आंब्याचे दिवस तन-मनाला रसाने तृप्त करणारे, मोहून टाकणारे असतात. आंबा चोळून, चोखून खाताना जी तृप्ती लाभते ती कशातच नसावी. सध्या आंब्याचा ऋतू आहे. कुणाच्या आमराईत जाऊन आपण मनसोक्त आंब्याचा आस्वाद नाही घेऊ शकत. अन् झाडावरचा पिकलेला आंबा मिळणेही दुर्मिळच. तेव्हा बाजारात आलेले आंबे खाऊन, चोखून आपण तृप्त होऊ शकतो.
आंब्याचे दिवस जवळ आलेत की, आपल्याही मनाला आम्रवृक्षासारखा मोहोर येऊ लागतो. वैâर्या, आंबे, रस, लोणचे स्वप्नांच्या ओंजळीत दिसू लागतं आणि एक दिवस बाजारात हिरवीकंच वैâरी डोळ्यांनी दिसली की, मनातलं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटू लागतं. वैâरीची आंबट चव, नंतर आंब्यांचा गोड, मधूर रस जिभेला लागला की, मन तृप्त होतं. आंब्याला सर्व फळांचा राजा उगाच म्ह्टल्या जात नाही. तर आंब्याचं ऐश्वर्य, राजेशाही थाट गुणाचं असल्यामुळेच आंब्याची प्रतिष्ठा आहे.
एखाद्या ऋषी-मुनीप्रमाणे वर्षातील सात-आठ महिने आंब्याचा वृक्ष जणू तपश्चर्या करतो फळा-पानांनी बहरण्याची. चैत्राला सुरुवात झाली की, त्याची तपश्चर्या फळाला येते. नवचैतन्याने वृक्ष बहरून येतो. आंब्याचा मोहरलेला वृक्ष दृष्टीस पडला की, निसर्गाचं कोठलंही दृश्य फिकं पडल्यासारखं वाटतं. आपला जीव ओवाळून टाकावासा वाटतो या मोहरलेल्या वृक्षावरून.
किशोरवयात उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावी जाण्यासाठी मन आतूर होत असे. कारण त्यांच्या घराच्या अंगणात गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून आंब्याचा मोठा वृक्ष मोठ्या ऐटीने उभा होता. मामाच्या गावी… त्यांच्या घरी गेलो की, माझी पहिली नजर तेथील आंब्याच्या वृक्षावर पडे. पानाआड लपलेली बाळवैâरी दगडाने पाडून खाण्यात मजाच काही वेगळी असते. त्या आंब्याच्या वृक्षाच्या दाट सावलीत इतकी माया सामावलेली असे, की भर उन्हातही त्या सावलीतून उठायचं मनच होत नसे. मला वाटतं ज्याचे अंगणात आंब्याचा वृक्ष असतो, तो खरा श्रीमंत असतो. आंब्याच्या वृक्षाची श्रीमंती धनाच्या राशीलाही फिकी पाडणारी असते.
पूर्वी बाजारात खेड्यापाड्याहून गावरान आंब्याचे टोपले भरून यायचे. वाळलेल्या गवताच्या गालिच्यावर निमूटपणे बसलेले आंबे राजबिंड्यासारखे दिसायचे. मग एकाहो, दोनाहो, तिनाहोच्या स्वरात आंबेवाला आपल्या पिशवीत आंबे टाकायचा. आणि वरून एखादा आंबा चोखायलाही द्यायचा; पण आता किलोने मोजून आंबा विकत मिळतो. गावरान आंबा तर फारसा दृष्टीसही पडत नाही. पडला तरी वाढत्या किमतीमुळे गरिबांच्या मुखापर्यंत पोहचत नाही. अलीकडे केशर, लंगडा, बदाम, दशहरी, कलमी अशा विविध जातींच्या आंब्याची वर्दळ बाजारात पाहायला मिळते. आणि अधून-मधून हापूस या गर्भश्रीमंत असलेल्या आंब्याचं दर्शन ते धनाढ्यांनाच होतं.
