सुखी जीवन मिळविण्याकरिता वायुतत्त्व म्हणजेच प्राणवायुची आवश्यकता आहे. आजच्या तणावपूर्ण जीवनात ध्यान, योगासन- प्राणायाम, सूर्यनमस्कार आदी वायुतत्त्व विषयक क्रियेद्वारे दिनचर्या बदलामुळे झालेले आजार, वायुदोषामुळे होणारे अनेक प्रकारचे आजार यावर मात करता येऊ शकते.
आरोग्य हीच संपत्ती आहे, असे अगदी बालपणापासून ऐकत आलो आहोत; मात्र आजची परिस्थिती.. पैशाने आरोग्य विकत घेण्याची स्पर्धा सुरू आहे; परंतु तेही शक्य नसल्याचे आता कळू लागले आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध बरा! हे कळल्यास आपण आरोग्य कसे टिकवायचे याचा विचार नक्कीच करू, यासाठी आपले पंचमहाभूत आणि आरोग्य समजून घेताना आज वायुतत्त्वाविषयी जाणून घेऊ या. समाजजीवनात गरीब-श्रीमंत सर्वांनाच निरोगी, तसेच सुखी जीवन मिळविण्याकरिता वायुतत्त्व म्हणजेच प्राणवायुची आवश्यकता आहे. आजच्या तणावपूर्ण जीवनात ध्यान, योगासन- प्राणायाम, सूर्यनमस्कार आदी वायुतत्त्व विषयक क्रियेद्वारे दिनचर्या बदलामुळे झालेले आजार, वायुदोषामुळे होणारे अनेक प्रकारचे आजार यावर मात करता येऊ शकते. वायुतत्त्वाचे दोन महत्त्वाचे गुण म्हणजे ‘शब्द व स्पर्श’ आहेत. यात गतिमान तत्त्व प्राधान्याने असते. बाह्य वातावरणात बघितले, तर झाडा-पानाचे हलणे, सर्वत्र गतिमानता असणे, कुठलाही प्रकारचा वास नाकासारख्या इंद्रियापर्यंत पोहचविणे, शब्दांना कानापर्यंत, छोट्या छोट्या गोष्टींना एकत्र करून शारीरिक दृष्ट्या सर्व इंद्रियांना गतिमान करणे, त्यास कार्यशक्ती प्रदान करणे हे महत्त्वाचे कार्य असते.
प्रातःकाळची आरोग्यदायी हवा,
सदा सर्वदा मानवते जीवा।
प्रसन्नता देई ऋ़तु ते धवा। सर्व प्राणीमात्रांसी।।
सर्व वने-राने जागी होती, पुष्पे सारी विकास पावती।
पशुपक्षीही नेहमी उठती। प्रातःकाळी।।
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये आरोग्य अध्यायात निसर्गाचे व आरोग्याचे वर्णन करताना प्रातःकाळी उठणे कसे आरोग्यास हितावह आहे याचे विवेचन केले आहे. हीच वेळ असते जेव्हा वायुतत्त्व आणि मानवी शरीराचा संपर्क आल्यास निरोगी राहणे सहज होते. संपूर्ण शरीरावर वायुतत्त्वाचा प्रभाव कायम राहिला पाहिजे म्हणून सकाळी लवकर उठण्याची व नियमित लवकर झोपण्याची सवय अंगी लावली पाहिजे. आपली दिनचर्या निसर्गनियमानुसार ठेवून त्यानुसार क्रियाकलाप केले पाहिजे, तरच आपण निरोगी राहू शकतो. याकरिता ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची व पंचतत्त्वांपैकी वायुतत्त्वाच्या सान्निध्यात राहून आरोग्य मिळविण्याची गरज अधिक महत्त्वाचे ठरते.
