जगभर होणार्या हवामान बदलाचा जगावर विपरित परिणाम होत आहे. या वर्षी हिवाळा जाणवला नाही; पण उन्हाळ्यात सरासरी सात अंश सेल्सिअसने तापमान वाढले. उष्माघातामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण यंदा जास्त होते. जंगलतोड आणि सिमेंटची जंगले वाढत असल्यामुळे आपण विनाशाकडे चाललो आहोत, याची जाणीव आपल्याला या अंग भाजून काढणार्या उन्हाळ्याने दिली आहे. संपूर्ण आशियामध्ये या वेळी विक्रमी उष्णता आहे. ‘वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन ग्रुप’च्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे, की हवामान बदलामुळे एप्रिल-मेमध्ये संपूर्ण आशियातील उष्णतेच्या लाटा वाढल्या होत्या. त्यामुळे अब्जावधी लोक प्रभावित झाले असून आशियातील अनेक प्रदेशांनी त्यांचे आतापर्यंतचे सर्वात उष्ण दिवस नोंदवले आहेत. म्यानमार, लाओस, व्हिएतनाम आणि फिलीपिन्समध्ये अभूतपूर्व उच्च तापमान दिसून आले. भारताच्या अनेक भागांमध्ये दुपारचे तापमान ४६-४८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले, तर युद्धग्रस्त पॅलेस्टाईन आणि इस्रायललाही ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्णतेचा सामना करावा लागला. दिल्ली, नागपूरच्या पार्याने ५५ अंशाला स्पर्श केला. महाराष्ट्रात अनेक शहरांनी पन्नास अंशाला स्पर्श केला. साहजिकच हवामान बदलामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे.
‘जर्मन वॉच’ने जारी केलेल्या ‘ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स’नुसार भारताला उष्णतेचा तडाखा बसत आहे. ‘ग्लोबल क्लायमेट शिफ्ट इंडेक्स’नुसार, हवामान बदलामुळे मे महिन्यातील उष्णता सामान्य उष्णतेपेक्षा तीन ते सहा अंश सेल्सिअस जास्त असते. जर हवामान बदल झाला नसता, तर तापमान तीन ते सहा अंशांनी कमी झाले असते. ‘युनायटेड नेशन्स इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ (आयपीसीसी) आपल्या अहवालात वारंवार सांगत आहे, की जर हरितगृह वायू उत्सर्जन कमी केले नाही, तर ५० वर्षांच्या आत एक तृतीयांश मानवांना ‘जवळजवळ असह्य’ उष्णतेचा फटका बसेल. काही वर्षांपूर्वी ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या जर्नलमध्ये वर्तवण्यात आलेले भाकीत आता स्पष्टपणे वास्तवात येताना दिसत आहे. सातत्याने वाढणार्या तापमानामुळे ३.५ अब्ज लोक मानवाला लाभलेल्या वातावरणापासून वंचित राहतील. जगाच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्या असलेले भूभाग (आशिया) ग्लोबल वॉर्मिंगमुळे सहारा प्रदेशातील सर्वात उष्ण भागांसारखे उष्ण होत आहेत. संयुक्त राष्ट्राने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगातील सर्व देशांनी त्यांच्या सध्याच्या उत्सर्जन-कपात प्रतिज्ञा (एनडीसी) पूर्ण केल्या तरी, या शतकात कधीतरी जगाला २.५ ते २.९ अंश तापमानवाढीचा सामना करावा लागेल.
