मे महिन्याची सुरूवात होताच सूर्य आपल्या पूर्ण क्षमतेने आग ओकू लागल्याचे दिसत आहे. अर्थात उन्हाळ्यात सरासरी तापमान वाढणार, हे स्वाभाविकच आहे, परंतु हे तापमान ज्या पद्धतीने आणि गतीने वाढत आहे ते पाहता आगामी काही वर्षात एकूणच वर्षभराचे सरासरी तापमान वाढण्याची भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. प्रचंड प्रदुषण, झाडांची झपाट्याने कमी होत जाणारी संख्या या आणि अशाच काही कारणांमुळे पृथ्वीचे तापमान क्रमश: वाढत असल्याचे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. त्याचा परिणाम म्हणून समुद्राच्या पाण्याचे तापमानही वाढत आहे.
समुद्राचे पाणी किती खोलवर तापते यावरही नैसर्गिक संतुलन अवलंबून असते. गेल्या काही वर्षात समुद्राच्या पाण्याचे अधिक खोलवर तापमान वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे समुद्री जीवांच्या जीवनचक्रावर तर परिणाम होत आहेच, शिवाय पावसाचा लहरीपणादेखील वाढत चालल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान सध्या ज्या गतीने वाढत आहे त्याच गतीने ते वाढत राहिले तर येत्या पन्नास-शंभर वर्षांमध्ये पृथ्वीवर मोठे नैसर्गिक संकट ओढवू शकते, असा गंभीर इशारा शास्त्रज्ञ देत आहेत. या पृष्ठभूमीवर यंदा उन्हाळा थोडा कडकच आहे, असे म्हणत आपली जबाबदारी झटकण्याची वृत्ती घातक ठरू शकते.
उन्हाळा कडक असणे जरी स्वाभाविक असले तर या कडकपणाची तीव्रता ज्या गतीने वाढत आहे ती अतिशय चिंतेची बाब आहे. त्यादृष्टीने विचार केला तर निसर्गचक्राचा एक जबाबदार घटक म्हणून सामान्य लोकांची जबाबदारी तितकीच मोठी ठरते. पर्यावरण संतुलनासाठी सरकार स्तरावर जे काही उपाय केले जातील ते केले जातील, परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेतली तरी ही वसुंधरा पुढच्या पिढ्यांसाठी सुसह्य ठरेल. सगळे काही सरकारवर ढकलण्याऐवजी प्रत्येकाने एक झाड लावले आणि ते मोठे होईपर्यंत त्याची व्यवस्थित काळजी घेतली तरी खूप काही होऊ शकेल, आज आपण या उन्हाच्या झळा सहन करीत आहोत, परंतु आपण असेच बेजबाबदार राहिलो तर आपल्या पुढच्या पिढ्या या झळा सहन करू शकणार नाहीत, याची जाणीव आपण ठेवायला हवी.