अजित पवारांनी भाजप सोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी शरद पवारांना सोडून त्यांच्यासोबत आलेल्या काही नेत्यांबद्दल मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि तिसरे मोठे नाव अर्थातच छगन भुजबळ यांचे होते. या तिन्ही नेत्यांना शरद पवारांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात अगदी भरभरून दिले. शरद पवारांच्या आधाराशिवाय कदाचित या तिन्ही नेत्यांना इतके राजकीय यश मिळाले नसते, त्यामुळेच अजित पवारांसोबत या तिघांची नावे अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. त्या पृष्ठभूमीवर अलीकडील काळात विशेषत: नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार निवडीवरून झालेल्या वादानंतर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपल्या निष्ठेची टोपी तिरकी केली की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
दिल्लीतील ज्येष्ठ भाजप नेत्यांनी नाशिक लोकसभेसाठी आपले नाव निश्चित केल्यानंतरही राज्यातील काही नेत्यांनी वेगळेच राजकारण खेळत आपल्याला बाजूला सारले ही सल छगन भुजबळ यांच्या मनात नक्कीच आहे आणि त्यांनी काही प्रसंगी ती बोलूनही दाखवली आहे. या उमेदवार निवडीच्या वादानंतरच छगन भुजबळ यांनी पवार कुटुंबामध्ये निर्माण झालेले अंतर दुर्दैवी असल्याचे वक्तव्य केले होते. खरे तर एकीकडे अजित पवार आक्रमकपणे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर तुटून पडत असताना छगन भुजबळ यांनी अशी खंत व्यक्त करणे थोडे आश्चर्याचे मानले गेले. कदाचित येत्या काळात राजकीय परिस्थिती पाहून छगन भुजबळ पुन्हा एकदा शरद पवारांच्या तंबूत दाखल होऊ शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
तसेही एकत्र राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या फारसे सख्ख्य नव्हते, परंतु राजकीय तडजोडीतून ते आज तरी एकत्र दिसत आहेत. दरम्यानच्या काळात जरांगे पाटलांचा आंदोलनाच्या वेळी अजित पवारांनी छगन भुजबळ यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता तो देखील कदाचित त्यांच्या पचनी पडला नसावा. त्यानंतर परवाच्या घाटकोपर दुर्घटनेसाठी भाजपचे काही नेते उद्धव ठाकरेंना काही खोचक प्रश्न विचारत जबाबदार धरण्याचा प्रयत्न करीत असतानाच छगन भुजबळ यांनी मात्र राज्यात सरकार आमचे, महापालिका आमची असे असताना विनाकारण राजकारणासाठी उद्धव ठाकरेंना यात गोवणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळांची ही प्रतिक्रिया देखील त्यांच्या मनातील राजकीय अस्वस्थता दर्शवणारी मानली जात आहे.