शरद पवार यांच्या राजकारणाचे तीन टप्पे धरावे लागतील. सुरुवातीपासून पुलोद प्रयोगापर्यंत, पुलोदपासून राष्ट्रवादीपर्यंत आणि राष्ट्रवादीपासून पुढे. त्यात एक टप्पा २ जुलै २३ रोजी जोडला गेलाय. तो आहे राष्ट्रवादी जन्मल्यापासून राष्ट्रवादी फुटेपर्यंत. राष्ट्रवादी फुटल्यानंतर जो सूर लागला आहे तो केवळ सुप्रिया यांच्या राजकीय भवितव्याची काळजी करणारा आहे आणि त्याचसाठी त्यांनी विलीनीकरणाची भाषा बहुदा वापरली आहे!
आजचा काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले होते; पण आता परिस्थिती बदलली आहे. ‘काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी राज्यात ३० ते ३५ जागा जिंकेल आणि पुढच्या दोन वर्षांत काही प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेस पक्षात विलीन होण्याबाबत विचार करतील,’ असे वक्तव्य शरद पवार यांनी नुकतेच एका मुलाखतीत केले आहे. पवारांचे हे वक्तव्य स्वगृही परतून आपल्या मुलीचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी बहुदा दिसत आहे. चौर्यांशी वर्षांच्या, हृदय विकार, कॅन्सर सारख्या रोगांना सामना करून उभे राहिलेल्या पवारांना आपल्यानंतर आपल्या मुलीचे राजकीय भविष्य सुरक्षित राहण्याची चिंता असणे साहजिक आहे.
काँग्रेस सोडून गेलेले सर्व राजकीय नेते काँग्रेसमध्येच परत येतात. पवारांचे राजकीय गुरू स्व. यशवंतराव चव्हाण सुद्धा स्वगृही परतले होते. तसा निर्णय घेतला तरच त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना कदाचित काँग्रेस मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करू शकेल आणि सुप्रिया यांच्या रूपाने काँग्रेसलाही मुख्यमंत्रिपदासाठी एक चांगला उमेदवार मिळू शकतो. याशिवाय सुप्रिया सुळे या उद्धव ठाकरे यांच्या नात्यातील आहेत. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री अशा दोन राजकीय घरण्यांची सत्ता अडीच वर्षे चालली. २०२४ ला त्याच दोन घराण्यांकडे सत्ता असावी फक्त मुख्यमंत्रिपद आपल्या मुलीकडे असावे, हा पवारांचा बहुदा हेतू असावा. संजय निरुपम या काँग्रेसमधून हकालपट्टी केलेल्या माजी खासदाराने पवारांनी आपल्या मुलीला प्रदेशाध्यक्ष पद देण्याची अट घातली अशी कॉमेंट केली; पण त्याला अर्थ नाही. पवार प्रदेशाध्यक्ष पदाची नव्हे विलीनीकरणासाठी मुख्यमंत्रिपदाची अट ठेवू शकतात किंवा महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान आपल्या लेकीला मिळावा हे त्यांना वाटणे साहजिक आहे आणि त्याचसाठी त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील हे विधान केले. पवारांना मानणारे लोक केवळ राष्ट्रवादीत नव्हे, तर काँग्रेससह इतर पक्षांतही आहेत.
१८८५ पासून आत्तापर्यंत एकूण ६६ वेळा देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षात फूट पडली. त्यातील तीन वेळा स्वातंत्र्यपूर्व काळात, तर ६३ वेळा स्वातंत्र्योत्तर काळात. काँग्रेस सोडून गेलेले अनेक नेते काँग्रेसमध्ये वापस आले. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्ष संपूर्णपणे नेहरू, गांधी परिवाराच्या हातात गेला. त्यामुळे पवारसुद्धा त्याच मार्गाचा अवलंब करून स्वगृही परतू शकतात. स्वत: पवार जरी १९८० आणि १९९९ प्रमाणेच आपण पुन्हा पक्ष उभारू असे म्हणत असले, तरीही त्यांचे वय, वार्धक्य त्यांच्या चेहर्यावरून दिसून पडते. पवारांचे भक्त आणि त्यांची कन्या जरी साहेब आजही अठरा तास काम करतात असे म्हणत असले, तरीही त्याला मर्यादा आहेत. शरद पवार या नावाचा करिश्मा टिकविण्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होणे ही काळाची गरज आहे, असे वाटते! अर्थात पवारांना पक्षात घेणे न घेणे केवळ राहुल गांधी यांच्या हातात आहे.
