निर्यातक्षम भेंडीचे निकष:- निर्याक्षम भेंडी असण्यासाठी फळे कोवळी, गर्द हिरव्या रंगाची, दिसायला आकर्षक व लुसलुशीत असावीत. फळांची लांबी ७.५ ते १० सें.मी. एवढी लांब, सरळ व पाचधारी असावीत. फळांची टोके निमुळती, टवटवीत व देठासह असावीत. फळावर लव (केसासारखे मऊ काटे) असू नयेत. फळाचा पृष्ठभाग गुळगुळीत सरळ असावा. फळे निरोगी असावीत. तसेच कीटकनाशकांचे व बुरशीनाशकांचे रासायनिक अवशेष शिल्लक नसावेत.
वाण:– भेंडीच्या अर्का अनामिका, फुले विमुक्ता, परभणी क्रांती, अर्का अभय, या सुधारित जाती तर संकरित जातींमधील महाबीज ९१३ (तर्जनी), फुले कीर्ती या जाती निर्यातक्षम भेंडीसाठी योग्य आहेत.
अर्का अनामिका- आय. आय. एच. आर. बेंगलोर येथे विकसित झाली असून खूप लोकप्रिय आहे. या जातीची झाडे उंच वाढतात. फळे गर्द हिरव्या रंगाची, गुळगुळीत व लांब असतात. फळांचे देठ लांब असल्याने काढणी करताना लवकर उरकते. पुसा सावनी व इतर प्रचलित जातींपेक्षा उत्पादन अधिक मिळते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे.
२) परभणी क्रांती- फळे व ८ ते १० सेंमी. लांबीची असतात. खरीप, उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य जात आहे.
३) अर्का अभय- अर्का अनामिकासारखीच या जातीची फळे असून विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून दोन बहार मिळतात.
४) पुसा सावनी– ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून विकसित झाली असून फळे १० ते १५ सेंमी लांब असून झाडांवर काटेरी लव असते. झाडांचे खोड, देठ आणि पानांच्या खालील बाजूस हिरवा रंग असून त्यावर तांबूस छटा आढळून येते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे. या जातीच्या झाडांची फुले पिवळ्या रंगाची असून फुलांच्या प्रत्येक पाकळीवर देठाकडील भागावर जांभळ्या रंगाचा ठिपका असतो. सरासरी एकरी ४ ते ५ टन उत्पादन मिळते.
संकरित भेंडी-१) महाबीज ९१३ (तर्जनी) – या जातीची भेंडी ४५ ते ४६ दिवसात तोडणीला येत असून पिकाचा कालावधी १०० ते ११० दिवस आहे. फळे मध्यम लांब (१० ते १२ सेमी) असून सर्वसाधारणपणे एकरी १० ते ११ क्विंटल उत्पादन मिळते.
२) फुले किर्ती- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या वाणाची शिफारस केली आहे. फळे हिरव्या रंगाची असून खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामामध्ये लागवडीसाठी योग्य जात आहे. ही जात केवडा रोगास प्रतिकारक्षम आहे.
बियाण्याची निवड व बियाणे उपचार: विषाणूला प्रतिकारक, फळाला व देठाला हिरवा रंग असणारी, फळे पाचधारी असणारी, रोग व किडींना प्रतिकारक्षम, चांगले उत्पन्न देणारी अशा जातीच्या बियाण्याची निवड करावी. बियाण्याची निवड केल्यानंतर बियाण्याची टोकणी किंवा पेरणी करण्यापूर्वी २४ तास साध्या पाण्यात किंवा क्लोरमेक्वॅट क्लोराईड १०० पीपीएम (१० मिलीग्रॅम १ लिटर पाण्यात) द्रावणात किंवा ५० पीपीएम जीबेरेलिक अॅसिड द्रावणात भिजत ठेवल्यास रोपे लवकर उगवून येतात व जोमदार वाढ होते. त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.
गजानन तुपकर
विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)
कृषी विज्ञान केंद्र, अकोला