मराठी माणसाची अवस्था अशी झाली आहे, की जे चित्र त्याला दाखवलं जातंय ते पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. मूळ मुद्यांपासून विचलित करण्यासाठी. मराठी माणसांसाठी जे ट्रॅप बनवले जात आहेत, त्यात मराठी माणूस अडकू नये ही आपली अपेक्षा आहे. मुंबई आणि महाराष्ट्र हस्तगत करण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार झाल्यासारखे दिसत आहे व मराठी माणसासाठी हा अत्यंत घातक टप्पा दिसत आहे. त्याचे टप्या टप्याने प्लॅनिंग केले असावे, या शंकेला वाव आहे. सर्वप्रथम राजकीयदृष्ट्या मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला कमजोर करायचे, मग आर्थिकदृष्ट्या तोडायचे असे धोरण दिसते. मुंबई महाराष्ट्रापासून हस्तगत करायचे नियोजन असो अथवा नसो, पण मुंबईतून बाहेर काय काय उद्योग व कार्यालये हलवायची त्याची तर अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यासाठी सर्वप्रथम ९० टक्के मराठी नेत्यांवर ‘ईडी’ची धाड मारून त्यांना शरणागती पत्करायला लावायची. तो प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यानंतर शिवसेना या मराठी माणसांच्या संघटनेत फूट पाडून मराठी माणसांची राजकीय शक्ती कमजोर करायची. ते पण नियोजन पूर्णत्वास निघाले आहे. शिवसेना कमजोर झाल्याशिवाय महाराष्ट्र आणि मराठी माणसाची राजकीय शक्ती कमी होणार नाही हे संबंधितांना माहीत आहे. ‘ईडी’ची धाड पडलेले सर्व नेते, उद्योजक कोण आहेत? मराठी माणसचं आहेत. आपल्याला फक्त राजकीय नेतेच माहीत आहेत; पण त्यात मराठी उद्योजकदेखील आहेत, याची माहिती मराठी जनता घेत नाही. सर्व बाजूने मराठी माणसाला तोडायची तयारी एका विशिष्ट लॉबीने केली आहे.
अन्य राज्यांतील नेत्यांवर किंवा उद्योजकांवर ‘ईडी’ची धाड का नाही पडत? पराग शाह, किरीट सोमय्या, मंगलप्रभात लोढा, मोहीत कंबोज यांच्यासारखे परप्रांतीय अमराठी लोक अत्यंत चुकीच्या पद्धतीने करोडो, अरबो रुपयांची माया गोळा करत नाही का? त्यांच्यावर ‘ईडी’ची धाड का पडत नाही अथवा चौकशी का लागत नाही? त्याचे साधे उत्तर आहे की, मराठी माणसाला टार्गेट करून कमजोर करायचे आणि मुंबईचे महत्त्व कमी करायचे कुटिल कारस्थान सुरू झाले आहे. एकीकडे महाराष्ट्रात येऊन मुंबई आतून पोखरायची, सर्व उद्योगधंदे पळवायचे, स्थानिकांचा रोजगार पळवायचा आणि सामान्य मराठी माणसांचे लक्ष तिथे जाऊ नये म्हणून व आपल्या हातून काय काय चाललंय हे कळू नये, यासाठी त्याला ‘हिंदुत्वा’चे लेबल लावायचे. हिंदू, मुस्लीम दाखले दाखवताना ‘हिंदु खतरे मे है’ वगैरे वगैरे. दिशाभूल करून त्याची बुद्धी दुसरीकडे वळवायची. मुळात मराठी माणसाचं दुर्दैव हेच आहे की, तो असल्या ट्रँपला बळी पडतो. मराठी माणूस वास्तववादी व्हायलाच तयार नाही. हिंदुत्वाची गुगली टाकून मराठी माणसांच्या मानसिकतेशी खेळ होतोय व त्यात अनेकजण बळी पडू लागले आहे. आपलं राज्य, आपली मराठी अस्मिता, आपली माणसं या सर्वांचा सत्यानाश करायला अनेक जण निघाले आहेत. शत्रू म्हणून मुसलमान दाखवला जातोय. मुळात मुसलमान हा येथील लोकांचा शत्रू नाहीच आहे. शत्रूंची लॉबी कोण आहे, याचेच भान मराठी माणसांना राहिले नाही. ती लॉबी मराठी माणसांना दररोज कमजोर करायला बघते आहे. काळाच्या ओघात भूमिहीन झालेला शेतकरी, शिकूनही अपेक्षित नोकरी व योग्य संधी मिळत नसल्याने खचलेले युवक असे चित्र सध्या दिसते. मराठी माणसाने नेहमीच इतरांना मोठ्या मनाने केवळ देण्याचेच काम केले आहे. त्यांच्यावर मात्र आता मागण्याची वेळ आली. जागतिकीकरणात व्यापारी पेठा काबीज करता येऊ न शकल्याने मराठी माणूस मागे पडला.
