अनिल भोकरे
सेवानिवृत्त प्रकल्प संचालक, आत्मा तथा संचालक- अॅग्रेरियन
आपल्या भागातील पंचायत समिती, ग्रामपंचायत व कृषी कार्यालयाला भेटी देऊन शेतकर्यांनी यंदा फळ लागवड केली पाहिजे, जेणेकरून आगामी काही वर्षांत आपल्या महाराष्ट्रात फळांच्या बाबतीत मोठी क्रांती घडून येईल.
‘पाऊस वेळेवर आलाच तर बियाणे व खतांची महागाई, कधी बहरून आले शेत तर किडी आणि रोगराई.. खरं तर शेतकर्यांचे जीवन म्हणजे प्रचंड कष्ट तरीही पिकाचा मात्र भरवसा नाही’! त्यामुळे बचत, भविष्याचे किंवा म्हातारपणाचे नियोजन वगैरे ह्या संकल्पना तर आणखीनच दूर आहेत. नोकरदार माणसाला पेन्शन असते, बचतीतून मिळणारे पैसे वगैरे असा आधार असतो; पण आयुष्यभर शेतात राबणार्या आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्यांचे काय? मागील ३५-४० वर्षांत हजारो शेतकर्यांचे जिणे जवळून पाहिलेले असल्याने व अजूनही सातत्याने शेती- माती व शेतकर्यांच्याच वर्तुळात वावरत असल्याने आम्ही एक गोष्ट शेतकरी बांधवांना व त्यांच्या कुटुंबीयांना आग्रहाने सांगायला सुरुवात केली आहे, ती म्हणजे भविष्याचे नियोजन म्हणून फळ लागवड करायला सुरुवात करा. कारण फळांच्या बागा ह्या भरघोस उत्पन्न मिळवून देणार्या तर असतातच; परंतु फळपिकांची शेती म्हणजे शेतकर्यांची पेन्शन योजनाच आहे. आमचे हे म्हणणे ऐकून खान्देशातील अनेक शेतकरी बांधवांनी अन्य पिकांची शेती करत असतानाच हक्काची पेन्शन योजना म्हणून फळपिकांची लागवड करायला सुरुवात केलेली आहे. काही शेतकर्यांनी तर भरघोस उत्पन्न मिळवून इतरांचे लक्षदेखील वेधून घ्यायला सुरुवात केली आहे.
आता खरीप हंगाम सुरू होतोय, शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो, की आपल्या क्षेत्रामध्ये कोरडवाहू आणि बागायतीमध्ये फळपिकांची लागवड कशी करू शकू, हे पाहा. कारण फळपिके ही शेतकर्यांची पेन्शन योजना आहे. आज आपण बघत आहोत, की महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर संबंध जगालाच फळांची मोठी आवश्यकता आहे. महाराष्ट्रात सर्व प्रकारची फळपिके येतात. या खरीप हंगामातील पूर्वतयारी म्हणून आपण आताच २ बाय ३ फुटाचे खोलवर खड्डे तयार करून ठेवले पाहिजेत, तसेच आवश्यक असलेला पालापाचोळा, सेंद्रिय कर्ब, कंपोस्ट, चांगल्या प्रकारची माती हे सगळे गोळा करून आताच ठेवले पाहिजे, तसेच आपल्या परिसरात ज्या काही नोंदणीकृत नर्सरी किंवा रोपवाटिका आहेत त्यांच्याकडे रोपांची त्वरित बुकिंग करून घेतली पाहिजे. कोरडवाहूमध्ये सीताफळ, चिंच, बोर, जांभूळ, आवळा; तर बागायतीमध्ये आंबा, पेरू, पपई, लिंबूवर्गीय, चिंच, बोर, चिकू इत्यादी सर्व प्रकारच्या फळांसाठी शासनाचे अनुदान आहे. त्यामुळे आपल्या भागात जे फळ पीक येते त्याची लागवड आपण केली पाहिजे. आता फक्त विचार करून थांबायचे नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्यासाठी हा खरिपाच्या सुरुवातीचा अतिशय योग्य असा काळ आहे. आपल्या शेतातील जमिनीच्या मकदुराप्रमाणे म्हणजे मातीच्या परीक्षणात चुनखडीचे प्रमाण जर का जास्त आले असेल, तर तिथे लिंबू वर्गीय किंवा आंब्यासारखी फळ लागवड न करता चिंच, आवळा, शेवगा यांसारखी लागवड केली पाहिजे. यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळ लागवड योजना, ‘एमआरएजीएस’ सारख्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांची संबंधित कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी व अशा योजनांचा आपण शेतकरी बांधवांनी पुरेपूर लाभ घेतलाच पाहिजे, तसेच आपण मागील काही आठवड्यांपासून जी चर्चा करत आहोत त्याप्रमाणे म्हणजे एकात्मिक किंवा शाश्वत शेतीच्या संकल्पनेनुसार आपल्या एकूण शेतातील क्षेत्रापैकी किमान २० ते ३० टक्के क्षेत्र हे फळ लागवडीसाठी असलेच पाहिजे. जे मोठे शेतकरी आहेत त्यांनीही व जे लहान शेतकरी आहेत म्हणजे २ हेक्टर पेक्षा कमी शेती ज्यांच्याकडे आहे त्यांनीही ‘एमआरएजीएस’मध्ये लागवड करावी.
निसर्गाच्या म्हणजेच पर्यावरण परिसंस्थेचा दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने आणि आपल्या एकात्मिक शेतीच्या संकल्पनेच्या दृष्टीने फळपिकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. फळपीक लागवड करत असताना आपण इतर पिकांचे आंतरपीकदेखील घेऊ शकतो, ज्यामुळे क्षेत्र वाया जात नाही व पूरक पिकांचे उत्पादन होऊन लाभत वृद्धी होऊ शकते. सुदैवाने सृष्टीने असे नियोजन केले आहे, की आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये कोणते ना कोणते फळ उपलब्ध होतेच. त्यामुळे ऋतूनिहाय येणार्या फळांची लागवड आपण केली, तर वर्षभर शेतकर्यांना आर्थिक उत्पन्न प्राप्त होऊ शकते. ते एखाद्या मासिक पेन्शन योजनेसारखेच होईल, तसेच मागील काही वर्षांत लोकांचे फलाहाराचे प्रमाण आरोग्याच्या दृष्टीने वाढलेले असल्याचे आपण बघतो. शिवाय फळांना खाण्यासाठी मागणी होतेच; परंतु प्रक्रिया उद्योगासाठी मोठी मागणी मिळते, त्यामुळे फळ हे नगदी पीक असल्याने भावदेखील उत्तम मिळतो. शेतकरी स्वावलंबी होतो. अत्यंत कर्जबाजारी आयुष्यातून संपन्न जीवनाचे निर्माण करताना आम्ही कित्येक शेतकर्यांना बघत आहोत. फळ पिकांची ही ताकद आहे. आपल्या भागातील पंचायत समिती, ग्रामपंचायत व कृषी कार्यालयाला भेटी देऊन शेतकर्यांनी यंदा फळ लागवड केली पाहिजे, जेणेकरून आगामी काही वर्षांत आपल्या महाराष्ट्रात फळांच्या बाबतीत मोठी क्रांती घडून येईल. शेजारच्या आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांच्या जीडीपी फळांच्या उत्पादनात वाढ झाल्याने वृद्धिंगत झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या उत्पन्नाचा एक शाश्वत स्रोत फळांमुळे सर्वत्र निर्माण होऊ शकतो असे मनापासून वाटते.
९४२२३६७२६२