गेल्या काही दिवसांपासून किती उमेदवार निवडून येतील याचा अंदाज कोणत्याच राजकीय पक्षाला नसला, तरी पण भाजपने चारशे पार सांगायला सुरुवात केली आहे. कारण असे म्हटल्यानंतर निदान तीनशे, साडेतीनशेपर्यंत तरी जागा येतील, अशी शक्यता त्यांना वाटते. विरोधक मात्र भाजप दोनशेचा टप्पादेखील पार पाडणार नाही, अशी आशा बाळगून आहे. भाजपाने गेल्या दहा वर्षांत देशाची प्रचंड प्रगती केली, अशी जाहिरातबाजी त्यांच्याकडून होत असली, तरी वस्तुस्थिती मात्र समजून घेणे गरजेचे आहे. २०१३ पर्यंत भारतावरील विदेशी कर्ज ५४ लाख कोटी रुपये होते. त्या विरोधात हेच भाजपवाले प्रचंड आवाज करीत होते आणि आता त्यांनीच हे कर्ज केले आहे २०७ लाख कोटी रुपये. आता या विषयावर भाजपने बातचित करणे बंद केले आहे. हिंदू-मुस्लीम विषयावर लोकांना कामाला लावल्याने तिकडे कुणाचेच लक्ष नाही. ज्यावेळी लक्ष जाईल, त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल. काँग्रेस सरकारने जीएसटी बारा टक्के सुचवला होता. त्याला भाजपाने विरोध केला होता. आता तो २८ टक्के करून व्यापारी व उद्योजकांना कमालीचे लुटले. त्यांची ही दशा झाल्यानंतर सामान्य माणसाला तर दाही दिशांनी लुटून कंगाल करायचे काम पूर्ण झाले आहे. देशपातळीवरचे उदाहरण द्यायचे ठरले, तर सांगता येईल की, ५६० कोटी रुपये ही किंमत एका राफेल विमानाची होती. तीही लोकांना जास्त वाटत होती. यांनी तेच राफेल १ हजार ७८९ कोटी रुपये खर्चून आणले. विमानाचा नट माहिती नसलेल्या अंबानीला ३० हजार कोटी रुपये दिले आणि वरून विमान बांधणीचे कंत्राट दिले. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले.
सिक्कीम भारतात विलीन करून फार मोठा धोका कमी केला, हे तर सर्व सैनिक जाणतात. या दहा वर्षांत चीनने किती भारतीय भूमी गिळली? त्याची माहिती कोण देणार? पण पीएम केअर फंडात चिनी कंपन्यांनी पैसे फेकले आणि यांनी संसदेत जाहीर केले की, ‘एक इंच भी भारतीय भूमी चीन के कब्जे में नहीं है’ मग सीमेच्या आत घुसून गाव वसवले आहे, ती जागा अदानींची की अंबानींची आहे? आता तर २०२४ च्या निवडणुकीत ईव्हीएमला विरोध असूनही तो विरोध मोडीत काढून निवडणूक जिंकून देश खरेदी करायचा की काय, या शंकेला वाव आहे. भाजपचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध झाला. त्याचा जनतेशी, जनतेच्या समस्यांशी कसलाच थेट संबंध नाही. दहा वर्षे सत्तेत असूनही ज्या गोष्टी सहज करता आल्या असत्या, अशा गोष्टी करण्यासाठी त्यांना पुन्हा पाच वर्षे सत्ता हवी आहे. मग गेल्या दहा वर्षांत त्या गोष्टी का नाही केल्या? असा साधा प्रश्न उपस्थित होतो. हा देश आज अशा टप्प्यावर आहे की, देशगाडा हाकणे सोप्पे राहिलेले नाही. पूर्वी जनतेचा वाढत चाललेला रोष काँग्रेसकडे बोट दाखवून दाबला जायचा; पण आता यांनाच सत्तेत दहा वर्षे झाली, तरी तेच दुसर्याकडे बोट दाखवत आहे. जुमलेबाजी फार दिवस करता येत नाही. महिला शक्ति, नारी शक्ती अशा केवळ बाता मारलेल्या आहेत. प्रत्यक्षात महिलांची नग्न धिंड काढली गेली. ऑलिंपिक विजेत्या महिलांच्या इज्जतशी खेळले. जनतेला काही कळत नाही, त्यांना मूर्ख समजले जात आहे. आता चिक्कार फोटोबाजी, जाहिरातबाजी केली जात आहे. आता लोकांच्या रोषाला सामोरे जायची मोदींची तयारी नसावी, असंच जाहीरनामा बघून वाटतंय. भाजप एवढी कधीही सायलेंट नव्हती ती आज झालीय. चारशे पारच्या घोषणेच्या लायकीचा जाहीरनामा तरी आहे का? गेल्या काही दिवसांपासूनचा घटनाक्रम नीट अभ्यासला, तर मोदींनी ‘झोला’ उचललेला आहे हे दिसून येतं.
