खरंतर अवर्षण प्रवण भागामध्ये शाश्वत उत्पन्नासाठीचा जर कुठला स्रोत असेल तर जे काही तुम्ही पीक घेत आहात त्यामधील आंतरपीक! जर का कोरडवाहू शेतीमध्ये कापसाचा पेरा मोठा असेल, तर आंतरपीक कसे घेता येईल? निसर्गाने या पिकांना एकमेकांना पूरक असण्याची देण दिलेली आहे, आंतरपीक घेण्याची सुविधा केलेली आहे. म्हणजे एका पिकासोबत दुसरे पीकही जोमाने वाढते.
मागच्या लेखात आपण पाहिले, की जमिनीचा प्रत्येक कण सुपीक करायला निसर्गाला हजारो वर्षे लागतात. पाण्यासोबत वाहून जाणार्या या मातीच्या कणांची किंमत पैशात करता येणार नाही. शेती बागायती असो, वा जिरायती जमीन सुपीक असल्याखेरीज फायद्याची शेती करता येणार नाही. म्हणून पाऊस पडण्याआधी बांध- बंदिस्ती करून घेतली पाहिजे. याशिवाय जमिनीचा पोत, ओलावा आणि खोलीनुसार पिकाचे नियोजन केले पाहिजे. अन्यथा नुकसान होते, हे आम्ही सातत्याने कास्तकाराला सांगतो; पण आपण बर्याचदा बघतो अत्यंत हलकी मुरमाड जमीन असेल, तरी शेतकरी बांधव फारसा विचार न करता कपाशी लावतात. कितीही चांगला पाऊस झाला, कितीही खत घातले, तरी अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. अशावेळी विनाकारण खर्च होतो व शेतीचे गणित बिघडते, आर्थिक ताळेबंद जुळून येत नाही. म्हणून आपण जमिनीच्या खोलीनुसार पीक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून शेतकर्यांनी जमिनीच्या खोलीचा गांभीर्याने विचार करूनच लागवड केली पाहिजे. अन्यथा कितीही आधुनिक व मोठे तंत्रज्ञान आपण वापरले आणि पायाच जर चुकला असेल, तर फायद्याची शेती करता येणार नाही. त्यासाठी खोली साडेसात सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर गावात, वनशेती, कोरडी फळबाग यांचे नियोजन केले पाहिजे.
फळबाग म्हणजे शेतकरी कुटुंबांसाठी खरेतर पेन्शन योजना आहे. फळबागेसाठी शासनाच्या योजनांचा उपयोग केला पाहिजे. कितीतरी योजना शेतकर्यांच्या प्रयत्नांना हातभार लावणार्या आपल्याला दिसतील, तसेच साडेसात ते साडेबावीस सेंटीमीटर, साडेबावीस ते साडेपंचेचाळीस सेंटीमीटर, पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर किंवा त्याहून जास्त असे जमिनीच्या खोलीचे टप्पे लक्षात घ्यावे लागतील. साडेसात ते पंचेचाळीस सेंटीमीटरमध्ये आपल्याला मटकीसारखे पीक घेता येईल. तसेच बाजरी+ मटकी, बाजरी अधिक मूग+तूर हे अशाप्रकारचे आंतरपीकदेखील घेता येईल. आणि का कुणास ठाऊक; पण आपली आंतरपीक घेण्याची जी परंपरा होती ती हल्ली खूपच कमी प्रमाणात बघायला मिळते. खरंतर अवर्षण प्रवण भागामध्ये शाश्वत उत्पन्नासाठीचा जर कुठला स्रोत असेल तर जे काही तुम्ही पीक घेत आहात त्यामधील आंतरपीक! ‘एकात्मिक शेती’विषयीच्या लेखामध्येही आपण आंतरपिकाविषयी चर्चा केली होती. जर का कोरडवाहू शेतीमध्ये कापसाचा पेरा मोठा असेल, तर आंतरपीक कसे घेता येईल? निसर्गाने या पिकांना एकमेकांना पूरक असण्याची देण दिलेली आहे, आंतरपीक घेण्याची सुविधा केलेली आहे. म्हणजे एका पिकासोबत दुसरे पीकही जोमाने वाढते. मनुष्यालाच मात्र एकमेकांची अडचण असल्याचे दिसते.
पिकांमध्ये तसे नाही. जसे की कडधान्य हे तृणधान्य पिकांमध्ये आंतरपीक घेतले जाते, नगदी पिकांमध्ये आंतरपीक घेतले जाते. जेणेकरून त्याला नत्र स्थिरीकरण होते, तसेच कुठल्याही मुख्य पिकावर याचा अनिष्ट परिणाम होत नाही, तसेच अतिरिक्त जागाही लागत नाही. आहे त्याच जागेमध्ये सहजतेने आंतरपीक घेता येते. शिवाय आंतरपिकामुळे मशागतीलाही कोणतीच अडचण होत नाही. केवळ आपला संकुचित दृष्टीकोनच एक अडथळा ठरू शकतो. कोरडवाहू शेतीसाठी हे एकप्रकारे वरदान आहे हे समजून घेतले पाहिजे. यामध्ये आपण बाजरी+तूर, तूर+सूर्यफूल, कापूस+मूग, कापूस+मटकी, कापूस+भुईमूग असे प्रयोग करू शकतो. खरेतर हे सगळे प्रयोग कृषी विद्यापीठांमध्ये यशस्वीरित्या झालेले आहेत. कृषी शास्त्रज्ञांनीदेखील शिफारस केली आहे. आपण ते स्वीकारायला हवे. मुख्य पिकावर याचा अनिष्ट परिणाम तर होत नाहीच किंबहुना पावसाचा खंड पडला, तर हे आंतरपीक आच्छादन म्हणून मुख्य पिकाला सहकार्य करते आणि अतिपाऊस झाला तर किमान एखादे तरी पीक शेतकर्याच्या हाती लागते, ही किमया आहे. मित्रकिडींची जोपासना या आंतरपिकामुळे होते. कंपोस्टसाठी सोयाबीनचा ४ टन पाला हेक्टरी मिळतो. त्यामुळे ही पूरक प्रक्रिया शेतकर्यांनी केलीच पाहिजे आणि कोरडवाहू शेतकर्याला रब्बी आणि उन्हाळीमध्ये सिंचनाच्या जर का मर्यादा असतील, तर एकाच हंगामात दोन पिके मिळतात की जे एकमेकांना पूरक आहेत.
अनिल भोकरे
९४२२३६७२६२
सेवानिवृत्त प्रकल्प संचालक, आत्मा तथा संचालक- अॅग्रेरियन