लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील प्रत्यक्ष प्रचार रविवारी संध्याकाळी संपुष्टात आला. येत्या मंगळवारी तिसर्या टप्प्यातील जागांसाठी मतदान होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या अकरा जागांचा समावेश आहे. त्यातील काही जागांवर अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही जागांवरील लढती तर महाराष्ट्राचे पुढचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे ठरविण्याइतपत महत्त्वाच्या आहेत. काही लढती प्रतिष्ठेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. राज्यात एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होत आहे, त्यातील हा तिसरा टप्पा राजकीय दृष्ट्या सर्वाधिक संवेदनशील म्हणायला हरकत नाही. याच टप्प्यात राज्यातच नव्हे तर देशात चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. एरवी पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असणार्या बारामतीबद्दल फारशी चर्चा नसायची, तिथे पवार कुटुंबातील किंवा पवार समर्थक उमेदवार निवडून येणार हे गृहीतच धरले जायचे, परंतु यावेळी पवार कुटुंबातच लढत होणार असल्यामुळे दोन्ही बाजूंकडून अतिशय सावध प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी स्वत: शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबातील इतर जवळपास सगळेच सदस्य प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. अजित पवार गटाकडून स्वत: अजित पवारांच्या अर्धांगिनी सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. याच दोघी नणंद-भावजयींमध्ये इथे थेट लढत दिसून येत आहे. या लढतीत शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एरवी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराची औपचारिकता पार पाडणार्या सुप्रिया सुळेंना यावेळी मात्र प्रचंड घाम गाळावा लागत आहे.
आपली ताकद कमी पडू नये म्हणून त्यांनी पवार कुटुंबातील इतर सदस्यांनाही प्रचारात सामील करून घेतले आहे. कुटुंबाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास बहुतेक सगळे पवार सध्या सुप्रिया सुळेंच्या बाजूने मैदानात उतरल्याचे दिसते. अजित पवार पत्नी आणि दोन मुलांसह आपला किल्ला लढवित आहेत, परंतु अजित पवारांना पवार कुटुंबातील इतर कुणाचीच मदत मिळत नसल्याचा मुद्दा कदाचित अजित पवारांसाठी सहानुभूती निर्माण करणारा ठरू शकतो, शिवाय निवडणूपूर्वी सगळ्याच बंडखोरांना शांत करण्यात अजित पवारांना यश आले आहे. विजय शिवतारे अजित पवारांसाठी प्रचार करीत आहेत, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आपले मतभेद विसरून प्रचारात ताकदीने सामील झाल्याचे दिसत आहेत. भोरच्या थोपटे कुटुंबाची भूमिका पुरेशी स्पष्ट नसली तरी त्यांचा अजित पवारांनाच आतून पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. एकूण विचार करता दोन्ही बाजूंकडून तुल्यबळ फौजा प्रचारासाठी तैनात दिसतात, त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय असेल याची कमालीची उत्सूकता आहे, ही उत्सूकता केवळ निकालापुरती नसून निकालानंतर राज्याचे राजकारण कोणते वळण घेईल याचीही आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी नव्याने आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत, सुप्रिया सुळेंचा पराभव झाल्यास या प्रयत्नांना मोठा धक्का बसू शकतो. दुसरीकडे अजित पवारांना पराभव स्वीकारावा लागला तर कदाचित आज त्यांच्यासोबत असलेले त्यांचे अनेक सहकारी पुन्हा शरद पवारांकडे परतू शकतात. या घडामोडींचा परिणाम राज्याच्या राजकारणावर नक्कीच होईल.
तिसर्या टप्प्यातील अन्य प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये कोल्हापूर आणि सातारा या राजघराण्यांचा वारसा सांगणार्या मतदारसंघाच्या लढतींचा समावेश आहे. दोन्ही ठिकाणी राजघराण्याचे वारसदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोघेही विजयी होण्याची शक्यता असली तरी दोघांपैकी एकाचा किंवा दोघांचाही पराभव प्रचंड धक्कादायक ठरू शकतो. तिकडे रत्नागिरी-सिंधूदुर्गमध्ये नारायण राणे कदाचित आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटचा डाव खेळत आहेत. त्यांचा विजय झाला तर त्यांचे राजकारण पुढे जाईल, परंतु या निवडणुकीतील पराभव त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आणणारा ठरू शकतो. त्याशिवाय प्रचंड चर्चेत असलेला माढा मतदारसंघातही याच टप्प्यात मतदान होत आहे. पक्षातील आणि सहकारी पक्षातील दिग्गज नेत्यांचा विरोध डावलून भाजपने रणजितसिंग निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे मोहिते पाटील घराण्याने शरद पवारांशी संधान साधत थेट उमेदवारी मिळविली. त्यामुळे इथे भाजपसोबतच मोहिते पाटील घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसते. सांगलीचाही निकाल या टप्प्यातील मतदानाने निश्चित होणार आहे. सांगलीत यावेळी खूप नाट्य रंगले. जनतेची सहानुभूती विशाल पाटलांकडे दिसत असली तरी ते विजयी होतात की कुणाच्या तरी विजयाचे गणित बिघडवितात, याची उत्सूकता आहे. एकूण तिसरा टप्पा खूपच संवेदनशील आणि रंजक आहे, असे म्हणायला हरकत नाही.