प्रहार: दिनांक 26 मे 2024
लेखक : प्रकाश पोहरे,
*संपादक, दैनिक देशोन्नती, दैनिक राष्ट्रप्रकाश.
पृथ्वीचे सरासरी तापमान वाढणे, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते वाढले की ते झपाट्याने कमी होणे, त्यानंतर हिमयुगाची निमिर्ती होणे हे एक चक्र गेली कित्येक कोटी वर्षं चालू असावे. गेली काही लाख वर्षं ते नक्कीच चालू आहे, असे आपण म्हणू शकतो. याचे कारण गेल्या काही लाख वर्षांतील वातावरणातील बदलांचे पुरावे आपल्यासाठी निसर्गानेच जपून ठेवले आहेत. यामुळेच गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्याने तापमानवाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.
ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमानवाढीचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. जागतिक तापमानवाढ किंवा ‘ग्लोबल वॉर्मिंग’ म्हणजे नक्की काय आहे?
‘क्लायमेट चेंज’मुळे पावसाचे प्रमाण आणि कालखंड कमालीचा बदलू शकतो याविषयी आंतरराष्ट्रीय माध्यमात २००५पासून चर्चा सुरू झाली होती. आंतरराष्ट्रीय माध्यमांत या शक्यता आणि इशारे दिले गेले असले, तरी २०१२ साल उजाडेपर्यंत जगभरात या शक्यता वास्तवात येऊ लागल्या. विशेषतः भारतातील तापमानवाढीसंदर्भात विचार केल्यास, २०१४ नंतर इन्प्रâास्ट्रक्चरच्या नावाखाली, रस्त्यांचे चौपदरी, सहापदरीकरण होऊ लागले, चौपदरी सिमेंटचे राज्य महामार्ग निर्माण करण्यात आले, समृद्धी महामार्ग बांधण्यात आला, त्यासाठी बेसुमार झाडे कापली गेलीत. आश्चर्य म्हणजे, इंग्रजांनी भारतात मजबूत पूल, लोहमार्ग, तसेच अशा बर्याच वास्तू बांधल्या; पण जंगलांची नासधूस केली नाही. त्याकाळी अगदी घनदाट जंगलांतून लोहमार्ग टाकण्यात आले होते, तरीदेखील झाडांची कमीत कमी कत्तल होईल याची काळजी घेतली जायची. मात्र, अलीकडच्या काळात इन्प्रâास्ट्रक्चर विकासाच्या नावाखाली हजारो वर्षे जुनी झाडे तोडली गेली. सार्वजनिक वाहतुकीची साधने पुरेशी विकसित न झाल्या परिणामी लोकांनी मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केल्याने आणि त्यासाठी व्यापक रस्त्यांचे जाळे बांधल्याने आणि तेसुद्धा सिमेंटचे रस्ते बांधल्याने वातावरण बदलाचा वेग दुपटीने वाढू लागला. काही ठिकाणी सरासरी उच्चतम तापमान ४ ते ६ अंश सेल्सियसने वाढल्याचे दिसून येऊ लागले, काही ठिकाणी ते २ अंश सेल्सियसने वाढले आणि पृथ्वीच्या एकूण सरासरी तापमानानेही १ अंश सेल्सियसने वाढल्याचा नवा उच्चांक नोंदविला.
जगभरात अलीकडच्या काळात झालेल्या राजकीय बदलांमुळे ‘ग्लोबल हीटिंग’ला थेट नकार देत उद्योगांना आणि लोकांना हवे तितके प्रदूषण करण्याची परवानगी देणारी एक नवी राजकीय जमात उदयाला आली. लवकरच पर्यावरणाच्या प्रश्नांचे वर्गीकरण पीआर कंपन्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये करण्यात आले आणि जो- तो अगोदरपेक्षा दुप्पट प्रदूषण करूनही आपण कसे पर्यावरणस्नेही आहोत हे जगाला पटवून देऊ लागला. प्रत्यक्षात इन्प्रâास्ट्रक्चरच्या या झगमगाटात निसर्ग भकास करण्याचा गोरखधंदा अलीकडच्या दशकभरात भारतात सुरू झाला आहे. वातावरण बदलाचे दुसरे मोठे पर्व सुरू झाले तेव्हा ते समोर दिसत असूनही पर्यावरणाची जाण असणार्या अनेकांचे हात बांधले गेले. काही ठिकाणी त्यांना तुरुंगात धाडण्यात आले. काही ठिकाणी त्यांची आर्थिक कोंडी केली गेली, तर काही ठिकाणी त्यांचे थेट शिरकाण करण्यात आले. मुख्य प्रवाहातून पर्यावरणाच्या बातम्याच गायब झाल्याने लोकांना या प्रश्नांचा सरळसरळ विसर पडला आणि आज जेव्हा ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या या संकटाला जग सामोरे जाते आहे तेव्हाही या समस्येकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलतो आहे, असे खात्रीने कुणी म्हणू शकणार नाही?
