यंत्रणा आहे ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी… मात्र पदाचा धाक दाखवून वसुली करण्यात यंत्रणा मस्त आहे. या यंत्रणेच्या मस्तवालपणात मात्र निष्पाप बळी जातात; पण त्यांना काय देणे- घेणे…?
सामान्य लोकांना उच्चारायला कठीण असलेला ‘पोर्शे’ हा शब्द गेल्या काही दिवसांपासून मीडियातून सतत हॅमर होतोय. एका महागड्या गाडीचं हे नाव. पुण्यात एका श्रीमंताच्या अल्पवयीन मस्तवाल पोराने दारूच्या नशेत झिंगत बेदरकारपणे ती कार (पोर्शे) चालवत दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला. या घटनेनंतर नागरिकांचा दबाव आल्याने फार वेगवान घडामोडी घडल्या. झोपलेल्या समस्त यंत्रणाही खडबडून जाग्या झाल्यात. त्या मस्तवाल मुलासारखीच यंत्रणाही किती मस्तवाल झाली आहे, हे या घटनेच्या निमित्ताने समोर आले. घटना अत्यंत निंदनीय आहे. पैशाची मस्ती चढलेल्या या मिसरूड न फुटलेल्या मुलांना दुसर्यांचे जीव घेण्याचा अधिकार दिला कोणी? वाहतूक सिग्नल असताना ट्रिपल सीट, विना हेल्मेट सिग्नल ब्रेक करून बिनधास्त जाणार्या मुलांवर कोणाचा अंकुश आहे? नियमाने वाहन चालवणार्यांचा जीव यामुळे धोक्यात येतो, हे त्यांना कळत कसे नाही? एका सर्वेक्षणानुसार १५ ते २४ वयोगटातल्या या बेभान तरुणाईच्या हातातल्या गाडीने बहुतांश अपघात होतात. नागपुरात काही महिन्यांपूर्वी अशाच एका अल्पवयीन मुलाने मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेला चिरडले. तरुणाईचे असे वागणे हा संस्काराचा भाग आहे. श्रीमंत पालकांचे आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाणार्या दाम्पत्यांचे आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होत आहे, हे नाकारून चालणार नाही. पुण्याच्या घटनेनंतर एक एक तथ्य समोर येत आहे.
पुण्यातील विशाल अग्रवाल याच्या मस्तवाल मुलाची तक्रार खुद्द प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली यांनी शाळा प्रशासन आणि पालकांकडे केली होती; मात्र या तक्रारीकडे पालकांनी दुर्लक्ष केले. पालकांच्या या भूमिकेमुळे तनपुरे यांच्या मुलाला शाळा बदलवावी लागली. मुलांचे गुन्हे माफ करून त्यांचे हवे ते हट्ट पुरविल्यामुळे ते बेधुंदपणे वागू लागतात. पुढे त्यांना वेसण घालणे कठीण होऊन बसते. या प्रसंगात वडिलांनी मुलाला पोर्शे ही महागडी कार दिली. दारू पिण्याची परवानगी दिली. वाट्टेल तितके पैसे उडविण्याची मुभा दिली. दारू पिऊन गाडी चालवत असताना त्याच्या वेगवान ‘पोर्शे‘ने दुचाकीला धडक दिली आणि दोन निष्पापांना जीव गमवावा लागला. पालकांनी वेळीच दखल घेऊन मुलाला समज दिली असती, तर अशा घटना टाळता आल्या असत्या. हा झाला पालकांच्या संस्काराचा भाग. अर्थातच पुण्यात घडलेल्या अपघाताला पालक दोषी आहेतच; पण पालकांइतकीच यंत्रणादेखील दोषी आहे. यंत्रणा किती सुस्त आहे, किती मग्रूर आहे आणि दिखावा करणारी आहे, हे या निमित्ताने समोर आले. अपघात झाल्यानंतर त्या बेधुंद अल्पवयीन चालकाला नागरिकांनी चांगलेच धुतले. पोलिसांच्या स्वाधीन केले. तिकडे मात्र पोलीस ठाण्यात या आरोपीची चांगलीच बडदास्त ठेवण्यात आली. पोलीस ठाण्यात त्याला पिझ्झा देण्यात आला, या आरोपाची अद्यापही शहानिशा करण्यात आली नाही. अपघात झाल्यानंतर आरोपीच्या वडिलांचा अर्ध्या रात्री फोन जातो. आमदार अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची चौकशी न करता आरोपी मुलाबद्दल विचारणा करतात, यापेक्षा दुर्दैव कोणते?