यावेळी उठल्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी उर्जा देत असतात. याशिवाय रक्तशुद्धीकरिता यावेळी केलेल्या आरोग्यवर्धक क्रिया महत्त्वाच्या असतात. यावेळेस आझोन वायू पृथ्वीच्या सर्वात खालच्या थरात अधिक प्रमाणात असतो, आणि सूर्योदय होण्यापूर्वी म्हणजेच पहाटे साडे पाच पूर्वीच असतो. ओझोनमध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू (ऑक्सिजन) मोठ्या प्रमाणात असतो. रक्तशुद्धीसोबतच रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते, त्यामुळे नव्वद टक्के रोगांपासून मुक्ती मिळते. प्रातःकाळी वायुतत्त्व जास्त प्रमाणात सक्रीय असल्याने मानवी शरीरातील अपानवायू हा अधिक कार्यरत असतो. याचे प्रमुख कार्य मलनिःसारण व शरीरशुद्धीचे कार्य करणे, तसेच मल बाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर न लावता सहजतेने होऊ शकते. आज अनेक लोकांना मूळव्याधीच्या समस्या आहेत. जे उशिराने झोपून उठतात, शौचास उशिरा जातात त्यांना मलनिःसारणाच्या समस्या निर्माण होतात. मूळव्याधी संदर्भात आजार होऊ नये म्हणून, उत्तम शरीरशुद्धी व्हावी म्हणून लवकर उठावे व मलनिःसारण करावे. खरेतर जैविक घड्याळाप्रमाणे या काळात मोठ्या आतड्यांमध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते. यासोबतच प्रातःकाळी सूूर्योदयाच्या आधी स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे शुद्ध हवा शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळतो. यावेळेस अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात असल्याने, सूर्यकिरणांद्वारे येत असल्याने त्या त्वचेद्वारे शोषल्या जातात.
प्रातःकाळ म्हणजेच आयुर्वेदात वर्णन केलेला ‘ब्रह्ममुहूर्त’ रात्रीचा चौथा प्रहर जो ०३.४५ ते ५.३० असा पावणे दोन तासांचा असतो. यावेळी वातावरणात वायुतत्त्व सक्रीय असते, यालाच प्राणवायू असे म्हणतात. याचे शरीरातील स्थान नाकापासून ते मानेपर्यंत आहे. संपूर्ण शरीरात वहनाचे कामे हे वायुतत्त्व करीत असल्याने उपचारपण संपूर्ण शरीरावर केले जातात. फुफ्फुसातील वायुकोष, पेशीतील, मेंदुमधील व सायनस मधील पोकळ्या इत्यादीमध्ये वायुतत्त्व असते. संदेशवहन, अभिसरण, उत्सर्जन, पोषणरस पुरविण्याचे व क्रिया करण्याचे कार्य विविध घटक व अवयवांमार्फत वायुतत्त्वच घडवून आणत असते. त्यामुळेच योग्य पाचनक्रिया व पोषण व उत्सर्जनाचे कार्य केल्याने रोगनिवारण होते. म्हणूनच सकाळच्या वेळेस या उपचारात वायूसेवन, योगासने, प्राणायाम, लांब श्वास घेण्याच्या क्रिया केल्याने प्राणवायूचे प्रमाण वाढून स्नायूमधील लवचिकता कायम राहते. ऑक्सिजनचे प्रमाण वाढून कॉर्बनडॉय ऑक्साईडचा निचरा होऊन विजातीय पदार्थांचे टॉक्सिनचे प्रमाण कमी होऊन रोगनिवारण होण्यास मदत होते. शरीरात पाचही तत्त्वांचा समतोल राखला जातो. वायुतत्त्वाचे उपचार स्नायुंचे आजार, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, दमा, पित्ताचे आजार, मासिक पाळीचे आजार, ब्लडप्रेशर इत्यादीवर उपयुक्त ठरतात.
बंडू धोतरे
९३७०३२०७४६
अध्यक्ष, इको-प्रो संस्था, चंद्रपूर