अळंबी हे अतिशय नाजूक, नाशिवंत व अल्प मुदतीचे पीक आहे. उगवण्यासाठी वापरलेले काड व इतर घटकांचे व्यवस्थित निर्जंतुकीकरण न झाल्यास, तसेच खोलीमधील तापमान व आर्द्रता यामध्ये मोठा फरक झाल्यास लगेचच रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे पिकाचे नुकसान होते.
धिंगरी अळंबीच्या जाती
धिंगरी अळंबीचा रंग, रूप, आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार प्रयोगशाळेत व निवड चाचणीद्वारे विकसित केलेल्या महाराष्ट्रात प्रचलित असणार्या विविध जाती खालील प्रमाणे आहेत.
१) प्लुरोटस साजर काजू
२) प्लुरोटस ईओस
३) प्लुरोटस फ्लोरिडा
१) लागवडीसाठी जागेची निवड
अळंबी लागवडीसाठी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होईल अशा निवार्याची आवश्यकता आहे. पक्के अथवा शेड, आच्छादित असलेली झोपडी असावी. या जागेमध्ये तीव्र सूर्यप्रकाश नसावा व हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
२) लागवडीचे माध्यम:
धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी पिष्टमय पदार्थ अधिक असणारी घटकांची आवश्यकता असते. यासाठी शेतातील पिकांचे अवशेष, भाताचा पेंढा, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे व पाने, कापशी, सोयाबीन, तुरीच्या काड्या, उसाचे पाचट, नारळ व केळी यांची पाने भुईमुगाच्या शेंगाची टरफले, वाळलेले गवत इत्यादी घटकांचा वापर करता येतो.
३) लागवडीची पद्धत:
काडाचे २ ते ३ सें. मी. लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात ६ ते ८ तास बुडून भिजत घालावे. काडाचे पोते थंड पाण्यातून काढून त्यातील जादा पाण्याचा निचरा करावा.
४) काड निर्जंतुकीकरण:
भिजवलेल्या काडाचे पोते ८० अंश सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्यात १ तास बुडवावे. काडाचे पोते गरम पाण्यातून काढून त्यातील जादा पाणी निथळल्यानंतर पोते थंड होण्यासाठी मोकळे बांधून ठेवावे. अथवा भिजवलेल्या काडाचे पोते ८० अंश सेल्सिअस तापमानाला वाफेवर १ तास ठेवून काड निर्जंतुक करावा. काड थंड करण्यासाठी पोत्यासह सावलीत ठेवावे अथवा निर्जंतुकीकरणासाठी ७.५ ग्रॅम बाविस्टीन व १२५ मिली फॉर्मेलीन १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये सुकलेले काड पोत्यामध्ये भरून १६ ते १८ तास भिजत ठेवावे. द्रावणातील काड पोत्यासह बाहेर काढून जादा पाण्याचा निचरा करण्यासाठी ४ ते ५ तास ठेवावे. नंतर काड ३५ सें. मी. × ५५ सें. मी. आकाराच्या फॉर्मेलीनने निर्जंतुक केलेल्या प्लास्टिक पिशवीमध्ये थर पद्धतीने भरावे.
५) अळंबीची निगा:
योग्य अंतरावर अळंबीचे बेड ठेवावेत. या बेडवर दिवसातून २ ते ३ वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी. खोलीमध्ये जमिनीवर, भिंतीवर पाणी फवारून तापमान व आर्द्रता योग्य प्रमाणात ठेवावी. ३ ते ४ दिवसांत पिशव्यांच्या सभोवती अंकुर दिसू लागतील व पुढील ३ ते ४ दिवसांत त्याची झपाट्याने वाढ होऊन फळे काढणीस तयार होतील.
६) खते व पाणी व्यवस्थापन:
अळंबी, तंतुमय वाळलेल्या अवशेषांवर वाढते. पिशवीतून बाहेर काढल्यानंतर धिंगरी वाढीच्या काळात बेडवर दिवसातून २ ते ३ वेळा पाण्याची फवारणी करावी. अळंबीच्या वाढीच्या काळात तापमान २० ते ३० अंश सेल्सिअस व आर्द्रता ७० ते ९० टक्के ठेवणे आवश्यक असते.
७) अळंबीचे संरक्षण:
अळंबी हे अतिशय नाजूक, नाशिवंत व अल्प मुदतीचे पीक आहे. उगवण्यासाठी वापरलेले काड व इतर घटकांचे व्यवस्थित निर्जंतुकीकरण न झाल्यास, तसेच खोलीमधील तापमान व आर्द्रता यामध्ये मोठा फरक झाल्यास लगेचच रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे पिकाचे नुकसान होते.
धिंगरी अळंबीवरील रोग:
१) ग्रीन मोल्ड:
हा रोग ट्रायकोडर्मा या बुरशीमुळे होतो. अळंबीच्या पिशवीत काडावर ट्रायकोडर्मा या बुरशीची वाढ होऊन हिरवट काळे डाग पडून काड कुजतो. या काडावर अळंबीची वाढ होत नाही. फळे येण्याच्या काळात या रोगाचा परिणाम झाल्यावर काळे डाग पडून फळे कुजतात. काडाचे निर्जंतुकीकरण योग्य प्रकारे न झाल्यास या रोगाचा परिणाम होतो व हवा, पाणी यांद्वारे याचा प्रसार होऊन इतर अनेक पिशव्यांमध्ये होऊन नुकसान होते.
उपाय:
अळंबीच्या लागवडीसाठी वापरण्यात येणारे काड काळजीपूर्वक निर्जंतुक करावे. हाताला निर्जंतुक औषध लावून पिशव्यांची हाताळणी करावी. या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच रोगग्रस्त पिशव्या तत्काळ वेगळ्या कराव्यात. बेडवर २ टक्के तीव्रतेचे फॉर्मेलीन फवारणी करावी. कार्बेन्डाझिम ०.१ टक्के किंवा बेनलेट ०.०५ टक्के द्रावणाची एका आठवड्याच्या अंतराने फवारणी करावी.
२) विषारी काळ्या छत्र्या:
हा रोग कॉप्रीनस या बुरशीपासून होतो. पिवशीत अळंबीची वाढ होत असताना कॉप्रीनस या बुरशीची वाढ होते. पिशवी सोडल्यानंतर अळंबीच्या फळाऐवजी काळ्या रंगाच्या असंख्य छत्र्या काडावर दिसून येतात.
उपाय:
अळंबीच्या लागवडीसाठी वापरण्यात येणारे काड काळजीपूर्वक निर्जंतुक करावे. बेडवर जास्त पाणी मारू नये. बेडवर काळ्या छत्र्या दिसताच हाताने काढून टाकाव्यात.
डॉ. ए. एम. अप्तुरकर (प्राचार्य)
प्रा. विजय शं. मोरे
वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, रिसोड