आज अंदाजे सरकारचे एकूण ढोबळ कर्ज १६० लाख कोटी रुपये आहे. याचा अर्थ देशातील प्रत्येक व्यक्तीवर अंदाजे १,१३,५७१ रुपये इतके कर्ज आहे. अर्थात हा हिशोब गाय पट्ट्यात समजावून सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तिथे तर सूर्याची किरणे रामललाच्या कपाळावर चार मिनिटे कसा तिलक तयार करतात, याला महत्त्व दिले जाते. दक्षिणेतील पाचही राज्यांत अशा भावनिक मुद्यांना स्थान नाही आणि म्हणूनच भाजपला तिथे जागा नाही.
राममंदिर आंदोलनामुळेच १९८४ साली केवळ लोकसभेत केवळ दोन जागा मिळविणारा भाजप २०१९ साली ३०३ ची मजल मारू शकला. आणि आता २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येतील नवनिर्माण झालेल्या राममंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यानंतर मोदींच्या लागोपाठ तिसर्या टर्मसाठी सूर्याची किरणे थेट रामललाच्या कपाळी चार मिनिटे पडली आहेत, एक प्रकारचा सूर्याभिषेक होत आहे, असे दाखवून भाजपच्या मतात काही टक्के तरी भावनिक वाढ करण्याचा प्रयत्न झाला आहे, असे वाटते.
श्रीरामाच्या कपाळावर ज्या पद्धतीने सूर्यतिलक लावण्यात आला त्यासाठी शास्त्रज्ञांनी ऑप्टिकल मेकॅनिकल प्रणाली तयार केली होती. मूर्तीच्या कपाळाच्या मध्यभागी सूर्यप्रकाश निर्देशित करण्यासाठी चार लेन्स आणि चार आरसे लावण्यात आले होते. पोलराइजेशन ऑफ लाइट या प्रक्रियेचा वापर करून सूर्याचे किरण मूर्तीच्या कपाळावर चार मिनिटे पडतील, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. प्रकाशाला लेन्सचा आणि आरशाचा वापर करून एका ठिकाणी केंद्रित केले आणि ऑप्टिकल मॅकेनिकल सिस्टीमचा वापर करून सूर्यतिलक झाला, असे दाखविण्यात आले. सध्या ही यंत्रणा तात्पुरती बसवण्यात आली आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ही यंत्रणा कायमस्वरूपी बसविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती.
गिअरबॉक्स आणि रिफ्लेक्टिव्ह लेन्स अशा प्रकारे मांडण्यात आले आहेत, की स्पायरजवळील तिसर्या मजल्यावरून येणारी सूर्यकिरणे थेट गर्भगृहात पडतील. म्हणजे एक प्रकारे विज्ञानाची जोड देऊन सूर्याचे किरण रामललाच्या कपाळावर पाडण्याची ही व्यवस्था. एवढे करूनही भागले नाही म्हणूनच की काय दूरदर्शनचा लोगो भगवा करण्यात आला. त्याच्या जोडीला विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘रामही प्रभा है, रामही प्रभाव है’, असे केवळ शब्दजंजाळ तयार करणारे भाषण आहेच. मोदींना तिसरी टर्म मिळणे हे संघ परिवाराच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे, कारण २०२५ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. आणि त्या वर्षी देशाचा राष्ट्रपती आणि पंतप्रधान संघ विचारसरणीचा असावा यासाठी संघ परिवाराचा हा आटापिटा सुरू आहे. ज्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने मोदी सतत खडे फोडत असतात त्या नेहरूंनाच लागोपाठ तीन वेळा सत्तेवर येण्याचे श्रेय मिळाले आहे आणि आता मोदींना त्या विक्रमाची बरोबरी करण्याची घाई झाली आहे. म्हणूनच भक्तगणांकडून ‘अबकी बार चारसौ पार’चा नारा आळवून घेतला जात आहे; पण मनात कुठेतरी दोनशे तरी पार होतील का याचा धोका आहे. म्हणूनच की काय अशोक चव्हाण यांच्यासारख्या आता भाजपवासी झालेल्या नेत्याला माझ्यासाठी तरी प्रताप चिखलीकरांना निवडून द्या, असे आवाहन नांदेडकरांना करावे लागले. ह्याच नांदेड जिल्ह्यातून चव्हाण परिवार १९५७ पासून सतत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येत होता, पण आज संकटात सापडलेल्या काँग्रेसला वार्यावर सोडून चव्हाणांनी राज्यसभेच्या जागेसाठी भाजपचा हात धरला. असो!
आज अस्तित्वात असलेली लोकसभा एकूण सदस्य संख्या १९७७ साली केलेल्या सीमांकनानंतर १९७१ च्या जनगणनेनुसार अस्तित्वात आली. याच्या पुढची निवडणूक २०२९ ला होईल आणि २०२१ च्या जनगणनेला ग्राह्य मानले जाईल. त्यावेळी कदाचित देशातील एकूण खासदारांची संख्या आठशेच्या घरात असेल आणि त्यावेळी अर्थात चारशे हा आकडा सध्या बहुमताचा असेल. अबकी बार चारसौ पार ही त्याचीच पूर्वतयारी तर नव्हे? लोकसभेच्या सदस्यसंख्येत होणारी लक्षणीय वाढ मुख्यत्वे गाय पट्ट्यात होणार आहे. आणि याचे उत्तर, भारतात मंदिर, गोमाता यांसारख्या भावनिक पण अव्यावहारिक विषयांना प्राधान्य मिळते. दक्षिण भारतात, त्याचबरोबर बंगाल या भागात भावनिक मुद्यांना प्रतिसाद मिळतच नाही, तर महाराष्ट्रात अल्प प्रतिसाद मिळतो. आज अंदाजे सरकारचे एकूण ढोबळ कर्ज १६० लाख कोटी रुपये आहे. याचा अर्थ देशातील प्रत्येक व्यक्तीवर अंदाजे १,१३,५७१ रुपये इतके कर्ज आहे. अर्थात हा हिशोब गाय पट्ट्यात समजावून सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तिथे तर सूर्याची किरणे रामललाच्या कपाळावर चार मिनिटे कसा तिलक तयार करतात, याला महत्त्व दिले जाते.
दक्षिणेतील पाचही राज्यांत अशा भावनिक मुद्यांना स्थान नाही आणि म्हणूनच भाजपला तिथे जागा नाही. १९ एप्रिलपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा एक जूनला होणार आहे. म्हणजे ४४ दिवस भारतातल्या कुठल्या ना कुठल्या भागात निवडणूक सुरू राहील. महाराष्ट्रात नागपूर, चंद्रपूर भागांत मतदान होऊन गेलेले आहे, तर इतर भागांत अजूनही उमेदवार ठरायचे आहेत. एवढ्या मोठ्या कालावधीत निवडणूक असल्याने देशात कुठेही म्हणावा तसा निवडणुकीने जोर धरलेला नाही, की मोठ्या प्रमाणात प्रचार नाही. याचे कारण जसे वाढते तंत्रज्ञान आहे, तसेच वाढते तापमानसुद्धा आहे. २००४ पासून रणरणत्या उन्हात लोकसभा निवडणूक होण्याची ही पाचवी वेळ. वाढत्या तापमान्ााचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होणारच. त्यामुळे ही टक्केवारी वाढविण्यासाठी उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात निवडणुका न घेता हिवाळ्यात घेणे जास्त श्रेयस्कर! २०२९ ची निवडणूक योग्य कालावधीत व्हावी ही अपेक्षा.
तूर्तास इतकेच!
जयंत माईणकर
९८२१९१७१६३
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)