जी गोष्ट घरातूनच शिकवून, रुजवून केल्या गेली पाहिजे, ते सुसंस्कार घरा-घरात प्रत्यक्ष दिसतच नाही, किंबहुना शिल्लकच राहिले नाही, ते सर्व संस्कार आता बाहेरुन मग ते बाजारातून असो वा सेवाकार्यातून, धर्मकार्यातून मुलांवर व्हावेत, अशी अपेक्षा पालक करीत आहेत. जे कुटुंब हिताचेच नव्हे तर समाज व राष्ट्रहिताचे पण आहेत ते संस्कार मुलांनी रोज पालकांना पाहून स्वत:मध्ये रुजविले पाहिजेत, मात्र कुटुंबात मुलांना काय आवश्यक आहे ते न देता, मुलांची काय इच्छा व मागणी आहे, ते देऊन फक्त ‘लाड’ पुरविण्याचे कार्य केले जाते, आणि येथेच संस्कार संपतात.
अच्छे संस्कार किसी मॉल से नही,
परिवार के माहौल से मिलते हैं।
यावर्षी उन्हाळ्यात राज्यभरात बाल सुसंस्कार शिबिरांचे आयोजन खूप मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे अनुषंगाने विदर्भात व त्यातही प्रामुख्याने वर्हाडात ६० ठिकाणी यंदा बाल सुसंस्कार शिबिरे घेण्यात येत आहेत. तर वारकरी बाल शिबिर व इतरही बाल सुसंस्कार शिबिरे तसेच ब्रह्माकुमारीज्चे आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर अशा वेगवेगळ्या शेकडो बाल सुसंस्कार निशुल्क शिबिरात हजारो लहान मुले सहभागी झाली आहेत. आयोजक, दानदाते, सहकार्यकर्ते, कार्यकर्ते व पालक या सर्वांचे भरपूर सहकार्य अशा शिबिरात होत असते, ही कौतुकाची बाब आहे.
बाल संस्कार शिबिरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे, ही काळाची गरज आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर संस्कार होतील, मोबाईलपासून व व्यसनांपासून विद्यार्थी दूर राहतील, भारतीय संस्कृती, परंपरा व आध्यात्मची ओळख होईल. आजचे विद्यार्थी उद्याचे चांगले नागरिक होतील, वगैरे अनेक विचार या शिबिराला चालविणार्या व भेट देणार्यांनी व्यक्त केले आहेत. तर या शिबिरातून सत्य, अहिंसा, इमानदारी, मोठ्यांचा आदर, साधी राहणी व उच्च विचारसरणी, नम्रता, प्रेम, शांती, आदी शाश्वत नीतीमुल्यांची पायाभरणी होईल, असा विश्वासही सर्वांना आहे. त्यामुळेच अशा शिबिरांचे समर्थन व आयोजन केले जात आहे. मात्र मुळातच हे सर्व संस्कार शिबिरातूनच का व्हावे? घरा-घरातून का होऊ नये? याचा फारसा विचार कोणी करत नाही. प्रत्यक्षात जी गोष्ट घरातूनच शिकवून, रुजवून केल्या गेली पाहिजे, ते सुसंस्कार घरा-घरात प्रत्यक्ष दिसतच नाही, किंबहुना शिल्लकच राहिले नाही, ते सर्व संस्कार आता बाहेरुन मग ते बाजारातून असो वा सेवाकार्यातून, धर्मकार्यातून मुलांवर व्हावेत, अशी अपेक्षा पालक करीत आहेत.
जे कुटुंब हिताचेच नव्हे तर समाज व राष्ट्रहिताचे पण आहेत ते संस्कार मुलांनी रोज पालकांना पाहून स्वत:मध्ये रुजविले पाहिजेत. मात्र कुटुंबात मुलांना काय आवश्यक आहे ते न देता, मुलांची काय इच्छा व मागणी आहे, ते देऊन फक्त ‘लाड’ पुरविण्याचे कार्य केले जाते, आणि येथेच संस्कार संपतात आणि कुसंस्कारांना चालना मिळते, हे पालकांना कळत नाही, असे नाहीच. मात्र ‘आमचा नाईलाज आहे,’ असे पालक सांगतात. उलट संस्काराचे, मुले चांगले घडविण्याचे काम शाळेतील पगारी शिक्षकांनी करावे, ते त्यांचेच काम आहे, असे बोलून मोकळे होतात. वास्तविक मुलांचे झाले की, अशा पालकांचेही सुसंस्कार शिबिरे झाली पाहिजेत, असे वाटते. त्यातून पालकांच्या जबाबदारी व कर्तव्याचे धडे दिले पाहिजेत. त्याशिवाय कितीही बाल सुसंस्कार शिबिरे झालीत तरी फारसा सकारात्मक परिणाम समाजात दिसणार नाही. अनेक बाल संस्कार शिबिरात राजकीय नेत्यांना व इतर प्रतिष्ठितांना बोलाविण्यात येते. त्यांच्या भेटीच्या बातम्याही फोटोसह दिल्या जातात. ते मुलांना चार चांगल्या गोष्टी सांगतात, मार्गदर्शनही करतात. प्रत्यक्षात त्यांचा राजकीय व्यवहारात सुसंस्काराशी संबंधच काय असतो? आज सुसंस्काराने राजकारण व इतर व्यवसाय चालत आहेत काय? प्रतिष्ठितांचे बोलणे व प्रत्यक्ष वागण्यात किती फरक आहे. निवडणुकीत तरुण कार्यकर्त्यांना पैसे, दारु व पार्ट्या देणारे राजकारणी काय संस्कार करणार?
दुसरीकडे समाजात अवैध व्यवसाय, दारु, गुटखा, बेईमानी, फसवणूक, जातीयवाद, धर्मवाद, हाणामारी वगैरे दिवसेंदिवस वाढत आहे. राजकारण्यांनी, अधिकार्यांनी व इतर प्रतिष्ठितांनी हे सर्व वाढवावे, यात भर घालावा आणि लहान मुलांना सुसंस्कार देण्याची बतावणी करावी, हे सर्व विरोधाभासी आहे. प्रत्यक्षात मोठ्यांकडे पाहूनच मुले जास्त शिकतात, तेव्हा त्यांचे समोर आई-वडील, कुटुंबीय व गुरुजी हेच प्रथम संस्कार करणारे खरे आदर्श असतात, हे विसरुन चालणार नाही. सद्यस्थितीत समाजात सर्व काही बिघडले आहे, तेथे आपण एकटे काय करणार?
असे विचारण्यापेक्षा आपणच चांगल्याची सुरुवात करणे, हे महत्त्वाचे आहे. सुसंस्कार बाल शिबिरात जाऊन शिकून आलेल्या मुलांमध्ये चांगल्या सवयी व विचारांना सतत तेवत ठेवण्याचे कार्य पालकांना व कुटुंबियांना करावे लागेल, तरच शिबिराचा हेतू साध्य होईल. एवढे मात्र खरे!
शेवटी घरा-घरातूनच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, नाहीतर मुलांवर दुष्परिणाम होणारच, या आशयाच्या ओळी आठवतात…
जिस गांव में बारिश ना हो,
वहां की फसलें खराब हो जाती है,
जिस घर में शिक्षा और संस्कार ना हो,
तो वहां की नस्ले खराब हो जाती हैं।
राजेश राजोरे
९८२२५९३९०३
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या
बुलढाणा आवृत्तीचे संपादक आहेत.)
खामग्ााव, जि. बुलढाणा