मागच्या लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ४० पेक्षा अधिक जागा जिंकणार्या भाजप आघाडीला यावेळी प्रचंड मोठा धक्का सहन करावा लागला. भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आणि भाजपने जोडलेल्या दोन नव्या मित्र पक्षांनाही कोणतीही भरीव कामगिरी करता आली नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत जे काही राजकारण भाजपने केले त्याची चीड मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केली. सूडाच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या विवेकी मतदारांनी धडा शिकविल्याचे या निकालातून दिसून येते. तीन केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीने असली शिवसेना आणि असली राष्ट्रवादी कोणती यावर अगदी मतदारांनी आपले निर्णायक मत दिले असेही म्हणता येईल. अर्थात दोन्ही शिवसेनेत तसा मोठा फरक नाही. शिंदे गटाने या निवडणुकीत १५ जागा लढविल्या होत्या आणि त्यांचे सात उमेदवार विजयी झाले, तर २३ जागा लढविणार्या ठाकरे गटाला नऊ जागा मिळाल्या, परंतु ठाकरे गटाने मुंबई या बालेकिल्ल्यात आपले वर्चस्व कायम राखले.
ठाणे आणि कल्याण शिंदे गटाने जिंकत आपले अस्तित्व ठामपणे दाखवून दिले असेही म्हणता येईल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत मात्र कौल अगदी स्पष्ट होता. अजित पवारांनी हट्टाने लढविलेली बारामतीची जागा शरद पवार गटाने मोठ्या मताधिक्क्याने जिंकत अजित पवारांच्या पक्ष सोडण्याचा निर्णय बारामतीकरांना मान्य नसल्याचेच दाखवून दिले. अजित पवार गटाची लाज राखण्यात तटकरेंना यश आले. काँग्रेसने मोठी उडी मारत राज्यात पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. या पुढच्या राजकारणात राज्यामध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहू शकतो. पुढच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अधिक उत्साहाने, ताकदीने मैदानात उतरेल आणि जनमताचा कौल असाच कायम राहिला तर कदाचित राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते.एकूणच महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या विवेकाने राजकारण्यांच्या विवेकाला साद घातली असे म्हणावयास हरकत नाही.