अरुण मोडक
कुठी उपयले हो मामी, आमचे शकुनीमामा उर्फ जानबाज जानुमामा निकालाच्या रोजापासून! काहून, तुमाले काय मामाबगर घळीभरबी गमत नाई काय भासेबॉ! कुठी जातील ते. पयले लय वयवय केलं अन् आता बसले दात ईचकत अंधारात! ते पा थे वदरच्या माळीवर दोन पायाच्या टोंगयात मुंडकं खुपसून चिंतन करून रायले डागेल हारजीतचं! निकालाचा तुमच्या मामानं येवळा धसका घेतला का चार तारीखपासून अनपानी सोळलं अन् खाटलं धरलं! तरी म्या तुमच्या मामाले कितीखेप समजावलं व्हतं का मान्सानं राजकारनाच्या खोट्या धंद्यात दादागिरी केल्यापरस वजेवजे पाय घट्ट केला पायजे! या जमान्यात जनता-जनार्दन लय चतरे व्हयेल हायेत! गल्लीतल्या मान्साले दिल्लीत धाळ््याची अन् दिल्लीतल्याले गचकन गल्लीत आन्याची ‘कला’ जनतेजोळच असते! पन तुमचे मामा कोनं उलसक हरबर्याच्या झाळावर चळोलं का कोनाच्या बापाले आयकत नोते! जुना-नवा माल मिसय करून बंडीत भरला का जोर्यानं बंडी पिटालत व्हते!
आता पायना भासेबॉ, गेल्या दोन-तीन सालात तेईनं आमच्या महाखटल्यातल्या बंडीले डबल ईंजीनची ताकदबाज जोळी जुतली! ढोरबजारातल्या हेळ््यावानी ‘करेक्ट’ नजर ठुन जोळी हेरली अन् सोता दोर हाती घीवून धुरकरी झाले!
या बंडीत पयलेच हटखोर-बंडखोरीचं, हमीभावाच्या दुखन्याचं, बेभावाच्या हुशारीचं, बी-खताच्या टंचाईचं, ईळीच्या शा-सरापाचं, जातीपातीच्या आरक्शनाचं, जुन्या गाठोळ््याच्या ओझ्यानं बंडी धुरजळ झालती! ‘तीन तिघाळा अन् काम बिघाळा’ हे म्हन मालुम असल्यावर, जुना भंगेल माल बंडीत असल्यावरबी, आवक वाळल्यावर नवा माल ईकत घ्याची अक्कल मामाले सुचली अन् अथीच तेईची बंडी फसली?
त्यात हत्तीवानी वजनाचे मामा बंडी हाकल्याले बसल्याबराबर गचकन बंडी उलाय झाली अन् मामा दळकन आपटले! येवळे जोर्यानं आदयले का तेईचं कंम्बळ्ळच कामातून गेलं! मी म्हंतो कोन्तबी गाळं सरकसुदं चालत असल्यावर हरक्या मान्सानं काहाले चालत्या गाळ््याची ‘खी’ काळावं? कोन्ताबी धंदा आवक-जावक पावून हिसोबा-हिसोबानं करा लागते! ‘अती घाई मान्साले मसनात नेई’ अशी गोठ काय कामाची!
बसल्याजागी पोटभर सगयी भाकर भेटत असील तं मान्सानं रोज पुरनपोयीची काहाले आशा ठुवावं! राजकारनात तं बापा ‘आली आंगावर तं घेतली शिंगावर’ असा पॉवरबाज धोरनाचा चतरा मानुसच सक्सेस व्हते! त्यात तुमच्या मामाचं काम म्हंजे ‘मले पा अन् फुलं वा’ असं हाये! असा मानुस या ईचुकाट्याच्या चिखलात ‘ग्यारंटीनं’ फसतेच! अशी गत तुमच्या मामाची झाली! ‘तेल गेलं तुप गेलं अन् गचकन हाती धुपारनं आलं’! आता काय ‘घालीन लोटांगन वंदीनं चरन’ असा अवतार घीवून तुमचे मामा सोंगाळं चिंतन करून ‘चल सन्न्यासी मंदिरमें’ च्या भक्तीत गुततो म्हंतात! म्हनून तुमी दोघबी मामभासे आता फेविकॉलचा पक्का जोळ लावून उलाय बंडीले चिखलातून भाईर काळ््यासाठी शेंड्यावरच्या साधुजोळ तपश्चर्येले जा…??
९८२२५९३९४७