सर्व पातळ्यांवर आलेले अपयश, संपलेली विश्वासार्हता आणि लोक जागोजागी व्यक्त करत असलेला राग यामुळे आता प्रचारात फक्त चिडचीड दिसते. तेच ते सत्तर वर्षांच्या नावे नेहरू आणि काँग्रेसवर खडे फोडणे, तीच जुनी हिंदू-मुस्लीम भांडणे लावायची चाल आणि आता तर ‘मंगळसूत्र’ वगैरे संबंध नसलेले विषय घेऊन प्रचार. एवढा विषारी आणि असाहाय्य झाल्यासारखा सरकारी पक्षाचा निवडणूक प्रचार या देशाने पूर्वी कधीही पाहिला नव्हता.
सत्ताधारी पक्षाकडून एवढा बोगस प्रचार आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता, अशा प्रतिक्रिया ज्यावेळी मतदारच व्यक्त करतो, त्यावेळी ‘दाल नें कुछ काला है’ याची प्रचिती येते. महाराष्ट्रात येऊन अमित शाह म्हणतात, शरद पवार कृषिमंत्री होते, तेव्हा त्यांनी काय केले? मोदी म्हणतात, सत्तर वर्षांत काँग्रेसने काय केले? पण लोकांनी त्यांना दिलेल्या दहा वर्षांत यांनी काय केले? हे दोघेही सांगत नाहीत. अजूनही नेहरू वाईट, इंदिरा वाईट, राजीव वाईट, राहुल वाईट, संपूर्ण काँग्रेस वाईट, हेच यांचे सगळे भांडवल आहे. देशापुढील आर्थिक योजना काय, यावर कुणीच काही बोलत नाहीत. ‘स्वच्छ भारत’,’नमामि गंगे’,’मेक इन इंडिया’,’अग्निवीर’,’जनधन खाते’, या संपूर्ण फसलेल्या स्वतःच्या योजनांवर एक शब्दही बोलत नाहीत. बरं बोलणार तरी काय? अर्थात दाखवण्यासारखे आहे तरी काय? देशाला ओरबाडून खाल्लेले चारचौघात थोडेच सांगता येणार? नोटबंदीचे वीस टक्के कमिशन कोणी खाल्ले? पीएम केअर फंड हा माहिती अधिकारात न येऊ देता आपल्या सार्वजनिक कंपन्यांकडून तीन हजार कोटी कोणी लाटले? इलेक्टोरल बॉन्डमधून हजारो कोटी कोणी खाल्ले? या घोटाळ्यांबाबत ते काय बोलणार? कुठेच नसलेला अदानी जगातल्या पाच श्रीमंतांमध्ये कसा काय पोहोचला? त्यावर काय बोलणार? क्रूड तेलाच्या किंमती कमी होत असतानाही पेट्रोल ६६ रुपयांवरून १०७ रुपयांवर कसे गेले? ४१० रुपयांचा गॅस अकराशे रुपयांवर कोणी नेला? सर्वत्र वाढलेली महागाई, यावर काय बोलणार? शेतकरी तर पुरता खचवून टाकला. शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या यावर शिंदे-फडणवीस-दादा काय बोलणार? सोयाबीनचा भाव ४२०० आहे, जो मोदींनी शपथ घेताना २०१४ साली होता.
दहा वर्षांत खते, औषधे, बियाणे यांच्या किंमती कुठल्याकुठे वाढल्या आणि उत्पन्न मात्र तितकेच राहिले, यावर बोलण्याची कुणाची हिंमत आहे? कॉर्पोरेट कंपन्यांना १४ लाख कोटींची कर्जमाफी दिली; पण शेतकर्याचे एक रुपयाचे कर्जही माफ केले नाही. २०१९ ला पुलवामाची पोलखोल सत्यपाल मलिकांनी करून वाट लावली. यावेळी तोही हातखंडा चालला नाही. उमेदवारांचा शोध घ्यावा, त्यांची व्यक्तिगत माहिती मिळवावी, त्यांचे कर्तृत्व पाहावे व मग त्यांना मतदान करावे, अशी इच्छा मतदारांना होते; परंतु प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात कोण कोण उभे आहे हे पाहिल्यावर कुणाला मत द्यायचे? शरद पवारांच्या मुलीला मत, एकनाथ शिंदेंच्या मुलाला मत, अजितदादांच्या पत्नीला मत, सुशीलकुमार शिंदेंच्या मुलीला मत, यशवंत जाधव यांच्या पत्नीला मत, विजयकुमार गावित यांच्या मुलीला मत, एकनाथ खडसे यांच्या सुनेला मत, राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलाला मत, गजानन कीर्तीकरांच्या मुलाला मत, नितेश व नीलेश राणेंच्या पिताश्रींना मत, रवी राणा यांच्या पत्नीला मत, संजय