सोनिया गांधी परकीय, इटालियन असल्याने त्या पंतप्रधान कशा काय बनू शकतात, अशी शंका शरद पवारांनी घेतली होती ज्यावर गदारोळ झाला. त्यामुळेच सोनिया गांधी १९९९ आणि २००४ साली पंतप्रधान पदाला मुकल्या. १९८९ पासून गेली ३५ वर्षे नेहरू, गांधी परिवार पंतप्रधान पदापासून वंचित आहे. भलेही त्यातील १५ वर्षे काँग्रेस केंद्रात सत्तेवर असतानासुद्धा! आज प्राप्त परिस्थितीत दोघांनाही एकमेकांची गरज आहे. २०१९ ला लोकसभेत काँग्रेसकडे ५२ सदस्य होते, तर राष्ट्रवादीकडे चार. ५४ सदस्य नसल्याने काँग्रेसचे विरोधी पक्षनेते पद गेले होते. काँग्रेस केंद्रात अथवा महाराष्ट्रात सुस्थितीत नाही. त्यातच अशोक चव्हाण यांनी खासदारकीसाठी भाजपचा हात धरल्यानंतर आणि पृथ्वीराज चव्हाणांचे वय लक्षात घेता काँग्रेसमध्ये नेतृत्वाची एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सुप्रिया सुळे काँग्रेसमध्ये आल्यास ती पोकळी भरून निघू शकते आणि त्यामुळे काँग्रेससुद्धा महाराष्ट्रात सक्षम होऊ शकेल.
पवारांनी जरी काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष काँग्रेसमध्ये येतील, असे म्हटले असले तरीही ममता बॅनर्जी आणि जगन रेड्डी आपले तृणमूल काँग्रेस आणि वाय एस आर काँग्रेस इतक्यात काँग्रेसमध्ये विलीन करतील असे वाटत नाही, कारण हे दोन्ही पक्ष आपापल्या राज्यात सत्तेवर आहेत, तसेच शिवसेनेसारखे इतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे वाटत नाही; मात्र काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांना प्रादेशिक पक्ष त्यांच्या अवास्तव मागण्यांमुळे डोईजड आणि अडगळीचे वाटतात. सुमारे अकरा वर्षांपूर्वी काँग्रेसबरोबर युती असताना तेव्हाच्या तेलंगणा राष्ट्र समितीला काँग्रेसने आमच्यात विलीन व्हा, हाच पर्याय ठेवला होता. तो के. चंद्रशेखर राव यांनी मानला नाही; मात्र प्रजा राज्यम या पक्षाच्या चिरंजीवी यांनी तो मार्ग स्वीकारला. शरद पवार यांच्या राजकारणाचे तीन टप्पे धरावे लागतील. सुरुवातीपासून पुलोद प्रयोगापर्यंत, पुलोदपासून राष्ट्रवादीपर्यंत आणि राष्ट्रवादीपासून पुढे. त्यात एक टप्पा २ जुलै २३ रोजी जोडला गेलाय. तो आहे राष्ट्रवादी जन्मल्यापासून राष्ट्रवादी फुटेपर्यंत. राष्ट्रवादी फुटल्यानंतर जो सूर लागला आहे तो केवळ सुप्रिया यांच्या राजकीय भवितव्याची काळजी करणारा आहे आणि त्याचसाठी त्यांनी विलीनीकरणाची भाषा बहुदा वापरली आहे!
तूर्तास इतकेच!
जयंत माईणकर
९८२१९१७१६३
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.