आपल्यापैकी बरेचजण कुठल्याना कुठल्या उद्यानात गेले असतील. बहुतेक मोठ्या वनस्पती-उद्यानांमध्ये आणि शेतकी महाविद्यालयांत, तसेच विद्यापीठांच्या वनस्पतीशास्त्र विभागांमध्ये आपल्याला हरितगृह किंवा काचेचे घर बघायला मिळते. याचे छप्पर हिरव्या काचांचे असते. या घरात अनेक अनोख्या वनस्पती जोमाने वाढत असतात. त्या काचगृहात सूर्यकिरण थेट प्रवेश न करता त्यांची तीव्रता कमी करूनच प्रवेश करू शकतात. त्यामुळे या काचगृहातील हवा तापते; पण या तापलेल्या हवेतील उष्णता मात्र या काचेतून बाहेर जाऊ शकत नाही. याचा फायदा घेऊन अगदी थंड प्रदेशातसुद्धा विषुववृत्तीय दुर्मिळ वनस्पती वाढवणे सहज शक्य होते. या काचगृह किंवा हरितगृहाचा आणि जागतिक तापमानवाढीचा संबंध काय, असे आपल्याला वाटेल. आपण कार्बनी इंधन जाळतो. पेट्रोल, डिझेल या इंधन तेलांच्या वापरातून कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतात. ते गरम असतात आणि हवेपेक्षा हलके असतात. त्यामुळे ते वातावरणात उंचावर जात राहतात. याचबरोबर कोळशावर आधारित विद्युत प्रकल्प म्हणजे थर्मल पॉवर प्लांटद्वारे पाण्याची वाफ, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि सीएफसी (क्लोरोफ्लुरोकार्बन्स) वातावरणात मानवी उद्योगांचा (म्हणजे केवळ इंडस्ट्री नव्हे, तर इतरही व्यवहार) परिणाम म्हणून मिसळत राहतात. यातले सीएफसी नैसर्गिकरित्या आढळत नाहीत. ते शंभर टक्के मानवनिर्मित असतात. याचे वातावरणातले एकूण प्रमाण अत्यल्प असते. ते सगळे मिळून वातावरणाच्या इतर घटकांपुढे नगण्य ठरतात. त्यांची गोळाबेरीज एक टक्क्याच्या काही शतांश भाग एवढीसुद्धा नसते; पण ज्याप्रमाणे विषाचा एक थेंबदेखील प्राणघातक ठरू शकतो, किंवा मिठाचा एक खडा दूध फाडू शकतो त्याचप्रमाणे एकूण वाताव्ारणाच्या एक टक्क्याच्या शतांश भागाहून कमी असलेले हे वायू पृथ्वीच्या वातावरणाचा नूर बदलून टाकतात. याचे कारण, हे वायू उष्णता शोषून ती साठवून ठेवू शकतात. दिवसा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. त्यामुळे पृथ्वी तापते. प्रकाशकिरण या हरितगृहवायूंतून म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस, आरपार जाऊ शकतात. शास्त्रीय भाषेत हरितगृहवायू प्रकाशासाठी पारदर्शक ठरतात, असे म्हटले जाते. या प्रकाशाचा परिणाम पृथ्वी तापण्यात होतो. म्हणजे प्रकाशऊर्जेचे रूपांतर उष्णतेत होते. रात्री पृथ्वीचा हा भाग थंड व्हायला सुरुवात होते. म्हणजे ही उष्णता जमिनीतून बाहेर पडून अवकाशात परतायचा प्रयत्न करते. त्यावेळी वातावरणातील हे वायूंचे रेणू ही उष्णता साठवतात. ही उष्णता त्या रेणूंना ओलांडून अवकाश पोकळीत जाऊ शकत नाही. यामुळे अवकाशाचे सरासरी तापमान वाढते. हे तापमान त्यांच्या आसपासच्या रेणूंनाही दिले जाते. जेवढ्या प्रमाणात या हरितगृहवायूंचे प्रमाण वातावरणात वाढते, तेवढ्या प्रमाणामध्ये वातावरणाचे सरासरी तापमान वाढत जाते.
