पिकाच्या जोमदार वाढीसाठी भरपूर उत्पादनासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशीर ठरते. रासायनिक खतांची मर्यादा व सेंद्रिय खतांचे फायदे लक्षात घेता पिकास निव्वळ रासायनिक खते न देता त्याबरोबर आपल्याच शेतात तयार होणारे सेंद्रिय खत देणे ही एक शास्त्रीय तशीच काळाची गरज आहे. अलीकडे बागायती क्षेत्र वाढल्यामुळे रासायनिक खतांचा वापर भरपूर वाढला आहे. दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खते यांची कमतरता भासू लागली आहे. हिरवळीचे पीक घेऊनही काही प्रमाणात सेंद्रिय खतांची उणीव भरून काढण्यात येते; परंतु हिरवळीचे पीक घेऊन ते जमिनीत गाडण्यातही हिरवळीचे खत होण्यासाठी रानाची उपलब्धता, हिरवळीचे पीक व नंतर घ्यावयाचे पीक यासाठी पुरेसा वेळ हवा व हिरवळीचे खत जमिनीत कुजण्यासाठी पुरेसा ओलावा असावा लागतो. शेतामध्ये गवत, पाला पाचोळा, ज्वारी व मका या पिकांची धसकटे, जनावरांचे मलमूत्र, गव्हाचे व साळीचे काड, तसेच उसाचे पाचट सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. या सेंद्रिय पदार्थांपैकी काही पदार्थ लवकर कुजतात; परंतु उसाचे पाचट लवकर कुजत नाही त्यामुळे शेतात वापरता येत नाही. अलीकडे संशोधनानुसार उसाचे पाचट लवकर कुजण्यासाठी व त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
जमिनीत कोणतेही सेंद्रिय खत न देता हेक्टरी आठ ते दहा टन मिळणारे पाचट मिळते. ऊस तुटल्यावर उसाचे पाचट जाळून न टाकता यापासून कंपोस्ट केले किंवा जागच्या जागी कुजविले तर जमिनीस बहुमोल असे सेंद्रिय खत मिळू शकेल. शेतातील ऊस तोडून गेल्यानंतर जी वाळलेली पाने शेतात पडतात त्यास पाचट असे म्हणतात. पाचटामध्ये लिग्निन व मेनचट पदार्थांचे प्रमाण १५ टक्के असते. पाचटावर टोकदार केसासारखे कुसे असल्यामुळे जनावरे पाचट खात नाहीत. पाचटामध्ये ऊर्जा निर्मितीक्षमता कमी असते. शिवाय पाचट लवकर भरभर जळून राख होते. त्यामुळे पाचटाचा उपयोग जळण्यासाठी करता येत नाही. सर्वसाधारणपणे एक हेक्टर क्षेत्रापासून आठ ते दहा टन पाचट उपलब्ध होते व त्यापासून चार ते पाच टन सेंद्रिय खत मिळते.
पाचटाचे फायदे:
१) वेगळे सेंद्रिय खत घालण्याची गरज नाही, पाचटाद्वारे हेक्टरी चार ते पाच टन सेंद्रिय खत तयार होते. २) पाचट आच्छादनासारखे काम करते त्यामुळे पाण्याची बचत होते. ३) पाचट टाकलेल्या शेतात गांडूळ ठेवले असता गांडुळांची संख्या व कार्य चांगले होते. ४) पाचटामुळे तणांची वाढ होत नाही. ५) उन्हाळ्यात जमिनीचे तापमान कमी ठेवण्यात पाचटाचा उपयोग होतो, तर पावसाळ्यात तणांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. ६) द्राक्षामध्ये एप्रिल छाटणीनंतर उसाच्या पाचटाचा आच्छादन वापर केला तर पाण्याची बचत होते व द्राक्षाच्या कांड्यांमध्ये फळधारण्याचे प्रमाण वाढते. ७) बहार धरल्यानंतर डाळिंबाच्या आणि बोरीच्या झाडाखाली अळ्यात आणि अळ्याबाहेर उसाच्या पाचटाचा आच्छादन म्हणून वापर केल्यास डाळिंबातील फळ तडकणे टाळता येते, तसेच बोरातील पाण्याअभावी होणारी फळगळ कमी करता येते.
पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे:
१) पाचट जाळल्यामुळे आपण निसर्गाने दिलेल्या सेंद्रिय पदार्थाचा साठा जाळून टाकून मुख्यत्वे सेंद्रिय कर्बाचा आणि नत्राचा नाश करतो. उसाच्या हेक्टरी आठ ते दहा टन पाचट मिळते. २) पाचट जाळल्यामुळे त्यातील शंभर टक्के नत्र वाया जाते आणि स्फुरद, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम आणि झिंक ७५ टक्के वाया जातात. ३) जमीन तापल्यामुळे जमिनीतील नत्र, यात्रा आणि इतर अन्न घटकांचा थोडाफार प्रमाणात वायुरूपात नाश होतो. ४) जमीन भाजल्याने जमिनीच्या वरच्या थरातील उपयुक्त जिवाणूंची संख्या कमी होते.
प्रा. संजय बाबासाहेब बडे,
साहाय्यक प्राध्यापक
कृषी विद्या विभाग: दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय
दहेगाव, तालुका वैजापूर, जि. छत्रपती संभाजी नगर