भारत जगातील तिसरी, दुसरी आर्थिक महासत्ता होईल तेव्हा होईल; परंतु सध्या तरी भारताने बुद्धिबळाच्या क्षेत्रात उगवती महासत्ता म्हणून आपला दबदबा निर्माण केल्याचे दिसते. पूर्वी रशिया, अमेरिका आणि युरोपातील काही देशांची या खेळावर मक्तेदारी होती. विशेषत: रशियाने दीर्घ काळ बुद्धिबळाच्या खेळावर आपली हुकूमत कायम ठेवली. त्या काळात भारतातून एखादा ग्रॅण्डमास्टर तयार होणे हीदेखील मोठी अप्रुपाची बाब होती; परंतु विश्वनाथन आनंदने आपल्या अलौकिक खेळाच्या जोरावर थेट जगज्जेतेपदापर्यंत मजल मारली आणि जगाला भारतीय बुद्धिबळाची दखल घेणे भाग पडले; परंतु त्यानंतरच्या काळातही भारताचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रातील वावर आनंदच्या भोवतीच घुटमळत होता. त्याच्या तोडीचे बुद्धिबळपटू भारतात निपजत नव्हते; परंतु अलीकडील काळात काही तरुण बुद्धिबळपटूंनी आनंदचा वारसा पुढे चालवित आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. त्याची प्रचिती कॅण्डिडेट अर्थात आव्हानवीर स्पर्धेत दिसून आली. जगज्जेत्या बुद्धिबळपटूला आव्हान देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचा विजेता जगज्जेत्या खेळाडूला त्याचे जगज्जेतेपद टिकविण्यासाठी आव्हान देतो.
भारताच्या इतिहासात केवळ एकदाच आनंदने ही अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली होती; परंतु यावेळी झालेल्या या कॅण्डिडेट स्पर्धेत एकाच वेळी भारताचे पाच पाच खेळाडू सहभागी झाले होते. अर्थात या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता मिळविणेही खूप कठीण काम असते. या स्पर्धेसाठी पात्र ठरणे हाच त्या खेळाडूचा मोठा बहुमान असतो. त्यामुळे गुकेश, प्रज्ञानंद, विदित गुजराती सारखे खेळाडू एकाचवेळी या स्पर्धेत सहभागी झाले हा भारताचा बहुमानच होता. या बहुमानाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला तो डी. गुकेश या खेळाडूने. स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानी असलेल्या नाकामुराला बरोबरीत रोखीत गुकेशने ही स्पर्धा जिंकली. याचा अर्थ गुकेश आता जगज्जेतेपदाच्या लढतीत डिंग लिरेन या विद्यमान जगज्जेत्याला आव्हान देणार आहे. ही स्पर्धा जिंकीत गुकेशने नवा इतिहासही निर्माण केला. चाळीस वर्षांपूर्वी गॅरी कॉस्पारोव्हने ही स्पर्धा जिंकली होती तेव्हा तो ही स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू होता, कॉस्पारोव्हचा तो विक्रम गुकेशने इतिहासजमा केला आहे. अजून वयाचे अठरा वर्षेही पूर्ण न केलेल्या गुकेशने आपल्या अद्भूत खेळाने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. गुकेश, प्रज्ञानंद, विदिथ गुजराथी, निहाल सरीन, अर्जुन एरिगेसीसारख्या खेळाडूंनी आता भारत बुद्धिबळात महासत्ता बनणार असाच शंखनाद केला आहे.