देशभर मोदी आणि भाजप सुसाट सुटल्याचे सांगणार्या ‘एक्झिट पोल’ने महाराष्ट्रात मात्र सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचे म्हटले आहे. पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त करणार्या महायुतीला महाराष्ट्रात तिशी ओलांडणेही शक्य नसल्याचे हे निष्कर्ष सांगत आहेत. महाराष्ट्रात सामना बरोबरीचा राहिल असे हे पोल सांगत असले तरी महाविकास आघाडीला जवळपास ३५ जागा जिंकण्याची आशा आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी दोन पक्ष फोडून आपल्या सोबत घेतलेल्या नेत्यांच्या पक्षांची कामगिरी अतिशय निराशाजनक राहण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या गटाला एक जागा मिळू शकते, कदाचित तीही मिळणार नाही, ही शक्यता वर्तवितानाच एकनाथ शिंदेंचा पक्षदेखील तीन ते चारच्या पलीकडे जाण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे.
भाजपला देखील पाच ते सात जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.अर्थात इथेसुद्धा गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजूनही भाजपचे काही नेते महायुतीला ३५ ते ३८ जागा मिळतील असे ठाम आत्मविश्वासाने सांगत आहेत, हा आत्मविश्वास कशाच्या जोरावर आहे, हे कळण्यास मार्ग नाही. फार काही गडबड झाली नाही तर महाराष्ट्रात दोन्ही आघाड्यांच्या जागा जवळपास सारख्या राहतील असे दिसते आणि त्याचा परिणाम पुढच्या विधानसभा निवडणुकीत निश्चित होणार आहे. शिवाय खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्नही कदाचित या निवडणुकीने निकालात निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीला अंदाज व्यक्त केला जात आहे त्यापेक्षा थोड्या अधिक जागा मिळाल्या तर कदाचित शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात पडझड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
त्याचवेळी काही चमत्कार घडून महायुतीला अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्या किंवा त्यांचे नेते अंदाज करीत आहे त्यानुसार ३८ पर्यंत महायुती पोहचली तर महाविकास आघाडीमध्ये अफरातफरी होऊ शकते. महाराष्ट्रात वारे तर महाविकास आघाडीच्या बाजूने होते, परंतु शेवटी वार्यांची दिशा बदलण्याचे सामर्थ्य इव्हीएममध्ये नक्कीच आहे, तसे ते बदलले तर काहीही होऊ शकते.