धोत्रेंच्या मुलाला मत, संतोष दानवे यांच्या वडिलांना मत, अदिती तटकरे यांच्या वडिलांना मत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातूला मत, स्व. शंकरशेठ वाजेंच्या नातूला मत, स्व. ए. टी. पवारांच्या सुनेला मत, स्व. सुरेश धानोरकर यांच्या पत्नीला मत, स्व. एकनाथ गायकवाड यांच्या मुलीला मत, अशी कितीतरी मोठी यादी समोर येते. मात्र, घराणेशाही व पिढीजात राजकारण, यावर देशभरात चर्चा झाली तर समोर नाव मात्र गांधी घराणे सोडून कोणाचेच येत नाही. अर्थात अनेकांचे वारसदार राजकारणात असले, तरी त्याला आक्षेप असायचे कारण नाही. यातील अनेक वारसदार कर्तबगारदेखील आहेत. त्यांच्यात नेतृत्वाचे गुणदेखील आहे; पण अशा यादीत ‘कॉमन मॅन’ शोधायचा तरी कसा? अनेकांना राजकीय वारसा नाही हे मान्य आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील कोणताही राजकीय वारसा नाही; परंतु राजकारणाच्या या भाऊगर्दीत अलीकडे जी गर्दी होऊ लागली आहे, ती मात्र वारसदारांची आहे हे मान्य करावेच लागेल. त्यामुळे उमेदवारांकडे दुर्लक्ष करून पक्षाची ध्येय धोरणे व त्यांचा कार्यक्रम पाहून मतदान करावे, असे ठरवूनही उपयोग होत नाही, कारण राष्ट्रवादाचा स्वार्थी वापर लोकांच्या लक्षात आला आहे.
अनेक घटनांमुळे राजकीय पक्ष व नेत्यांची विश्वासार्हताच संपलेली आहे. खरोखरच पाकिस्तान- भारत युद्ध सुरू झाले तरी आता लोक म्हणणार हे निवडणुकीसाठी आहे. सर्व पातळ्यांवर आलेले अपयश, संपलेली विश्वासार्हता आणि लोक जागोजागी व्यक्त करत असलेला राग यामुळे आता प्रचारात फक्त चिडचीड दिसते. तेच ते सत्तर वर्षांच्या नावे नेहरू आणि काँग्रेसवर खडे फोडणे, तीच जुनी हिंदू-मुस्लीम भांडणे लावायची चाल आणि आता तर ‘मंगळसूत्र’ वगैरे संबंध नसलेले विषय घेऊन प्रचार. एवढा विषारी आणि असाहाय्य झाल्यासारखा सरकारी पक्षाचा निवडणूक प्रचार या देशाने पूर्वी कधीही पाहिला नव्हता. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या लोकशाहीच्या देशात महागाई, बेरोजगारी, सामाजिक अस्थिरता व शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून ‘मोदाRची गॅरंटी’ या एका विषयावर मोदींची मध्यंतरी झालेली एक मुलाखत हा तर एक विनोदी फार्स ठरला. खरे म्हणजे जे धर्माधारित देशाची स्वप्न दाखवून लोकांना चेकाळून जायला उद्युक्त करतात आणि या पेटलेल्या आगीवर राजकीय पोळी भाजून घेतात, त्यांची लेकरे मात्र या भानगडीत कधीही पडत नाहीत. ती इंग्लंड, अमेरिकेत उच्चशिक्षित होऊन तिकडेच स्थायिक झालेले असतात. त्यांचे ‘द्वेषभक्त’ बाप तिथून मोबाईलवर मेसेज आणि पोस्ट करून लोकांना धर्मासाठी रस्त्यावर उतरायला उचकून देत असतात आणि गोरगरिबांची मुले हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरतात व संपूर्ण आयुष्याची माती करून टाकतात. हे सर्व पाहिल्यावर ‘कार्यकर्ता’ फक्त सामान्य कुटुंबातीलच का असतो? दंगलीत गरीब घरातीलच मुले का सापडतात? माथी फक्त गरीब घरातीलच मुलांची का भडकतात? धर्मासाठी तेच का पुढाकार घेतात? हे समजून घेणे गरजेचे आहे. धर्मासाठी रस्त्यावर उतरणार्यांच्या यादीत ज्यावेळी बीसीसीआयचा अध्यक्ष असलेल्या जय अमित शाह अशा नावाच्या कार्यकर्त्यांची नावे सापडतील, त्याचवेळी भाजपची खर्या हिंदुत्वाची भूमिका लोकांना पटेल. तोपर्यंत जे काही चालले, ते निमूटपणे पाहात राहावे!
जयंत महाजन
९४२०६९१४२०