एरवी ईडी, सीबीआयला घाबरून लोक भाजपविरोधी बोलत नव्हते. आज महाराष्ट्रात मोहिते पाटलांनी भाजपला कोललं आहे. यावरूनच लक्षात येईल की, ईडी, सीबीआयलाही आता कोणी घाबरत नाही. त्याचं मुख्य कारण मोदीच आहेत. नाहीतर निंबाळकर काय दगडधोंड्याचा प्रचारही भाजपने मोहितेंकडून करून घेतला असता. महाराष्ट्रात शिंदे, पवारांची जी अवस्था आहे तीच देशात सर्वत्र आहे. राजकीय व्यभिचार करून संपूर्ण देशाची राजकीय संस्कृती मोदी व भाजपाने खराब केलेली आहे. मोदींनी ‘झोला’ उचललेला आहे. फक्त देशाला आर्थिक संकटात बूडवून ते ‘निकल पडे है!’ ज्या व्यक्तीच्या एका सांगण्यावरून टाळ्या-थाळ्या-घंटा वाजवल्या जात होत्या, टॉर्च दिवे लावले जात होते, तशा काही अपेक्षा आजही बर्याच जणांना होत्या; मात्र सध्या तसं काहीही झालेलं नाही. ही शांतता भाजपची भीती वाढवणारी आहे. या परिस्थितीत सरकार चालवणे कठीण झाले आहे. डुबत्या जहाजातून पहिली उडी निर्मला सीतारामन यांनी मारली. इतकी चांगली कामे या सरकारने केली असल्यास या अर्थमंत्री मॅडमांना निवडणुकीसाठी पैसा कशाला लागतो? हजारो कोटींच्या देणग्या भाजपने इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून उकळल्या आहेत. त्यापैकी पाच पन्नास कोटी रुपये निर्मला सीतारामन यांना निवडणूक लढवण्यास मिळण्याचा भरोसा नसेल का? सोशल मीडियावर विरोधी पक्षांवर कितीही बंधने घातली, तरीसुद्धा सोशल मीडियावर तोंड दाखवायलासुद्धा भाजपला लोकांनी जागा ठेवलेली नाही. अशा परिस्थितीत चारशे पारचा नारा कसा खरा ठरेल? भाजपच्या विरोधात बर्याच गोष्टी गेलेल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रोल बॉण्ड चा डेटा जाहीर करायला लावल्यानंतर भाजप किती खंडणी आणि किती घोटाळेबाज आहे हे सिद्ध झालं. सर्वच गोष्टींवर प्रशासनापासून ते न्यायालयांपर्यंत भाजपचे नियंत्रण होते; मात्र शेवटी शेवटी सर्व काही हातातून सुटताना दिसत आहे. जर ‘चारसो पार’ होत असेल, तर घोटाळे करणार्यांना पक्षात घ्यावंच लागलं नसतं. महाराष्ट्रात दोन पक्ष फोडायची गरज पडली नसती. ईडी, सीबीआयचा वापर करावा लागला नसता. बीफ विकणार्यांकडून फंड घायला लागला नसता. छोट्या पक्षांना हात- पाय जोडून सोबत घ्यायला लागलं नसतं. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबून ठेवावं लागलं नसतं. विरोधकांची बँक खाती ब्लॉक करून ठेवावी लागली नसती. अशा अवस्थेत भाजपाला ‘अब की बार चारसो पार’ पाहिजे तरी कशाला?
जयंत महाजन
९४२०६९१४२०