१९व्या शतकात औद्योगिक क्रांती घडल्यावर फार प्राचीन काळी गाडल्या गेलेल्या जंगलांचा मानवाने इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. जंगले गाडली गेली, तेव्हा काही सूक्ष्म प्राणीही गाडले गेले. अशा अनेक घटना पृथ्वीवर सतत घडत असतात; म्हणून आपली पृथ्वी ही एक चल प्रणाली (डायनॅमिक सिस्टीम) मानली जाते. या घटना का व कशा घडतात, हे सांगायला गेलो तर पोथ्यांमध्ये लिहितात त्याप्रमाणे ‘ग्रंथ विस्तारेल;’ पण या घटना घडताना प्रचंड दाब निर्माण होतो, उष्णता निर्माण होते. ग्लोबल वार्मिंग का वाढत आहे? त्याची काही सोपी उदाहरणे, जी मानवाच्या ऐशोआरामाच्या जीवनशैलीशी निगडित आहेत. सध्याच्या घडीला जगभरामध्ये तापमान वाढीला सुरुवात झालेली आहे, यालाच ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतात, तर तापमानात वाढ का होते आहे आणि त्यामुळे कुठे प्रचंड पाऊस पडतोय, तर कुठे गारा पडतात. पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. हे पर्यावरण संतुलन का बिघडले? तर त्याला कारण आपण स्वतः आहोत. लोकांना हे कळतच नाही, की आपण स्वतः हीटर लावून ठेवले आहे. तर हे हीटर कशा पद्धतीचे आहे? एअर कंडिशनर हे एक हीटर आहे! आज जगामध्ये ज्या अवाढव्य पद्धतीने एअर कंडिशनिंग वाढत चाललेले आहे, त्याची कुणीही कल्पना करत नाही. एअर कंडिशनिंग म्हणजे आतली खोली थंड करायची, मात्र ते एअर कंडिशनर बाहेर जी हवा फेकते, ते हीटरच आहे. त्याचबरोबर गाड्यांमध्ये तुम्ही पेट्रोल जाळता, म्हणजे गाड्यांच्या एक्झॉस्टमधून बाहेर पडणारा धूर म्हणजेच प्रत्येक गाडीला तुम्ही एक हीटर लावला आहे आणि इतके असे कोट्यवधी हीटर लावून ठेवल्याने शेवटी होणार काय?
क्लोरोफ्लुरोकार्बन्स (सीएफसी) या कुटुंबातील वायूंचा हरितगृह परिणाम करणारे वायू म्हणून आधी उल्लेख आलेला आहे. हे वायू मानवनिर्मित असून ते १९४०च्या सुमारास वापरात आले. हे कृत्रिम वायू आपल्या प्रâीजमध्ये, एरोसोल कॅनमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगात प्रामुख्याने शीतलीकरणासाठी वापरले जातात. सध्याच्या हरितगृह परिणामाच्या निमिर्तीत २५ टक्के वाटा या वायूंचा आहे. हे वायू पृथ्वीजवळ असताना फारसे नुकसान करीत नाहीत. ते वातावरणाच्या वरच्या थरात जातात, तेव्हा त्यांच्या विघटनातले घटक ओझोन या ऑक्सिजनच्या (ध्३) या रूपाचे ऑक्सिजनच्या सामान्य रूपात (ध्२) रूपांतर करतात. हा जो ओझोन वायूचा थर आहे, तो सूर्याकडून येणार्या अल्ट्राव्हायोलेट प्रावरणांपासून आपले रक्षण करतो. ही प्रावरणे वातावरण तापवतातच; पण त्यांच्यामुळे त्वचेच्या कर्करोगासह इतरही व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. पृथ्वीचे सरासरी तापमान वाढणे, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते वाढले की ते झपाट्याने कमी होणे, त्यानंतर हिमयुगाची निमिर्ती होणे हे एक चक्र गेली कित्येक कोटी वर्षं चालू असावे. गेली काही लाख वर्षं ते नक्कीच चालू आहे, असे आपण म्हणू शकतो. याचे कारण गेल्या काही लाख वर्षांतील वातावरणातील बदलांचे पुरावे आपल्यासाठी निसर्गानेच जपून ठेवले आहेत. यामुळेच गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्याने तापमानवाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. आता आपण तापमानवाढीचा परिणाम काय करेल हे बघू या. ग्रीनलंड आणि ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळला, की ते पाणी अटलांटिक सागरात मिसळेल. त्यामुळे गल्फ स्ट्रीम थंडावेल. थंड पाणी सागरतळाकडे जाते. त्याप्रमाणं तो गल्फ प्रवाहही थंड पडून सागरतळी जाईल आणि तसाच पुढे युरोपकडे जाऊन दक्षिणेकडे वळेल. यामुळे युरोप गोठेल.
