मागच्या वेळी केरळच्या वायनाडमधून विजय मिळवित गांधी घराण्याची प्रतिष्ठा राखण्यात यशस्वी ठरलेल्या राहुल गांधींनी यावेळी मागचा अनुभव लक्षात घेता अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात वायनाडमधूनही ते रिंगणात आहेतच. वास्तविक अमेठी हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला समजला जातो. मागच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या मतदारसंघातून गांधी घराण्याचा उमेदवार सातत्याने निवडून येत होता; परंतु मागच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना भाजपच्या स्मृती इराणींकडून पराभव स्वीकारावा लागला होता. उत्तर भारतातील पक्षाचा प्रभाव टिकवायचा असेल, वाढवायचा असेल तर गांधी घराण्यातील कुणी तरी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढविणे अपरिहार्य ठरते. यापूर्वी थेट नेहरूंपासून गांधी घराण्यातील सदस्यांनी उत्तर प्रदेशमधून सातत्याने निवडणूक लढली आहे. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी आणि संजय गांधींना उत्तर प्रदेशातून पराभवाचा सामना करावा लागला होता; परंतु त्यांनी उत्तर प्रदेशला पर्याय शोधला नाही, पुन्हा त्याच उत्तर प्रदेशातून त्यांनी लोकसभा जिंकली होती. सोनिया गांधी एकदा चिकमगलूरमधून निवडणूक लढल्या होत्या; परंतु अमेठी आणि रायबरेली या पारंपरिक मतदारसंघातून गांधी घराण्याचा प्रतिनिधी कायमच लोकसभेत प्रवेश करीत आला आहे. मागच्या निवडणुकीत सोनिया गांधी रायबरेलीतून रिंगणात होत्या तर राहुल गांधी अमेठीतून उमेदवार होते; परंतु अमेठीतील वातावरण बदलत असल्याचे पाहून राहुल गांधींनी अमेठीसोबतच केरळच्या वायनाडमधूनही निवडणूक लढविली आणि त्यांची ती भीती खरी ठरली.
अमेठीतून स्मृती इराणींनी राहुल गांधींचा ५५ हजार मतांनी पराभव केला. या पृष्ठभूमीवर उत्तर प्रदेशसोबत जुळलेली पक्षाची नाळ तुटू नये म्हणून यावेळीही राहुल आणि प्रियंका गांधी निवडणूक रिंगणात उतरतील असे बोलले जात होते; परंतु प्रियंका गांधींनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, सोनिया गांधींनी या आधीच राज्यसभेत प्रवेश केलेला होता, त्यामुळे राहुल गांधी कोणत्या मतदारसंघाची निवड करतात याची उत्सुकता होती. भावनिकदृष्ट्या विचार केला असता तर त्यांनी पुन्हा अमेठीतून निवडणूक लढवून मागच्या पराभवाचा बदला घेण्यासोबतच गांधी घराण्याची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करणे अपेक्षित होते; परंतु अमेठीतील वातावरण तितके सुरक्षित नाही हे लक्षात आल्यावर हात दाखवून अवलक्षण करण्याऐवजी तुलनेत अधिक सुरक्षित असलेल्या रायबरेलीतून निवडणूक मैदानात उतरण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. वास्तविक ५५ हजारांचे मताधिक्य हे काही खूप जास्त नाही, राहुल गांधींनी जिद्दीने ही जागा लढविली असती तर त्यांना विजय मिळू शकला असता; परंतु गणित जुळून आले नसते आणि राहुल गांधींना पुन्हा तिथून पराभव पत्करावा लागला असता तर केवळ गांधी घराण्याच्याच नव्हे तर काँग्रेसच्याही प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला असता. तसेही उत्तर प्रदेशात काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस घटत चालली आहे, त्यात या पराभवाची भर पडली असती तर उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. त्यामुळेच भावनेच्या आधारे विचार न करता राहुल गांधींनी राजकीय विचार करीत रायबरेलीची निवड केल्याचे दिसते. खरे तर राहुल गांधी अमेठीतून पुन्हा लढणार नाहीत याचे संकेत आधीपासूनच मिळत होते.
मागच्या पराभवानंतर राहुल गांधी केवळ दोन वेळा अमेठीत आले. दुसरीकडे स्मृती इराणींनी मात्र तुमच्या खासदाराला भेटण्यासाठी दिल्लीत यावे लागणार नाही, असे आश्वासन देत अमेठीमध्येच स्वत:चे घर बांधले. शिवाय अमेठी लोकसभा मतदारसंघातील आकडेवारीदेखील काँग्रेससाठी फारशी उत्साहवर्धक नव्हती. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अमेठी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाचपैकी एकाही जागेवर विजय मिळविता आला नव्हता. त्या आधीच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची अमेठीतील पाटी कोरीच होती. काँग्रेसची उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आघाडी असली तरी ही आघाडी अमेठीत भाजपला तोंड देऊ शकेल, असा विश्वास काँग्रेस नेतृत्वाला वाटत नसल्याने राहुल गांधींसाठी अधिक सुरक्षित अशा रायबरेलीची निवड करण्यात आली. हा एक धोरणात्मक आणि योग्य निर्णय म्हणायला हरकत नाही. राहुल गांधींना रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागी यश मिळाले तर कदाचित रायबरेलीची राहुल गांधींकडे ठेवून वायनाडमधून प्रियंका गांधींना पोटनिवडणूक लढविण्याची संधी काँग्रेसकडून दिली जाऊ शकते. अशा प्रकारे काँग्रेसला उत्तर-दक्षिण समन्वयदेखील साधता येऊ शकतो.