येत्या आठ दिवसात आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत, दिल्लीतील नेत्यांसोबत आपले बोलणे झाले आहे त्यामुळे राज्यातील नेते काही म्हणतात त्याला फारसे महत्त्व नाही, असे एकनाथ खडसेंनी म्हटले होते त्यालाही आता जवळपास महिना उलटून गेला आहे. भाजप पक्षप्रवेशाचा मुहुर्त अजून तरी खडसेंना सापडला नसल्याचे दिसते. ते आता भाजपमध्ये प्रवेश करण्यास एका पायावर तयार आहेत, परंतु त्यांचे दिल्लीतील नेतेच कदाचित त्यांच्या प्रवेशासंबंधी तितके उत्सूक नसावेत असे दिसते. खरे तर खडसेंनी भाजपसोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला, हा त्यांचा खूप धाडसी निर्णय होता. त्यांनी काही राजकीय गणिते मांडूनच हा निर्णय घेतला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि खडसेंनी विधान परिषदेत संधी मिळेल याची खात्री झाल्यावरच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, पुढे जाऊन ज्येष्ठतेच्या आधारे मंत्रिपद प्राप्त करायचे आणि त्या जोरावर आपल्यामागे असलेले शुक्लकाष्ठ संपुष्टात आणायचे, असा काहीसा त्यांचा विचार होता, परंतु दुर्दैवाने खडसे विधान परिषदेचे आमदार झाले आणि इकडे महाविकास आघाडीचे सरकार गडगडले.
सत्ता पुन्हा भाजपकडे आली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी सत्तेची सगळी सूत्रे फडणविसांच्याच हाती होती. त्यामुळे खडसेंची चांगलीच अडचण झाली. त्यानंतर त्यांनी घरवापसीसाठी धावाधाव सुरू केली. राज्यातील नेते आपल्या घरवापसीला विरोध करतील हे त्यांना माहित असल्यामुळे त्यांनी थेट दिल्लीत संधान साधले. लोकसभा निवडणुकीसाठी बेरजेचे गणित मांडणार्या भाजप पक्षश्रेष्ठींनी खडसेंच्या भाजप प्रवेशाला हिरवी झेंडी दिली. त्यानंतर राज्यातील काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन या निर्णयाला विरोध केल्याचे बोलले जात आहे, कदाचित त्यामुळेच खडसेंचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला असू शकतो. आता कदाचित आधी लोकसभेची जागा निवडून आणा मग पाहू, असे त्यांना सांगण्यात आले असावे, शिवाय त्यांची कन्या अजूनही शरद पवारांसोबत आहे, ही बाबदेखील त्यांच्यासाठी अडचणीची ठरत असावी. आता त्यांनीच म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा भाजपप्रवेश होणार आहे, शिवाय यापुढे आपण निवडणूक लढविणार नसल्याचेही त्यांनी घोषित केले आहे. एकूण सध्या तरी खडसेंची परवड थांबलेली नाही असेच दिसते.