आपल्याकडे उन्हाळा कडक असतो. या तप्त उन्हात नांगरटी करून जमीन तापू दिली पाहिजे. त्याआधी रब्बी आणि उन्हाळीची पिके सगळी काढून खोल नांगरटी करावी. पाऊस पडण्याआधी बांध बंदस्ती करून ठेवली पाहिजे. त्यामुळे सुरुवातीला पहिला- दुसरा जो पाऊस पडेल तो शेतात मुरण्याची प्रक्रिया छान होईल.
शाश्वत शेतीची प्रामुख्याने चार मूलतत्त्वे आहेत. १. हवामानाचा अंदाज, २. कृषी निविष्ठा ३. निधीची उपलब्धता आणि ४. उपलब्ध तंत्रज्ञानानुसार आराखड्याची अंमलबजावणी. एकात्मिक शेतीचे नियोजन करताना सर्वप्रथम आपल्या भागातील पावसाचा अंदाज लक्षात घेणे आवश्यक ठरते. पावसाचा अंदाज घेण्यासाठी पूर्वी केवळ रेडिओ किंवा दूरदर्शनवरच अवलंबून राहावे लागायचे. आता मात्र त्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. आपल्या स्मार्ट फोनवर अॅप्सच्या माध्यमातून, भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावरून, तसेच कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातूनसुद्धा आपल्याला आगामी पावसासंदर्भात माहिती घेता येते. पाऊस कधीपासून सुरू होईल? आपल्या भागात प्रमाण कसे असणार आहे? त्याची तीव्रता कशी असेल? खंड किती असतील? या गोष्टींचा अंदाज घेऊन कोणते पीक घ्यावे हे ठरवता येते. मशागतीची पद्धतसुद्धा यावरून ठरविता येते. दुसरा मुद्दा म्हणजे कृषी निविष्ठा, यामध्ये बियाणांची उपलब्धता, खतांची उपलब्धता, औषधांची उपलब्धता, जमिनीचा प्रकार, मागील लेखांमध्ये चर्चा केल्याप्रमाणे मृदा परीक्षणाचा अहवाल व त्यानुसार जमीन तयार करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याकरिता आपल्याकडील शेत तयार आहे का? हे आधी पाहिले पाहिजे.
आपल्याकडे उन्हाळा कडक असतो. या तप्त उन्हात नांगरटी करून जमीन तापू दिली पाहिजे. त्याआधी रब्बी आणि उन्हाळीची पिके सगळी काढून खोल नांगरटी करावी. पाऊस पडण्याआधी बांध बंदस्ती करून ठेवली पाहिजे. त्यामुळे सुरुवातीला पहिला- दुसरा जो पाऊस पडेल तो शेतात मुरण्याची प्रक्रिया छान होईल. पावसाचे पाणी व त्यासोबत जमिनीचा सुपीक थर वाहून जाण्याचा धोका टळतो. म्हणूनच शेताची सगळी कामे उन्हाळ्यात करून ठेवण्याची आपली पारंपरिक पद्धत होती. तसेच कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत स्वतःच तयार करून नांगरटी सोबत शेतात पसरले पाहिजे. खत स्वतः तयार केल्याने खर्चामध्ये बचत होते. तिसरे महत्त्वाचे म्हणजे आपल्या क्षमतेनुसार शेतीसाठी निधी राखीव ठेवावा, तसेच आवश्यकतेनुसार आपल्याला निधी वेळोवेळी कसा व कुठून उपलब्ध होईल? पैशांची तरतूद कशी होणार आहे? कर्ज काढावे लागणार आहे का? सद्यस्थिती कशी आहे? मनुष्य बळाचे नियोजन कसे होईल? साधारणतः एकूण किती खर्च येईल? याबाबतचा अंदाज बांधावा व तसे नियोजन करणे महत्त्वाचे ठरू लागले आहे.
चौथा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकात्मिक शेतीच्या तंत्रानुसार आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी. आपल्या विदर्भ, खान्देश व मराठवाड्यामध्ये मुख्य नगदी पीक कपाशीचे घेतले जाते. काही भागांत सोयाबीन घेतले जाते. पावसाचा अंदाज घेऊन साधारणतः २५ मे नंतर कपाशीची लागवड करावी. त्या आधी पाणी उपलब्ध असेल, तरी लागवड करू नये. अन्यथा गुलाबी बोंड अळी अडचण निर्माण करू शकते. आवश्यकता भासल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. १४० ते १५० दिवसांचेच वाण यासाठी निवडावे. शेताच्या बांधावर कपाशीचे जुने अवशेष असेल, तर ते नष्ट केल्याने बोंड अळीच्या जीवनक्रमात खंड पडतो. कपाशीसोबत मिश्रपीक घेतलेच पाहिजे. आंतरमशागत करून उडीद, मूग, सोयाबीन, भुईमूग यांसारखे आंतरपीक घेतले पाहिजे. शेताच्या चहूबाजूला मका, चवळी, अंबाडी हे मिश्र पीक कीड व्यवस्थापनासाठी अवश्य लावावे. याकरिता आंतरपीक व मिश्रपीक यांचा फार चांगला उपयोग होत असल्याने ते अतिशय आवश्यक आहे. तसेच कीड व्यवस्थापनासाठी ५टक्के निंबोळी अर्क तयार करण्यासाठी निंबोळी पावडर तयार करून स्वतःजवळ ठेवावी (विकतही घेता येईल). कापसाचे क्षेत्र जास्त न वाढविता पौष्टिक तृणधान्याचा पेरा आपल्याला वाढविता येईल का? याचा निश्चित विचार करावा. ज्वारी, तूर, बाजरी, कडधान्य क्षेत्रात वाढ करावी. त्याकरिता बियाणांना जैविक औषध चोळून बीजप्रक्रिया करून ठेवावी.
कमी कालावधीचे वाण वापरावे. बियाणे घरी साठविलेले असेल, तर बीज परीक्षण शेतकर्यांनी करून घेणे इष्ट ठरते. तसेच एकात्मिक शेतीमध्ये ३०टक्के क्षेत्र फळबागेसाठी असायला हवे. ज्यांनी फळबाग केली नसेल त्यांनी यंदा करून घ्यावी. याकरिता रोपांची योग्य निवड केली पाहिजे. जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण १२टक्के पेक्षा अधिक असल्यास निंबू वर्गीय पिके न घेता आवळा, त्याचप्रमाणे सीताफळ, चिकू यांसारख्या पिकांची लागवड केली पाहिजे. अशा प्रकारच्या जमिनीमध्ये अन्य फळझाडे फार वाढत नाहीत.शासकीय स्तरावर फळ लागवडीसाठी मदत प्राप्त करता येते. त्याची माहिती शेतकरी बांधवांनी घ्यावी व योजनांसाठी कृषी विभागात आपली नावे नोंदवून घ्यावीत. इच्छुक शेतकर्यांना एमआरईजीएस, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यांसारख्या योजनांमध्ये सहभागी होता येते. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, यांच्याकडे संपर्क करून एकात्मिक शेतीचा म्हणजेच शाश्वत शेतीचा संकल्प पूर्णत्वास अाणून आपल्या भागामध्ये आदर्श निर्माण करावा.
अनिल भोकरे
९४२२३६७२६२
सेवानिवृत्त प्रकल्प संचालक, आत्मा तथा संचालक- अॅग्रेरियन