मागील दहा वर्षांच्या काळात जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक बहुमत दिले होते. २०१४, २०१९ मध्ये भारतातील तमाम मतदारांनी ज्या पद्धतीने मोदी सरकारची पाठराखण केली होती त्याविरुद्ध जाऊन २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे संख्या बळ घोटवले.
१८ व्या लोकसभेचा निकाल नुकताच घोषित झाला. देशात दहा वर्षांनंतर भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळवता आले नाही. (एन डीएला बहुमत आहे.) उत्तर प्रदेशासह महाराष्ट्र व अन्य राज्यांतही भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला केंद्रात अन्य पक्षांचा टेकू घेऊनच सरकार स्थापन करावे लागणार आहे. एनडीए म्हणून जरी मित्रपक्ष सोबत असले, तरी आगामी पाच वर्षे सतत त्यांच्या इशार्यावर नाचण्याची वेळ भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर येणार आहे, हे वास्तव स्वीकारावे लागेल. मागील दहा वर्षांच्या काळात जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक बहुमत दिले होते. २०१४, २०१९ मध्ये भारतातील तमाम मतदारांनी ज्या पद्धतीने मोदी सरकारची पाठराखण केली होती त्याविरुद्ध जाऊन २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे संख्या बळ घोटवले. खरे तर भाजपाला अपयश का आले याची कारणमीमांसा होणे अपेक्षित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा वैश्विक चेहरा म्हणून आपण पाहतो. किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या वतीने तशी छबी तयार करण्यात आली. गेल्या पाच वर्षांच्या काळात मोदी सरकारने जे काही निर्णय घेतले त्या निर्णयांपैकी बहुतांश निर्णय त्यांच्या अंगलट आले. ३७० चे कलम हटवल्यानंतर भारतीय जनता पार्टीची प्रतिमा स्वच्छ होण्याऐवजी त्याचा फटका भाजपला बसला. अयोध्येतील राममंदिर उभारल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला मोठा फायदा होईल, हिंदुत्ववादी मतं त्यांच्या पारड्यात पडतील ही अपेक्षा फोल ठरली, तर दुसरीकडे ‘तीन तलाक’चा निर्णय घेऊन भाजपने नको त्या धार्मिक संकटात स्वतःला ओढून घेतले. या एवढ्याच बाबी जबाबदार नाहीत, तर भारतीय जनता पार्टीतल्या दिल्ली ते गल्लीपर्यंतच्या प्रत्येक पदाधिकारी, नेते आणि लोकप्रतिनिधींमध्ये मोठा गर्व आणि अहंकार भरला होता हे लपून राहिले नाही. आपण देशाचे पंतप्रधान आहोत याची जाणीवही मोदी यांनी विसरली होती. त्यामुळे देशभरात झालेल्या त्यांच्या प्रत्येक भाषणातील मुद्दे हे देशाच्या विकासापेक्षा मुस्लीम, राहुल गांधी यावर होते आणि ‘अब की बार ४००पार’चा नारा दिल्यानंतर काँग्रेसने आणि त्यांच्या मित्रपक्षाने संविधान धोक्यात असल्याचे सांगून ज्या पद्धतीने मोदींच्या ४०० च्या आकड्याला आव्हान दिले होते ते आव्हान पेलताना आम्ही संविधान बदलणार नाही, हे सांगण्यात भारतीय जनता पार्टीला यश आले नाही.
एवढेच नाही तर अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि महाराष्ट्रात भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषा इतकी बदलली होती, की त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा द्वेष निर्माण झाला होता. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा फटका तर बसलाच; परंतु कधी नाही ते मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात एकवटला होता. वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर येथे चालला नाही. त्यामुळे दलित मते ही काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे बळ मिळाले. महाराष्ट्रात झालेल्या प्रचार सभांमध्ये भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रातीलही नेत्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना म्हणून ज्या पद्धतीने हिणवले ते हिणवणेही जनतेला पसंत आले नाही. राजकारणात कधी कोण कोणाच्या पाठीशी उभा राहील, हे सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणातील परिस्थिती कधीही बदलू शकते याची जाणीव प्रत्येक नेतृत्वाने ठेवणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर मतदारांना आपले समजणे ही सर्वात मोठी चूक आहे. कोणत्याही समाजाला, कोणत्याही घटकाला गृहीत धरणेच घोडचूक असते याची जाणीव या झालेल्या निवडणुकीतील निकालानंतर समोर आली आहे. शिवाय आपण एखाद्यावर टीका करत असताना तिची पातळी तपासून पाहणे आवश्यक आहे हेही आता सिद्ध झाले आहे. कारण ‘पेराल ते उगवेल’ असे म्हटले जाते.
गेल्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात जे फोडाफोडीचे राजकारण झाले. त्याचे परिणाम भारतीय जनता पार्टी- महायुतीला भोगावे लागले. या सगळ्या बाबी जरी खर्या असल्या, तरी देवेंद्र फडणवीस यांची भाषाशैली, त्यांचा अहंकार, गर्व इतरांना टाकून बोलण्याची पद्धत, अन्य पक्षांना कस्पटासमान समजण्याची वृत्ती या बाबी भाजपला खर्या अर्थाने महाराष्ट्रात नडल्या. शरद पवारांसारख्या वयोवृद्ध नेत्यावर बोलत असतानाही आपण भान सोडून बोलत आहोत याची जाणीव त्यांना उरली नव्हती. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी विरोधकांचा सन्मानपूर्वक उल्लेख करत असत. टीका करताना आपण कुठल्या पातळीला जाऊन टीका करावी याचे भान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना उरलेले नव्हते. त्यामुळे ‘तुमचा गर्व आणि अहंकार तुम्हाला पराभूत करत असतो’ ही बुद्धवाणी याही ठिकाणी तंतोतंत लागू पडत आहे. आता महाविकास आघाडीला जनतेने पाठबळ दिले याचा अर्थ त्यांनी पण गर्व करण्याची गरज नाही. आगामी काळात आपण अधिक सक्षमपणे कसे यशस्वी होऊ शकतो, याची रणनीती करण्याची आवश्यकता आहे, तर देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करून स्वतःत बदल करत सर्वसमावेशक नेतृत्व कसे तयार होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा जे लोकसभेत झाले ते विधानसभेत होऊ शकते, एवढे मात्र नक्की.
राम तरटे
८६००८५२१८३
email: tarteram12@gamil.com