२०२४च्या लोकसभा निवडणुकीचा भाजपचा ’जाहीरनामा’ हा केवळ निवडणुकीपुरता पाहिला जाऊ नये. जर भाजपा पुन्हा सत्तेत आली, तर पुढील पाच वर्षे सत्तेला प्रश्न विचारायला हा ’जाहीरनामा’ जनतेच्या उपयोगी पडेल. जाहीरनाम्याचं शीर्षक आहे ‘मोदी की गारंटी’. त्या त्या गारंटीसोबत दिलेली छायाचित्रं, हा खरं तर स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. उदाहरणार्थ, ‘मध्यम-वर्ग परिवारों का विश्वास’मध्ये मोदींचं मेट्रोमधून प्रवास करतानाचं दोन महिलांसोबतचं छायाचित्र आहे. ‘नारी शक्ति का सशक्तिकरण’मध्ये अनेक महिलांसोबतचे मोदींचे छायाचित्र आहे. अशी छायाचित्रं काढली की, ‘मध्यम-वर्ग’ आणि महिलांचे ‘सशक्तीकरण’ होते, असा मोदी आणि ‘मोदी का परिवार’चा समज असावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या घोषणेमध्ये कुठल्या तरी पूजेच्या वेळी भेटलेल्या एका वृद्ध महिलेसोबतचं छायाचित्र आहे.
‘किसानों की सम्मान’मध्ये एका गायीला मोदी हिरवा चारा भरवताहेत, असं एक छायाचित्र आहे. ‘सबका साथ सबका विकास’मध्ये मोदी कामगारांचे पाय धुताहेत, हे छायाचित्र आहे. दोन-चार कामगारांचे अशा प्रकारे पाय धुतले की, ‘सबका साथ सबका विकास’ होत असावा बहुधा. यातच पुढे कपाळावर भव्य टिळा, गळ्यात भगवी उपरणी घातलेल्या मोदींचे बहुधा हिमालयाच्या पृष्ठभूमीवरचे पानभर छायाचित्र आहे. ‘विश्व बंधु भारत’मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व इतर तीन देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबतचे मोदींचे छायाचित्र आहे. आणि पुढच्या पानावर राममंदिराचंही. थोडक्यात, मोदींनी आपल्या ‘गारंटी’ या ‘२४ कॅरेट सोनं’ असल्याच्या थाटात सांगण्याचा प्रयत्न केला आहे खरा, पण त्या शांतपणे वाचल्या, तर सारासार विचार करणार्या मतदाराच्या लक्षात येतं की, हे तर सोन्याचा केवळ मुलामा चढवलेलं तांबे, निकेल आणि जस्त यांचंच मिश्रण आहे; कारण जनतेने मोदी सरकारचे दहा वर्षे अनुभवले.
गेली दहा वर्षं केंद्रात सत्ता उपभोगूनही मोदी म्हणताहेत की, मला तिसर्यांदा निवडून द्या, मग मी ‘मोदी की गारंटी’मधील आश्वासनांची पूर्ती करेल. त्यासाठी आपण पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅपही तयार केला असल्याचा त्यांचा दावा आहे; पण गेल्या दहा वर्षांत नेमके काय केले, याविषयी ते फारसे काही सांगत नाहीत, मात्र २०४७पर्यंत भारताला विकसित देश म्हणून उभे करू, याचा मात्र हवाला देत आहेत. मोदी सरकार जर तिसर्यांदा सत्तेत आले, तर ‘मोदी की गारंटी’ ही प्रत्यक्षात ‘बिरबलाची खिचडी’ ठरू नये, इतकेच…