मागच्या दोन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. सुरुवातीला एनडीएसाठी ही निवडणूक सहज सोपी वाटत होती. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील सावळागोंधळ भाजपच्या पथ्यावर पडेल असेच चित्र समोर येत होते, परंतु मोदी सरकारच्या विरोधात जनभावना बरीच तीव्र होती आणि या जनभावनेनेच विरोधी पक्षांच्या आघाडीला नकळतपणे मजबुती प्रदान केली. जनतेच्या या अनपेक्षित प्रतिसादाने विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही वेगळेच स्फुरण चढले आणि त्यांनी मोदींच्या प्रचारातील प्रत्येक मुद्दा प्रभावीपणे खोडून काढायला सुरुवात केली. ईडीचा अनिर्बंध वापर, विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न आणि विरोधी पक्ष फोडण्याचे कारस्थान या सगळ्याचा एकत्रित परिणाम भाजप विरुद्ध प्रतिकूल जनमत तयार होण्यात झाला. त्यामुळे भाजपच्या प्रभावक्षेत्रातच भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली. मतदानाच्या पहिल्या तीन टप्प्यानंतर भाजप आणि आघाडी बरीच माघारली असल्याचे चित्र समोर आले. लोकसभेत ‘अकेला मोदी ही काफी है’ अशी गर्जना करणारे मोदी शेवटी खरोखरच आपल्या एकट्याच्या जोरावर भाजपची संपूर्ण प्रचार यंत्रणा वाहून नेण्यास बाध्य झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीतील भाजपचा जय आणि पराजय यांच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती उभी असल्याचे दिसते. ती व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी.
इंडिया’विरोधात एकासएक लढाई झाली तर भाजपचे काही खरे नाही असे भाजपमधीलच काही नेते खाजगीत बोलू लागले आहेत. हे देशातील राजकीय वातावरण बदलू लागल्याचे संकेत म्हणावे लागतील. त्यात आता तिहार तुरुंगातून बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजप समोर नवे आव्हान उभे करीत असल्याचे दिसते. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये अरविंद केजरीवाल भाजपला जड जाऊ शकतात याचा अंदाज आल्यानेच कोणत्याही परिस्थितीत त्यांना एक तर बदनाम करणे किंवा निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवणे यासाठी भाजप सरकारने अगदी चंग बांधला होता. परंतु केजरीवालांना सगळ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न करूनही हा प्रयत्न अपयशी ठरल्याचे वैफल्य भाजप नेत्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत आहे. केजरीवालांना अवेळी अटक करून मोठी चूक केल्याची जाणीव भाजपला झाली; पण न्यायालय केजरीवालांना जामीन देणार नाही ही आशा होती. तीही सर्वोच्च न्यायालयाने फोल ठरवली. मोदींच्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संसदेत ठचारसो पार’चा नारा दिला. तो सिद्धीस नेण्यासाठी मग, राम मंदिराच्या उद्घाटनाचा ‘वन मॅन शो’ झाला. नितीशकुमार, एकनाथ शिंदे, अजित पवार अशा असंख्य भाजपेतर नेत्यांना ‘एनडीए’मध्ये आणले गेले. अनेक ठिकाणी उमेदवार बदलण्यात आले, राज्यसभेतील नेत्यांना लोकसभेसाठी उतरवले. महाराष्ट्रात तर एकेका जागेसाठी महायुतीत संघर्ष झाला. मोदींसमोर त्यापेक्षाही मोठी अडचण ही होती की प्रचारात त्यांना कोणताही मोठा राष्ट्रीय मुद्दा हाती लागला नाही. अखेर मोदींना काँग्रेसचा जाहीरनामा हाती घ्यावा लागला.
मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा अर्थाचा अनर्थ करत ‘संपत्तीच्या फेरवाटपा’वरून हिंदू मतदारांच्या मनात भीती घातली. काँग्रेसला मुस्लिमांचा पक्ष ठरवून टाकले. कुंपणावर बसलेल्या मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करून मते खेचण्याचा प्रयत्न मोदी करताना दिसले. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोदींकडे ठोस मुद्दे नव्हतेच किंवा नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून प्रचारात अनेक चुका होताना दिसत आहेत. पुण्यातील सभेत अस्वस्थ आत्म्याचा उल्लेख करीत त्यांनी एक प्रकारे महाविकास आघाडीच्या बाजूने सहानुभूती निर्माण केली. मंगळसूत्रावरील त्यांचे भाष्य देखील शेवटी त्यांच्यावर बूमरँग होत असल्याचे दिसते. गेल्या आठवड्यात त्यांनी अदानी-अंबानींच्या कथित काळ्या पैशांवर भाष्य करून सगळ्यांना चक्रावून टाकले आहे. या विधानातून मोदींनी, देशातील राजकीय वारे बदलू लागल्याच्या चर्चेला बळ दिले आहे. आता भाजपमध्ये आता ‘चारसो पार’बद्दल कोणी बोलत नाही. ‘एनडीए’सह तीनशेचा आकडा गाठला तरी घोडे गंगेत न्हाले असे भाजपला वाटू लागले आहे. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितीशकुमारांमुळे ‘एनडीए’च्या जागांमध्ये मोठी घट होण्याची भीती सतावू लागली आहे. केजरीवालांमुळे दिल्ली, हरियाणामध्ये भाजपपुढे आव्हान निर्माण झाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये भाजप- तेलुगू देसम- जनसेना हे त्रिकूट प्रभावी ठरेल असे वाटत होते, परंतु तिथेही जगनमोहन रेड्डी इतक्या सहजपणे मैदान सोडायला तयार नाहीत असे दिसते. पश्चिम बंगालमध्ये विद्यमान १८ जागा टिकवताना भाजपला शक्ती पणाला लावावी लागली आहे. महाराष्ट्रात तिशी गाठली तरी महायुतीला मोठे यश मिळाले असे म्हणता येईल. त्यामुळे भाजपची सगळी मदार आता हिंदी पट्ट्यावर आहे. इथे भाजपला जागांची संभाव्य घसरण रोखता आली नाही तर चारसो पार, निसटते यश ते पराभव हा प्रवास पार पाडायला फारसा वेळ लागणार नाही.