आंब्याच्या अगोदर बाळवैâर्या दिसू लागल्यात की, दुरुन आलेला पोपटांचा थवा या वैâर्यांचा स्वाद घेतो. एखादं भटकंतीस आलेलं वानराचं कुटुंब या वृक्षावर थोडावेळ विसावा घेऊन आंबट वैâर्यांचा फराळ करतो आणि नासधूस केल्याशिवाय परतत नाही.
आता खरं म्हणजे आंब्याचा वृक्ष जरी आपल्या मालकीचा असला तरी खरी संपत्ती ती निसर्गाचीच. आणि या निसर्गाच्या संपत्तीवर खरा हक्क तो प्राणी पाखरांचाच असतो. आंब्याच्या मोसमात घरोघरी आंब्याचा रस हमखास असतोच. हा रस म्हणजे जणू अमृतच. घरी कुणी पाहुणा आला, की त्याला पाहुणचार आंब्याच्या रसाचाच. जुने लोकं असे सांगतात, की आंब्याच्या रसासह पुरणाची पोळी असली की ती जणू बहीण-भावाची भेटच असते. आंबा म्हणजे भाऊ आणि पुरणाची पोळी म्हणजे आंब्याची बहीण.
आंब्याचा घट्ट रस पोळीसोबत आणि आंब्याच्या कोयी धुवून केलेला पातळ रस भातासोबत किंवा मग शेवया, सरगुंडे सोबत खायची मजा काही वेगळीच असते.
लहानपणी आम्ही काही मित्र आंब्याच्या कोयी जमा करायचो. त्या उन्हात वाळत घालायचो मग आंब्याचा मोसम संपल्यावर त्या वाळलेल्या कोयी चुलीतील निखार्यात टाकून भाजायचो. त्या दगडाने फोडून जे बीज निघतं त्याचा तुरट स्वाद खूपच चवदार लागायचा. मोसम संपला तरीही आंब्याच्या आठवणीत गुंतलेलं मन. याच आठवणीत उदास मनानं घेतलेला बीजांचा स्वाद मनातील उदासीनता वेचून घ्यायचा. हा मोसम संपत यायच्या अगोदर काही दिवस घरात वैâरीच्या लोणच्याची लगबग सुरू व्हायची. लोणच्यासाठी लागणारा मसाला, हिंग, तेल वगैरे, गोड लोणचे, आंबट लोणचे पुन्हा पुढच्या वर्षीचा आंबा येईपर्यंत लोणच्याच्या रूपात वर्षभर नांदायचा. घरोघरी आपली आठवण ठेवून जायचा.
आंब्याचे दिवस तन-मनाला रसाने तृप्त करणारे, मोहून टाकणारे असतात. आंबा चोळून, चोखून खाताना जी तृप्ती लाभते ती कशातच नसावी. सध्या आंब्याचा ऋतू आहे. कुणाच्या आमराईत जाऊन आपण मनसोक्त आंब्याचा आस्वाद नाही घेऊ शकत. अन् झाडावरचा पिकलेला आंबा मिळणेही दुर्मिळच. तेव्हा बाजारात आलेले आंबे खाऊन, चोखून आपण तृप्त होऊ शकतो. आंबा राजा आहे सर्व फळांचा. तो कुणालाच दु:खी ठेवत नाही. गरीब असो वा श्रीमंत त्याचा गोडवा सर्वांसाठी सारखाच. आपण एक करावं पिकलेला आंबा खाऊन झाल्यावर त्याची एखादी कोय आठवण म्हणून अंगणातल्या मातीत रूजवावी. कालांतराने हिच आठवण रोपाच्या रूपाने अंगणात नक्कीच उगवेल. आणि हो आंब्याच्या रसासोबत एखादे दिवशी पुरणपोळी व्ाâरायलाही विसरू नका. बहीण-भावाची ही गोड भेट आपल्या मनास कृतार्थ ठरेल.
सुरेश पाचकवडे
९८२२७१६५८२
अकोला