भाजपाने भलेही ४५±चा नारा दिला असेल, त्यांचे नेते उसने अवसान आणून मोदीजींमुळे परिस्थिती बदलली आहे आणि पुन्हा एकदा भाजपाच विजयी होत आहे, असा दावा जाहीररित्या करत असले तरीही खुद्द देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीमही प्रचंड तणावातून जात आहे, आणि त्यांचा आत्मविश्वास खालावला असून त्यांच्यावर कमालीचे मानसिक दडपण वाढलेले आहे.
साधारणतः १९८६पासून मी वृत्तपत्रीय लिखाण करता करता थेट संपादक म्हणून साप्ताहिक ते दैनिक असा प्रवास २०१५पर्यंत केला. नोट बंदी नंतर आमचे दैनिक महापर्व आर्थिक अडचणीत आले आणि घरघर लागून ते बंदही पडले. यास सर्वात अधिक मोठे कारण प्रिंटिंग कालबाह्य होऊन सोशल मीडिया द्वारे आलेल्या इंटरनेट क्रांतीमुळे वृत्तपत्रीय व्यवस्थाच उखडून फेकली गेली. त्यातही ग्रामीण भागात शोध पत्रकारितेला वाव कमीच असतो, परंतु लिखाणाची सवय काही थांबली नाही. ‘लागले वळण सकल इंद्रियाशी’, असा हा प्रकार…व्यक्त होणं ही माझी मानसिक गरज म्हणा किंवा आजार म्हणा, पण यातून थेट अनेकांशी जोडलो गेलो. साध्या व्हॉट्सअॅप द्वारेही महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात (बडोदा) अशा सर्व पक्षीय आणि संघटना यांच्याशी व्यक्तिगतरित्या जोडला गेलो आहे. यामुळेच अनेक फीडबॅक मिळत राहतात आणि प्रत्यक्ष माहिती, सामाजिक कलही कळत जातात. त्या आधारेच मी हे विधान केले आहे, की भाजपाने भलेही ४५±चा नारा दिला असेल, त्यांचे नेते उसने अवसान आणून मोदीजींमुळे परिस्थिती बदलली आहे आणि पुन्हा एकदा भाजपाच विजयी होत आहे, असा दावा जाहीररित्या करत असले तरीही खुद्द देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीमही प्रचंड तणावातून जात आहे, आणि त्यांचा आत्मविश्वास खालावला असून त्यांच्यावर कमालीचे मानसिक दडपण वाढलेले आहे.
उमेदवार निवडीतील चुका आहेत का? तर असेही नाही. याचे कारण कसलीच आयडेंटिटी नसतानाही अगदी नवखे उमेदवार देऊनही त्यांनी २०१९मध्ये त्यांना निवडून आणलेले होते, आणि यामागे खरोखर त्यांनी निर्माण केलेल्या ‘मोदी’ नावाच्या चेहर्याचे नायकत्व होते.
२०१४ साली सत्ताकारणात त्यांनी नोटबंदीसारखे धाडसी प्रयोग केले. डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक मोठ्या आर्थिक व्यवहारांवर सरकारची नजर राहिली. जीएसटीच्या स्लॅब रचनेतून राज्याच्या उत्पन्नाचा स्त्रोत सरळ केंद्राकडे वळवून त्याचा परतावा राज्याकडे देण्याची शक्ती केंद्राकडे आल्याने राज्य ही केंद्रीय शक्तीचे अधीन आली. जिथे विरोधी पक्षाचे सरकार अस्तित्वात असेल अशा राज्याचे आर्थिक परतावे रोखून धरले गेले. यातून विकास करण्याची राज्य सरकारांची शक्ती क्षीण करण्यात आली. तरीही दुसर्या टर्म मध्ये भाजपा चालली. ‘पूर्वीच्या सरकारची घाण साफ करण्यात आमची काही वर्षे गेली, असे भाजपने म्हटले आणि लोकांनीही त्यास दुजोरा दिला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगला परफॉर्मन्स केला, आणि १०५जागा घेऊन विधानसभेत पोहचली. सत्ता समीकरण जुळवण्यासाठी अजित दादा यांना कळपात ओढून सत्ता स्थापनेचा प्रयोगही केला गेला. तो फक्त ८०तास चालला. अजित दादा यांना परत माघारी बोलावून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय या तीन पक्षांनी एकत्रित येऊन सरकार बनवून भाजपाला सत्ताबाह्य केले. आणि त्यानंतर कोविडचा काळ सुरू झाला. या कठीण काळात मुख्यमंत्री म्हणून पूर्व अनुभव नसलेल्या उद्धवजी ठाकरे यांनी समग्र महाराष्ट्राला सावरले, उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी राज्ये या आपत्ती व्यवस्थापनात कमी पडली.
शेकडो चिता जळताना त्या चितांच्या जळणार्या ज्वालांच्या प्रकाशाने शहरे आणि आसमंतही लाल झालेला लोकांनी पाहिला. अगदीच सुमार बुद्धीचे शोध लावून लोकांना घंटा नाद, ते थाळ्या नाद करून आणि ‘गो कोरोना गो’सारखे नारे देऊन रोगाचा प्रतिकार करू पाहणारी अंधभक्तांची टोळी जगाने पाहिली, आणि असा आदेश देणारे सर्वोच्च पंतप्रधानही पाहिले.