आजपर्यंत मुंबईतील मराठी जनतेचा आवाज बनून शिवसेना काम करीत आहे. राजकीय पटलावर शिवसेनेने अनेकदा वेगवेगळी भूमिका घेतली असली व प्रसंगी हिंदुत्ववादी विचाराला पाठबळ दिले असले तरी, मुंबईत आजही मराठी माणसांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमकपणे रस्त्यावर उतरते. केंद्रातून ज्या ज्या वेळी मुंबई ‘केंद्रशासित’ करण्याचा प्रयत्न झाला त्या प्रत्येक वेळी शिवसेनेने उग्र आंदोलन करून केंद्राचा डाव हाणून पाडला ही वस्तुस्थिती आहे. केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, त्या प्रत्येक सरकारचे धोरण मुंबई ताब्यात घेण्याचे असते. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णया विरोधात जाण्याची त्यांच्या पक्षाच्या राज्यातील नेत्यांची हिम्मत नसते. मुंबईवर ताबा घेण्यातील मोठा अडथळा ‘शिवसेना‘ आहे हे ओळखून शिवसेनेलाच मोडून काढण्याचा धूर्त राजकीय ‘डाव’ खेळला गेला. महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपाचा मुख्यमंत्री झाला. त्यानंतर मुंबईतील जवळपास सगळी महत्त्वाची केंद्रीय कार्यालये अहमदाबादला अथवा दिल्लीला हलवण्यात आली. मुंबई गोदीतील कामकाज कमी केले व सगळे काम गुजरात गोदीतून सुरू केले, जेएनपीटी बंदराचे महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा प्रचंड निधी खर्च करून सुरतजवळ नवे बंदर बांधले.
मुंबई बंदराकडे येणारी जहाजे गुजरात बंदराकडे वळवली, मुंबईतील आंतरराष्ट्रीय ‘हिरे व्यापार’ सुरतला नेण्यात आला, मुंबईतले मुख्य पासपोर्ट ऑफिस दिल्लीला हलवले, बोरीबंदरला असलेले देशाचे मुख्य पोस्ट ऑफिस दिल्लीला नेले, रिझर्व बँकेचे गव्हर्नर मुंबई ऐवजी दिल्लीत बसू लागले, मुंबईतील अनेक मोठे उद्योग गुजरातला गेले, धुळे-नंदुरबार भागातील महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे वळवण्यात आले. तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस किंवा भाजपा सरवâारने कसलाही आक्षेप घेतला नाही किंवा विरोधही केला नाही. महाराष्ट्रात भाजपाला त्यांचीच सत्ता का हवी आहे याची ही कारणे आहेत. आपला खरा शत्रू कोण? हेच ओळखणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वास्तववादी असणे गरजेचे आहे. मुंबई महाराष्ट्रातील काही राक्षसापासून वाचविली नाही तर ‘एक होता आमचा महाराष्ट्र’ व ‘एक होती मुंबई‘ हे बोलण्याची पाळी आपल्या पुढच्या पिढीवर येऊ शकते.
जयंत महाजन
९४२०६९१४२०