देश स्वातंत्र्याच्या तब्बल वर्षभरानंतर उगवली स्वातंत्र्याची पहाट
राजुरा :- स्वतंत्र भारताच्या इतिहासात हैदराबाद मुक्ती संग्राम ( Hyderabad Liberation War ) लढ्याला अतिशय महत्वाचे स्थान आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अथक परिश्रमातून १७ सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद स्टेट सह मराठवाडा आणि राजुरा क्षेत्र स्वतंत्र झाले. यावेळी तेव्हाचा राजुरा व आताचे तीन तालुके राजुरा, कोरपना व जिवती (Rajura Korpana and Jivati) हे मुक्त झाले.
आपला देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हा प्रांत निजामशाहीच्या पारतंत्र्यात (Nizamshahi) होता. तब्बल १ वर्ष १ महिना २ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राजुऱ्यात स्वातंत्र्याची पहाट उगवली. निजामशाहीत असलेला तेव्हाचा आंध्रप्रदेश, आता तेलंगणाही, कर्नाटकातील काही भाग आणि मराठवाडा व आताच्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या सर्व भागाला मुक्तीसंग्राम लढ्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. यातील राजुरा भाग मात्र अनेक वर्ष विकासापासून दुर्लक्षित राहिला. सोयीसुविधा, विकास कामे, रस्ते, पाणी, वीज यापासून हा भाग बरेच वर्ष वंचित होता. संपुर्ण मराठवाड्यात शासकीय सुट्टी जाहीर असतांनाही ती राजुरा भागाला मिळत नव्हती. स्वातंत्र्याची ही प्रेरणा प्रज्वलित करून इतिहासाचा मागोवा घेत मार्गक्रमण करणे, ही लोकांच्या प्रगतीला तारक अशी बाब ठरते. हे लक्षात घेऊन तत्कालीन आमदार अँड. वामनराव चटप (MLA & Vamanrao Chatap) यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून त्यांच्या अथक प्रयत्नांतून अखेर शासनाने दखल घेऊन सन २००६ पासून ध्वजारोहण करण्याचे आदेश आणि शासकीय सुट्टी जाहीर केली. राजुरा क्षेत्रात राजुरा, कोरपना व जिवती हे तीन तालुके येतात. राजुरा हे मुख्यालयाचे शहर आता चाळीस हजार लोकसंख्येचे आहे.
शहरात यादव कालिन (Yadav Kalin ) सोमेश्वर मंदिर असून हे पुरातन मंदिर राजुरा साठी भूषणावह आहे. ‘या भागात असलेल्या चार सिमेंट कंपन्यां, वेकोलिच्या कोळसा खाणी, त्यामुळे वाढलेली ट्रान्सपोर्ट व्यवसाय यामुळे मोठ्या प्रमाणात देशातील सर्व प्रांतातील लोक इथे रोजगारासाठी आले आणि याच भूमीला कर्मभूमी समजून येथेच स्थायिक झाले. या भागात कापूस, सोयाबीन व मिरची पिकांच्या उत्पादनामुळे येथे ग्रामीण भागात काही प्रमाणात का होईना, सुख समृद्धी आली. जिवती हा डोंगराळ, आदिवासी भाग असून तेथील लोकांनी अत्यंत श्रमाने शेती कसली. या संपूर्ण भागात चांगले रस्ते झाले. वर्धा नदीवर सात पूल झाले. यामुळे या भागाच्या प्रगतीचे मार्ग खुले झाले. याभागाची काही दृष्टीने बघता प्रगती झाली असली तरी अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. सीमेंट कंपनी, वेकोलिच्या येथील लोकांच्या समस्या अधिक बिकट ही झाल्या आहेत. येथील बेरोजगारांना काम उपलब्ध होत नाही,
वेकोलिच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर न्याय मिळत नाही. सीमेंट कंपन्यांना पाणी दिल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही, तिस – चाळीस वर्षापासुन शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना साठ वर्षा पूर्वीचे पुरावे मागत असल्याने गैर आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळत नाही, आदिवासींच्या प्रगतीचा वेग वाढविण्याची गरज आहे. त्यांच्या विकासासाठी शासकीय योजना त्यांचेपर्यत पोहचत नाही. बँका त्यांना सहकार्य करीत नाही. संपूर्ण ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती चांगली नाही. या सर्व बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. राजुरा क्षेत्राच्या विकासासाठी अनेक आणि मोठ्या संधी आहेत. येथे शेतकऱ्यांच्या शेतीच्या सिंचनासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. राजुरा भागात पर्यटन क्षेत्र विकसित होण्यासाठी अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेले भाग आहेत. मात्र हे सर्व विकसित करण्याची गरज आहे. या दिवसाची आठवण निरंतर रहावी, म्हणुन राजुरा मुक्ती दिन उत्सव समिती मुक्तिसंग्राम दिनाचे थाटामाटात आयोजन करीत आहे. मात्र कोरोना काळात मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात दोन वर्षांचा खंड पडला असला तरी आता मात्र आगामी काळात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत नव्या जोमाने कार्य करीत राजुरा क्षेत्र प्रगतीचे नवीन टप्पे गाठत राहील, यात शंका नाही.