नोंदणी नसलेली एक महागडी कार काही महिन्यांपासून पुण्याच्या रस्त्यावर धावते, त्याची साधी तपासणी होत नाही. एक अल्पवयीन मुलगा पबमध्ये दारू प्यायला येतो, त्याला अडविले जात नाही, मध्यरात्रीनंतर एक कार पुण्याच्या रस्त्यावरून तुफान वेगाने धावते, तरीही नाकाबंदी करणार्या कुण्याही पोलिसांच्या लक्षात येत नाही. शहरात अतिक्रमण करून अनेक पब राजरोसपणे चालतात, त्यांच्यावर कारवाईचा हातोडा मनपातर्पेâ मारला जात नाही, ड्रंक अँड ड्राईव्हचा कायदा असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, हे यंत्रणेचे अपयश आहे. पुण्यातील अपघात झाल्यानंतर नागरिकांच्या दबावाने शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक पुणे पोलीस आयुक्तालयात जातात. पोलिसांना निर्देश देतात. तोपर्यंत यंत्रणा मात्र सुस्तच. या घडामोडीनंतर आरोपी मुलाच्या वडिलांना अटक होते. आरोपी ज्या पबमध्ये दारू पितो, त्या पब मालकाला, व्यवस्थापकाला अटक केली जाते. महानगरपालिकाही खाडकन जागी होते. कोरेगाव पार्कमधील अतिक्रमित पबवर बुलडोझर चालविला जातो आणि तो पब भुईसपाट होतो; मात्र इतक्या वर्षांपासून विनापरवानगी चालत असलेल्या या पबकडे प्रशासनाचे लक्ष कसे गेले नाही? हे एक कोडेच आहे.
विशेष म्हणजे उत्पादन शुल्क विभागालाही या घटनेनंतरच साक्षात्कार होतो आणि कायद्याच्या कसोट्या कळतात. अल्पवयीन मुलांना दारू दिली, तर बार मालकांवर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा फतवा काढला. नियम, कायदा पूर्वीचेच आहेत. त्याची अंमलबजावणी नाही. यंत्रणा भ्रष्ट झाली आहे. चंद्रपूरचा लाचखोर उत्पादन शुल्क अधिक्षक महिन्याचे सव्वा कोटी रुपये कमावतो. बार मालकांकडून होणारी ही वसुली आहे. ही वसुली या अधिकार्यापुरती राहत नाही. हे जाळे दूरवर पसरले आहे. सारी यंत्रणाच पोखरली जात आहे. ही केवळ पुण्यातील घटना असल्याने आणि नागरिकांचा प्रचंड दबाव आल्याने यंत्रणा अलर्ट झाली. आम्ही किती तत्पर आहोत, हे दाखवण्याचाच प्रयत्न सुरू आहे. इतर वेळी मात्र सारेच सुस्त असतात. यंत्रणा आहे ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी… मात्र पदाचा धाक दाखवून वसुली करण्यात यंत्रणा मस्त आहे. या यंत्रणेच्या मस्तवालपणात मात्र निष्पाप बळी जातात; पण त्यांना काय देणे- घेणे…?
आनंद आंबेकर
९८५०३८८६१३
कार्यकारी संपादक, देशोन्नती