मानवी क्रियाकलापांमुळे हवामान किमान मागील दोन हजार वर्षांपेक्षा जास्त उष्ण झाले आहे आणि मागील दशक हे सव्वा लाख वर्षांतील सर्वात उष्ण होते. पृथ्वीची उष्णता शोषून घेऊन, महासागरदेखील गरम झाले आहेत. विशेषतः हिंदी महासागराचे तापमान पूर्वीपेक्षा झपाट्याने वाढत आहे. सततच्या वाढीमुळे, त्याच्या पृष्ठभागाचे तापमान वर्षभर २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे, की पूर्वी हिंदी महासागरात दरवर्षी २० दिवस तीव्र उष्णता असायची; पण लवकरच हे प्रमाण दहापट वाढेल. आता दरवर्षी २२० ते २५० दिवस प्रचंड उष्मा असेल. साहजिकच जमिनीपासून ते समुद्रापर्यंत आपण प्रचंड उष्णतेचा तडाखा सहन करत आहोत. कडक उन्हाचा समाजातील प्रत्येक घटकावर आणि प्रत्येक सजीवाच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे. त्याचा परिणाम वेगवेगळ्या लोकांवर आणि प्राण्यांवर होत असला, तरी त्याचा सर्वाधिक फटका समाजातील गरीब आणि वंचित घटकांना बसतो. कडाक्याच्या उन्हात इलेक्शन ड्युटीसाठी जाणार्या शिपाई आणि इतर कर्मचार्यांना त्याचा फटका बसला. २२ लोकांना प्राण गमवावे लागले. पाटण्याच्या १८ विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्या. जादा उष्ण हवामानाचा गर्भवती महिलांवर वाईट परिणाम होतो. गर्भपाताचे प्रमाण वाढते. निवडणूक कामावर असलेल्या २१ सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचार्यांसह ३० हून अधिक जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निवडणूक आयोगाने निवडणूक घेताना आता सप्टेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांच्या दरम्यान घेण्याचा विचार करायला हवा. राज्यकर्त्यांनीही तशी मानसिकता तयार करायला हवी.
उत्तर भारतात तर उष्मा आता जीवघेणा बनला आहे. उष्णतेच्या लाटेने विक्रमी १६६ जणांचा बळी घेतला. आत्तापर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीवर नजर टाकली, तर काशीमध्ये मे महिन्यात इतकी उष्णता कधीच नव्हती. १९५२ पासून वाराणसीतील हवामानाचे मूल्यांकन केले जात आहे. त्यानंतरच्या आकडेवारीवरून असे दिसून येते, की वाराणसीमध्ये इतके उच्च तापमान कधीच अनुभवले नव्हते. बुंदेलखंड आणि मध्य उत्तर प्रदेशात उष्मा आणि लाटेमुळे ४७ जणांचा मृत्यू झाला. वाराणसी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सेक्टर मॅजिस्ट्रेट, हेड कॉन्स्टेबल, तीन रेल्वे कर्मचारी, होमगार्ड आणि अभियंता यांचाही समावेश आहे. प्रयागराजमध्ये ११, कौशांबीमध्ये नऊ, प्रतापगडमध्ये एक, गोरखपूरमध्ये एका मुलीसह तीन जणांचा मृत्यू झाला. झाशीमध्येही उष्माघातामुळे सहा जण आजारी पडून मृत्यूमुखी पडले. गाझियाबादमध्ये एका अर्भकासह चार, आग्रामध्ये तीन, रामपूर, लखीमपूर खेरी, पिलीभीत आणि शाहजहानपूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. जळगाव, अकोला जिल्ह्यात कधी नव्हे, ती उष्णतेसाठी जमावबंदी आदेश लागू करण्याची वेळ प्रशासनावर आली.
दिल्लीतील तीन केंद्रांमध्ये तापमान ५० अंशापेक्षा जास्त झाले होते. राजस्थानमधील चुरू आणि फलोदी या शहरांमध्ये तापमान ५० अंशांवर पोहोचले आहे. हरियाणातील सिरसा येथेही तीच स्थिती आहे. सामान्यतः असे मानले जाते, की ज्या तापमानात मानव जगू शकतो ते कमाल तापमान ४२.३ अंश सेल्सिअस आहे. उच्च तापमान शरीरातील प्रथिने नष्ट करू शकते. मेंदूला प्रचंड नुकसान होऊ शकते. मानवी शरीराला ४८-५० अंश सेल्सिअस तापमान सहन करणे कठीण आहे. ५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात दीर्घकाळ राहिल्याने मेंदूचे गंभीर नुकसान होऊ शकते. चेतना नष्ट होऊ शकते. ४६ अंशाच्या पुढे मेंदूच्या पेशी मरायला लागतात, कारण प्रथिने मेंदूच्या पेशींमध्ये जमा होऊ लागतात. ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचा मेंदूच्या विविध प्रकारच्या पेशींवर घातक परिणाम होतो. त्यामुळे या तापमानात बाहेर जाणे जीवघेणे ठरते. ज्यांना आधीच हृदयविकार आहे त्यांच्यासाठी जादा तापमान जास्त धोकादायक असू शकते.
राही भिडे
९८६७५२१०४९