्याऐवजी आपल्याकडे येण्याचा प्रस्ताव देऊन ठेवलेला आहेच.
खरे तर तसा प्रस्ताव त्यांनी शरद पवारांसमोरही ठेवला आहे, परंतु राज्यातील राजकारण द्विध्रुवीय करण्याची पवारांची तयारी दिसते.त्यासाठीच एकत्रित काँग्रेस अधिक सशक्तपणे उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, तसे झाल्यास कदाचित महायुती सरकारच्या विरोधातील जनमत काँग्रेसच्या मागे एकवटू शकते. त्यामुळे मोदींचा प्रस्ताव शरद पवार स्वीकारण्याची शक्यता नाही. ईकडे महायुतीत देखील मोठे बदल घडून येऊ शकतात. सर्वाधिक मोठ्या बदलाची चर्चा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसंदर्भात सुरू आहे. शिवसेना खरी कोणाची हा मुद्दा अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या मुद्द्याचा निकाल लागलेला असेल आणि शिवसेना एकनाथ शिंदे कडेच कायम राहिल्यास सध्या महायुतीसोबत असलेले राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व आपल्याकडे घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातून शिवसेनेचे बळ तर वाढेलच शिवाय जागा वाटपात देखील शिवसेना मोठा हिस्सा मागू शकते. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या नंतर समोर येणार्या राजकीय परिस्थितीवर होऊ शकतो. कदाचित भाजप मोठा पक्ष ठरला तरी इतर दोन पक्ष भाजपवर दबाव आणून काही वेगळे राजकारण घडवू शकतात. एक मात्र निश्चित की येत्या चार जून नंतर महाराष्ट्रात राजकीय बदलाचे वारे वेगाने वाहू लागतील.