‘भारतीय माणसांचा बुध्यांक तपासणारी ही संघ प्रणित व्यवस्था होती.’ बहुसंख्य जनतेचा मेंदू आपण कब्जात घेतलेला आहे असे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांचा उत्साह वाढला. देश झुकतो आणि महाराष्ट्रातील हे सरकार झुकत नाही ही बाब राज्यातील नेत्यांचा इगो वर आघात करणारी होती. यातूनच केंद्रातून पाठवलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आधारे अनेक अडथळे सरकार चालवताना घातले गेले. नवनीत राणा, अभिनेत्री कंगना, सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर, अॅड. गुणरत्न सदावर्ते, या मंडळीनी इतका आकांडतांडव महा विकास आघाडी समवेत केला, की विचारता सोय नाही. ‘हनुमान चालिसा’,’भोंगे’, अशी धार्मिक उन्मादाची प्रकरणही सुरू राहिली. किरीट सोमय्या यांच्याद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदा विरोधकांचे आर्थिक घोटाळे, त्यानंतर सुरू झालेली धाड सत्रे, कारवाया, आणि यातून अनेकांचे झालेले मानसिक खच्चीकरण, कारवाईच्या टांगत्या तलवारीची अदृश्य भीती…यातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यामधील मोठा गट फोडण्यात व त्यांना स्वतःशी जोडून घेऊन भाजप प्रणित सत्ता आणण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. हा सर्व उघडा नागडा तमाशा जनता पाहत होती, पण जनताही काही करू शकत नव्हती. एक साधा रिक्षा चालक शिवसेनेच्या माध्यमातून अब्जाधीश बनल्याचे जनतेने पाहिले, आणि त्यांना गळाला लावून त्यांच्या माध्यमातून्ा ४०आमदार फुटून झालेले सत्तांतर पाहिले, तसेच पवार साहेबांचे पुतणे अजित पवार यांनाही फुटताना पाहिले. यातील कित्येकांच्या आरोपाच्या फायली बंद होताना पाहिले, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिकृत पक्षांनाच अनधिकृत ठरवताना निवडणूक आयोगालाही पाहिले.
‘जस्टिस डीले इज जस्टिस डीनाईड’ उशिरा दिलेला न्याय हा न्याय नाकारणेच असते, याचाही अनुभव जनतेने घेतला. लोकशाहीच्या चारी खांबांवर झालेले भाजपचे अतिक्रमण, आणि ‘जिसकी लाठी उसकी भैस’ हेही पाहिले. ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ म्हणून शिस्तबद्धता, आणि सदाचार, राष्ट्राप्रति समर्पित, असा प्रचार करून निर्माण केलेली छबी अजित दादा, एकनाथ शिंदे, आणि शहाजी बापू पाटील यांच्यामुळे बरबाद झाली. काल परवापर्यंत आर्थिक कमजोर सदरातील आमदार शहाजी बापू भव्य असा दोन- चार एकरांतील महाल उभा करतो हे जनतेने पाहिले. बिफ कत्तल खाण्याकडून ४६५कोटी चंदा घेणारी, आणि अदानी चे गुजरातमधील बंदरातून हजारो गाई अरब राष्ट्रात कत्तलीसाठी निर्यात होतानाही जनतेने पाहिले. यांचा ‘जय श्रीराम’चा नारा फक्त सत्ता निर्मितीसाठी आहे आणि धर्म हाही भाजपचा ‘चंदा’च आहे, हे जनतेला पटू लागले. एक एक जागा निवडून आणण्यासाठी भाजपने केलेली धावपळ, आणि त्यासाठी जनतेचा पैसा वापरून पाठवलेली चार्टर विमाने, त्या चर्चा गाजत असतानाच अभिजित पाटील चेअरमन असलेल्या विठ्ठल सह साखर कारखाना जप्ती प्रकरण, आणि त्यांनी शरणागती स्वीकारल्यानंतर उठलेली जप्तीही जनतेने पाहिली. रोजगार निर्मितीतील अपयश, शेती मालाच्या बाबतीतील चुकीचे आयात- निर्यात धोरण, वाढती महागाई, पडलेले दुधाचे दर, खासगीकरणाचा वाढलेला वेग, करार पद्धतीने केलेल्या भरत्या आणि या दरम्यान फुटलेले परीक्षा पेपर…फक्त अनागोंदी…! आणि शासन म्हणून आलेले सामूहिक अपयश यामुळे महायुतीची विश्वासार्हता लोप पावली.
तो करंट मला जनमानसात दिसला. यामुळेच महाविकास आघाडी मजबूत झाली आणि जनमत त्यांच्यासाठी अनुकूल बनले. १०माणसातील ७माणसे भाजप विरोधी बनलेली आहेत, आणि निवडणूक रिंगणात कितीही उमेदवार असले तरी ही फक्त दुरंगी लढाईच होणार आहे. मत विभाजनाचे सगळे प्रयोग जनतेने धुडकावून लावले आहेत हेच चित्र तुम्हास ४जून ला पहावयास मिळेल, हे मात्र नक्की. भाजपा दोन आकडी संख्या तरी गाठेल का? अशी शंका निर्माण व्हावी इतका भाजपचा ग्राफ खाली घसरलेला आहे. यातच सर्व काही आले. महाराष्ट्रात भाजपा दारुण पराभवाला सामोरे जात आहे.
अॅड. अविनाश टी. काले
९९६०१७८२१३
अकलूज