दुसरे म्हणजे इतके गोड पाणी सागरात मिसळल्यामुळे सागराचा खारटपणा कमी होईल. त्यामुळे गल्फ स्ट्रीम फार खोल बुडणार नाही; कारण त्याची घनता कमी झालेली असेल. याचा परिणाम हा उष्णतावाहक प्रवाह मंद होऊन हळूहळू थांबण्यात होईल. जे गल्फ स्ट्रीमचे, तेच एल निनोचे. त्याच्यात दक्षिण ध्रुवीय गार पाणी मिसळेल. ज्यावर्षी एल निनो जोरात असतो, तेव्हा भारतात अवर्षण असते. यामुळे भारतात काही भागांत पर्जन्यमान वाढते. अलीकडच्या काळात ढगफुटीचे वाढलेले परिणाम, हे त्याचे जिवंत उदाहरण. एल निनो थंडावल्यामुळे पडणारा पाऊस इतरत्र पडेल. राजस्थान में सुखा, बिहार में बाढ, ही नेहमीची बातमी ‘बिहारमध्ये अवर्षण राजस्थानात पूर’ अशी उलटी होण्याची शक्यता वाढते. नुकतेच दुबईमध्ये पावसाने जो हाहाकार माजवला ते लक्षात घ्या.नियोजनाच्या बाबतीत आपली एकंदरीत ओरड बघता, यामुळे माजणारा हाहाकार कसा असेल याची कल्पनाच केलेली बरी. जेव्हा जेव्हा जगात जिथे जिथे सतत अतिवृष्टी किंवा सतत अवर्षणाची परिस्थिती असते, तेव्हा तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते, हेही इथे लक्षात ठेवायला हवे. जेव्हा जागतिक तापमान वाढते तेव्हा काही ठिकाणी दुष्काळ पडतो, तर काही ठिकाणी अतिवृष्टी व्हायला सुरुवात होते. जिथे दुष्काळ पडतो तिथे कुपोषणजन्य आजार वाढतात, त्याप्रमाणे गुन्हेगारीतही वाढ होते. याउलट जिथे अतिवृष्टी होते तिथे पाण्यातून पसरणारे रोग म्हणजे कॉलरा, नारू असे रोग, तसेच डासांमुळे पसरणारे विविध रोग वाढतात. ज्या ठिकाणी पूर्वी शुष्क भाग होता, तिथे जेव्हा अशी अतिवृष्टी होऊ लागते तेव्हा तिथल्या व्यक्ती अशा रोगांना झपाट्याने बळी पडतात; याचे कारण या भागात यापूर्वी पाण्याबरोबर किंवा पाण्यातून पसरणार्या रोगांचे प्रमाण कमी असल्यामुळे तिथल्या व्यक्तींच्या शरीरात या रोगांबाबतची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी प्रमाणात असते. जागतिक तापमानवाढ रोखायची, तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातला एक उपाय म्हणजे झाडे वाढवणे. सध्याचे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे, तर त्याची निमिर्ती कमी करायला हवीच; पण जंगलांखालची भूमी सध्याच्या वीस ते तीस पट वाढवायला हवी. या योजना अजून कागदावरसुद्धा नाहीत. त्यामुळे त्या कधी अंमलात येणार आणि कधी कार्बन डायऑक्साईड नष्ट करणार हा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात वणव्यांनी फारच उग्र स्वरूप धारण केले होतेच; पण तिथल्या गहू पिकविणार्या पट्ट्यात दुष्काळ पडला होता.
ऑस्ट्रेलिया तर या दोन्ही गोष्टींनी फार पोळला आहे. भारताची लोकसंख्या मोठी आहे. शिवाय इथे गरिबी आणि विषमताही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीचे मोठे परिणाम भारताला भोगावे लागतील. मात्र, वरील काही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल, की आपल्या गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक चक्रात मानवाने हस्तक्षेप करून स्वतःसाठीच ‘हीटर’ लावला आहे. वेळीच सावरले नाही, तर हा ‘हीटर’ तुम्हाला जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कोरोना काळात केवळ वाहने बंद होती, त्या काळात वातावरण किती शुद्ध झाले होते हे लक्षात घ्या. एअर कंडिशन्ड घरे, मॉल, हॉटेल्स, हॉस्पिटल्स न बांधता ती पर्यावरण सुसंगत बांधणे, एअर कंडिशनिंगला जागृत नागरिकांनी विरोध करणे, थर्मल पॉवरऐवजी हायड्रो पॉवर किंवा सोलर पॉवर प्लांट उभारणे, प्रचंड वृक्ष लागवड करणे, पाण्याचे साठे उभारणे, रसायन मुक्त शेती, नवीन रस्ते बांधताना वृक्ष कटाई न करता ते असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने म्हणजे तिहेरी बांधणे, असे अनेक उपाय तातडीने अंमलात आणणे ही काळाची गरज आहे.
प्रतिक्रियांकरिता:
९८२२५९३९२१ वर ‘थेट प्रकाश पोहरेंना कॉल करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्सअपवर पाठवा’.
‘प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव,
गाव लिहायला विसरू नका’.
प्रकाश पोहरे
मो. नं.: +९१-९८२२५९३९२१