साधारण चार-पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच पाच राज्यांच्या विधानसभांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास चांगलाच बळावला होता. पुढच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोठे यश प्राप्त करण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळत होते आणि त्याला अनुसरूनच भाजप श्रेष्ठींनी ‘अब की बार चार सौ पार‘चा नारा दिला. विधानसभा निवडणुकीत ‘मोदींची गॅरंटी’ भलतीच प्रभावी ठरली होती. त्यामुळे मोदींनाही आपण भाजपला लोकसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवून देऊ असे वाटत होते. दुसरीकडे विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीत कमालीचे मतभेद दिसून येत होते. नीतीशकुमार सारखे नेते आघाडीतून दुरावले होते तर ममता बॅनर्जींनी वेगळा रस्ता निवडला होता. एकूण काय तर भाजप आघाडीसाठी मैदान तसे साफ दिसत होते. परंतु हळूहळू परिस्थिती बदलत गेली. मोदी सरकारच्या विरोधात जनमत जागृत करण्यात विरोधकांना बर्यापैकी यश मिळत गेले. भाजप आघाडीच्या विरोधात ज्या मतदारसंघात सर्वाधिक प्रभावी उमेदवार असेल त्या मतदारसंघात त्या उमेदवाराचा पक्ष न बघता मतदान करण्याचा कल वाढू लागला. विरोधी आघाडी कदाचित सत्तेत येणार नाही, परंतु मोदींच्या उमेदवाराला धडा शिकविण्याची उर्मी बळावत चालली. पहिल्या दोन टप्प्यातील मतदानानंतर ही उर्मी प्रभावी ठरल्याची जाणीव झाल्यानेच आधी अतिआत्मविश्वासात वावरणार्या भाजपने सावध पवित्रा स्वीकारला.
सुरूवातीला मोदींच्या भाषणात वक्तव्यात एकप्रकारचा आत्मविश्वास जाणवत होता, आता त्याची जागा काळजीने घेतल्याचे स्पष्टच दिसत आहे. मोदींच्या भाषणांचा नूर आता पालटत आहे. मोदी आणि भाजप नेते आता पुन्हा एकदा धु्रवीकरणाच्या जुन्याच नीतीला अधिक महत्त्व देऊ पाहत आहेत. या जुन्या वाटेकडे त्यांचे वळणेच त्यांचा आत्मविश्वास ढासळत असल्याचे निदर्शक आहे. सॅम पित्रोदाच्या एका वक्तव्याचा आधार घेत मोदींनी बहुसंख्यकांची संपत्ती ‘ज्यांची मोठी कुटुंबे असतात’ अशा अल्पसंख्याकांना म्हणजेच मुस्लिमांना वाटून टाकण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप केला. काँग्रेसने हा आरोप तातडीने आणि सज्जडपणे फेटाळून लावला असला तरी, भाजपच्या ध्रुवीकरणाच्या नीतीला पुढे कसे तोंड द्यायचे हा प्रश्न काँग्रेस आघाडी समोर आहेच. अर्थात अजूनही भाजप आघाडी आपली सत्ता टिकवून ठेवेल अशीच परिस्थिती दिसत असली तरी राजकीय तज्ज्ञांच्या मते यावेळी भाजप आघाडीला तिनशेचा आकडा ओलांडणेही कष्टाचे जाणार आहे. कदाचित विरोधकांनी थोडे अधिक प्रयत्न केले, योग्य सामंजस्य दाखविले, प्रचाराचा रोख मोदी सरकारच्या कामगिरीवरच कायम राखला, बेरोजगारी आणि शेतकर्यांच्या समस्यांवर सातत्याने जोर दिला तर होऊ शकते भाजप आघाडीला साध्या बहुमतासाठीही झगडावे लागेल.
विशेष म्हणजे यावेळी कोणतीही लाट वगैरे दिसून येत नाही. पहिल्या दोन टप्प्यात मतदारांनीही फारसा उत्साह दाखविला नाही, परंतु जे मतदार मतदानासाठी बाहेर पडले ते परिवर्तन आणण्याच्या बाजूचे होते, असा ढोबळ अंदाज आहे. त्याचा फटका भाजपला नक्कीच बसू शकतो, परंतु तो किती असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. भाजपची स्वत:ची अशी एक मतपेढी आहे आणि ती कायमच भाजपसोबत असते, परंतु ही मतपेढी भाजपचा उमेदवार निवडून आणण्याइतपत मोठी नाही, त्यामुळे भाजपची सगळी मदार विरोधकांच्या मतांची विभागणी होण्यावरच असते. ज्या मतदारसंघात अशी विभागणी टाळल्या गेली, अर्थात मतदारांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडून येऊ शकेल अशा उमेदवाराकडे आपला मतप्रवाह वळविला असेल तिथे विरोधकांचा विजय निश्चित आहे, परंतु ज्या ठिकाणी मतविभागणी मोठ्या प्रमाणात झाली तिथे भाजप नक्कीच आघाडीवर आहे. अर्थात एकूण सात पैकी केवळ दोन टप्प्यांचे मतदान आतापर्यंत पार पडले आहे. अजून पुढचे पाच टप्पे बाकी आहेत आणि या पाच टप्प्यांमध्येच खरी लढाई आहे.
भाजपची ताकद हिंदी पट्ट्यात आहे. आता यापुढे मोदी स्वत:च्या भात्यातील प्रत्येक शस्त्र आजमावून पाहणार आहेत. रोज काही तरी नवा मुद्दा उपस्थित करून विरोधकांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जाईल. कदाचित मोदींच्या प्रयत्नांना यश येईलही, ते विजयी होतीलही, परंतु त्यांच्या या अस्वस्थतेतून त्यांचा आत्मविश्वास ढासळत चालल्याचेच दिसते. सध्याचे एकूण चित्र पाहता चार सौ पार तर दूरची गोष्ट राहिली भाजप आघाडीने तिनशेचा आकडा गाठला तरी तो मोठा विजय ठरेल, अशी परिस्थिती आहे. कदाचित विरोधकांनी थोड्या आधीपासून व्यवस्थित रणनीती आखली असती, समन्वय आणि सामंजस्य दाखविले असते तर कदाचित यावेळी भाजपला पराभव स्वीकारावा लागला असता.