१९८०मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली त्यावेळी पुढे भविष्यात हा पक्ष राष्ट्रीय राजकारणात इतकी मोठी मजल मारेल, असे कुणालाही वाटले नव्हते. १९८४च्या निवडणुकीत तर भाजपला अवघ्या दोन जागांवर विजय मिळविता आला होता. अटलजीसारख्या दिग्गज नेत्यालाही पराभवाचा सामना करावा लागला होता, अर्थात ती निवडणूक इंदिरा गांधींच्या दुर्दैवी हत्येच्या पृष्ठभूमीवर झाली होती, भाजपच नव्हे तर इतर कोणत्याही राजकीय पक्षाला त्या निवडणुकीत फारसे यश मिळाले नव्हते; परंतु पुढच्या पाच वर्षात राजकारणाने बरीच वळणे घेतली. आधीच्या निवडणुकीत चारशेपेक्षा अधिक जागा जिंकणारी काँग्रेस पुढच्या निवडणुकीत विरोधी बाकावर गेली आणि केंद्रात भाजप तसेच डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने व्ही.पी.सिंगांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतरच्या काळात भाजपचा सतत उत्कर्ष होत गेला. अटलजींच्या नेतृत्वाखाली भाजपने तीन वेळा आघाडीचे सरकार स्थापन केले. २००४ ते २०१४ या काळात केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार होते; परंतु भाजपची ताकद फारशी कमी झाली नव्हती. २०१४च्या निवडणुकीनंतर सगळे चित्रच बदलले. तब्बल तीस वर्षानंतर कोणत्याही एका पक्षाला लोकसभेत पूर्ण बहुमत प्राप्त झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. भाजप स्वबळावर केंद्रात सत्ता स्थापन करेल, असा एरवी स्वप्नातही कुणी विचार केला नव्हता, ते स्वप्न नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने साकार करून दाखविले.
पुढच्या निवडणुकीत आधीपेक्षाही अधिक यश मिळवित भाजपने सत्ता कायम राखली आणि आता या निवडणुकीत भाजपने स्वबळावर ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. या गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात भाजपचे संपूर्ण राजकारण नरेंद्र मोदी या केवळ एका नावाभोवती फिरत राहिले आहे. अटलजी-अडवाणींच्या काळात भाजपमध्ये सामूहिक नेतृत्व होते. अटलजी, अडवाणीजी, विजयाराजे सिंधिया, मुरलीमनोहर जोशी आणि इतरही अनेक ज्येष्ठ नेते सामोपचाराने, एकमेकांशी चर्चा करून, अगदी मित्रपक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेत असत. आता तसे राहिलेले नाही. सगळे निर्णय नरेंद्र मोदी घेतात आणि ते मान्य असो वा नसो पक्षाला स्वीकारावे लागतात. मतभेद असले तरी ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आता भाजपात राहिलेले नाही. कुणी तशी आगळीक केलीच तर त्याचे राजकीय भवितव्य संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राजनाथसिंह, नितीन गडकरींसारख्या नेत्यांनीही मोदींसमोर मान तुकविल्याचे दिसून येत आहे. भाजपला लोकसभेत गेल्या दोन निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले याचे श्रेय नक्कीच नरेंद्र मोदींना जाते; परंतु याचा अर्थ पक्षातील इतर नेत्यांचा भाजपच्या यशात कोणताही वाटा नाही, असा होत नाही. मोदी यशाचे नायक असले तरी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे श्रम या यशामागे आहे; परंतु स्वप्रतिमेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मोदींना आपल्यामुळेच पक्ष उभा आहे, आपल्यामुळेच पक्षाला यश मिळत आहे, असे वाटते. त्यातूनच भाजपमध्ये एककेंद्रीत नेतृत्व निर्माण झाले आहे. अगदी अशीच परिस्थिती काँग्रेसमध्येही होती. आपल्याशिवाय काँग्रेसचे अस्तित्व शून्य आहे, असेच गांधी परिवाराला वाटत होते. पक्षावरील आपली पकड सैल होऊ नये, पक्षात केवळ आपलाच शब्द अंतिम मानला जावा, या भावनेतून गांधी परिवाराने पक्षातील प्रादेशिक स्तरावरील बड्या नेत्यांचे पक्ष छाटण्याचेच काम केले. त्याचा परिणाम आज काँग्रेसला भोगावा लागत आहे.
काँग्रेसला ज्या चुकीमुळे ही ठेच लागली त्यातून भाजप काही शहाणपण शिकत आहे असे दिसत नाही. आज भाजपची वाटचालही त्याच मार्गाने होत आहे. मोदी-शाह या जोडीने पक्षावरील आपली पकड घट्ट करण्यासाठी प्रादेशिक नेत्यांना, पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांना कायम दुय्यमपणाची वागणूक दिली आहे. आमच्यामुळे तुम्ही आहात अशी जाणीव प्रदेश स्तरावरील नेत्यांना कायम करून दिली जात आहे. उद्या भाजपने ३७० जागांचा आकडा ओलांडला किंवा त्याच्या जवळपास भाजप पोहचली तरी भाजप मोदींच्या हातचे केवळ बाहुले बनून राहील. आजपर्यंत भाजपला दिशा देण्याचे, भाजपला नियंत्रित करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत होता, आता मोदी संघाच्याही नियंत्रणाबाहेर गेले आहेत; परंतु भारतीय लोकशाहीत कोणत्याही एका चेहर्याचा करिष्मा दीर्घकाळ प्रभाव राखू शकत नाही. इंदिरा गांधींनाही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. गांधी परिवाराच्या पुढच्या पिढीलाही मोठे अपयश स्वीकारावे लागले होते. उद्या मोदींचा प्रभाव ओसरला तर भाजपची अवस्थाही काँग्रेससारखीच होईल. काँग्रेसला मोठी ठेच लागली, त्यातून काँग्रेसला शहाणपण आले की नाही, हे सांगता येत नाही; परंतु काँग्रेसच्या अनुभवातून भाजपनेही शहाणपण स्वीकारल्याचे सध्या तरी दिसत नाही.