राजकीय अपरिहार्यतेतून आकारास आलेल्या आणि जनरेट्यातून अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झालेल्या ‘इंडिया’ आघाडीसमोरही आव्हान आहेच. आज दिसते ती एकजूट कायम ठेवणे हे एक मोठे आव्हान तर नक्कीच आहे, शिवाय यावेळी प्राप्त केलेले जनसमर्थन टिकवून ठेवणे हे दुसरे मोठे आव्हान आहे. लोकसभेच्या या कार्यकाळात केंद्रात सत्ता स्थापन करण्याची संधी मिळणे आघाडीसाठी अवघड दिसत आहे. त्यामुळे पुढची लोकसभा निवडणूक जेव्हा केव्हा होईल तेव्हा पुन्हा त्याच ताकदीने भाजप आघाडीसोबत मुकाबला करावा लागेल. हा कालावधी भाजप आघाडीला आपल्या चुका दुरूस्त करण्यासाठीही मिळणार आहे. या लोकसभा निवडणुकीत दलित, मुस्लीम आणि महाराष्ट्रात मराठा तसेच उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी समुदाय भाजपच्या विरोधात गेल्यामुळे भाजपला मोठे नुकसान सोसावे लागले. इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की या दोन्ही राज्यांमध्ये आघाडीने आपली कमाल ताकद यावेळी पणास लावली आणि कमाल यश मिळविले. यापुढच्या काळात त्या यशाची पुनरावृत्ती करणे तितके सहजशक्य नाही.
भाजपला सत्तेतून दूर करण्याची याचवेळी एक उत्तम संधी विरोधी आघाडीकडे होती, पुढच्या वेळी पुन्हा तशी संधी निर्माण करायची असेल तर अगदी आतापासूनच ‘इंडिया’ आघाडी म्हणून एकजुटीने प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. मतदारांचा भाजप विरोधातील रोष एकदा व्यक्त झाला आहे, तो पुन्हा तसाच व्यक्त होण्यासाठी भाजप सरकारकडून पुन्हा तशाच मोठ्या चुका होणे अपरिहार्य आहे; परंतु यावेळी ठेच लागल्यामुळे भाजप सरकार त्या किंवा तशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी नक्कीच घेईल. शिवाय पुढच्या वेळी भाजपचे नेतृत्व मोदींकडेच असेल याची खात्री नाही. त्यामुळे मोदींबद्दलचा तिरस्कार हा एक मोठा घटकदेखील बाजूला झालेला असेल. उत्तर प्रदेशात जातीचे फसलेले गणित पुन्हा जुळविण्याची संधी भाजपला आहे, महाराष्ट्रातही कदाचित फडणविसांना बाजूला करून भाजप श्रेष्ठी नवा चेहरा समोर आणू शकतात.
यशाचे शिखर गाठल्यानंतर पुढचा टप्पा उतरणीचाच असतो, ते या निवडणुकीत भाजपच्या बाबतीत दिसून आले, प्रश्न हा आहे की ‘इंडिया’ आघाडीने यावेळी यशाचे शिखर गाठले की अजून पुढचा टप्पा त्यांच्यासमोर आहे. जर आघाडीने यशाचे शिखर गाठले असेल तर पुढच्या वेळी कामगिरी खालावण्याची भीती नक्कीच आहे. त्यामुळे मिळाले त्या यशात समाधानी न राहता अधिक एकजुटीने, समन्वयाने पुढच्या अधिक मोठ्या यशासाठी काम करण्याचे आव्हान आघाडीसमोरही आहेच.