प्रत्यक्षात उपरोक्त शाश्वत मुल्ये ही योग्य दिशेने, आणि उद्देशाने जगण्यासाठी मदत करतात, पुढचा मार्ग दाखवतात आणि योग्य पर्याय निवडण्यासाठी मदत करतात. नैतिक, सामाजिक मुल्ये आपल्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे. असे हे मूल्य पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत ज्येष्ठांकडून मिळायचे, आज विभक्त कुटुंबपध्दतीत ते मिळत नाहीत तर पाळणा घराच्या वाढत्या संस्कृतित मिळणारही नाहीत.
स्वार्थ से होता सिर्फ आपका हित,
नैतिक विचार करें सभी का हित…
समाजात आता नितीमूल्ये राहिली नाहीत, सगळीकडे बेईमानी, भ्रष्टाचार, हिंसा, अशांती, असत्यपणा बोकाळला आहे. नितीमूल्याने कोणी जगू शकत नाही, जगण्याचा प्रयत्न केला तर स्पर्धेत टिकणार नाही, सध्या अनैतिकतेचा प्रवाह आहे, या प्रवाहाच्या विरोधात जगणे कठीण आहे, त्यामुळे जसे चालते तसे चालू द्या, तसेही आपण एकटे काय करु शकतो? असे सर्वच जण सर्वत्र बोलत असतात. आणि ‘कालाय तस्मै नम:’ ही काळाची महिमा आहे, असे सांगून समर्थनही करीत असतात.
ब्रह्माकुमारीज या मोठ्या आध्यात्मिक संस्थेव्दारा माऊंट अबू येथे गेल्या ३० वर्षांपासून वर्षातून दोन वेळा मीडिया विंग व्दारा ‘राष्ट्रीय मीडिया सम्मेलन,’ घेण्यात येते. यावेळीही २३ ते २७ मे २०२४ दरम्यान ‘नविन सामाजिक व्यवस्थासाठी दृष्टि आणि मूल्य: मीडियाची भूमिका,’ या विषयावर हे सम्मेलन पार पडले. यामध्ये विविध चर्चासत्रात एक चर्चासत्र ‘मूल्यनिष्ठ समाजासाठी दृष्टि आणि उद्देश,’ या विषयावर झाले. यावेळी सामाजिक मूल्ये, त्यांचे लोप पावणे, नैतिक मूल्यांची पुर्नस्थापना काळाची गरज आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यावेळी समाज हा मूल्यनिष्ठच असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतांना सद्यस्थितीत समाजात समानता, स्वतंत्रता, धर्मनिरपेक्षता, सत्यता, अहिंसा, विश्वबंधुता आदी सामाजिक मुल्यांची घसरण झाल्याचा सूर निघाला. तसेच नैतिक मूल्य असलेल्या न्याय, प्रामाणिकपणा, सत्य व आध्यात्मिक मूल्य असलेल्या प्रेम, शांती, अहिंसा आणि भौतिक मूल्य म्हणून योग्य पोषक जेवण, घरपण देणारे घर, योग्य पोषाख, कपडे, तसेच सौंदर्यात्मक मूल्य असलेल्या निसर्गाचा रखरखाव, कला आणि सांस्कृतिक मूल्य व शेवटी जीवन मुल्यांमध्ये खूप घट झाल्याचे मान्य करण्यात आले.
भारतात दरवर्षी सुमारे पस्तीस हजार विद्यार्थी आत्महत्या करतात, याचाच अर्थ हा समाज विद्यार्थ्यांना जीवनमुल्य अर्थात कसे जगावे? हे शिकविण्यात कमी पडला, असे म्हणता येईल. भौतिक साधने किंवा त्यांच्या उपयोगानेच जगणे, ही जीवन जगण्याची पध्दत नाही, समाजात वाढते वृध्दाश्रम हे जीवन मुल्यांचा र्हास आहे.
शहरी आणि ग्रामिण भागात फरक पाहिला तर ग्रामिण भागात आजही मोठ्या प्रमाणात मूल्ये जोपासल्या गेली आहेत. भारतातील ६० टक्के लोक ग्रामिण भागात राहतात, तेथे वृध्दांचा सांभाळ, सोबतच मुल्यांची राखण होते. मात्र झगमगाट, भौतिक सुविधांचे आकर्षणाने शहरीकरण स्वीकारलेल्या सिनेमा, सीरीयल व मीडियामधून लहान गावे आणि येथील संस्कृती गायब झाली आहे. विशेष म्हणजे ग्रामिण साहित्यात असलेली मुल्ये मीडियामधून उमटत नाही. परिणामी मूल्य आधारित समाज रचनेसाठी हवी तशी मदत होत नाही.
ब्रह्माकुमारीज्च्या राष्ट्रीय मीडिया सेमिनारमध्ये मुख्य विषयासोबतच ‘मूल्यनिष्ठ समाजासाठी उपाय आणि उद्देश्य,’ तसेच आध्यात्मिक, बुध्दिमत्ता विरुध्द कृत्रिम बुध्दिमत्ता, नविन सामाजिक व्यवस्थेच्या पुनर्स्थापनामध्ये मीडियाची भूमिका. या मीडियाशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. वास्तविक गेल्या ३० वर्षात (कोविड काळ वगळता) झालेल्या ५८ सेमिनारमध्ये सुमारे दोन लाख पत्रकारांनी सहभाग घेतला आहे. नविन समाज व्यवस्था, मुल्यांची पुनर्स्थापनामध्ये पत्रकारितेचा सक्रिय सहभाग असावा, असा उद्देश ब्रह्माकुमारीज मीडियाविंगचे अध्यक्ष बी.के.करुणा भायजी, नॅशनल कॉर्डिनेटर बी.के.शंतनु भायजी यांचा आहे. प्रत्यक्षात उपरोक्त शाश्वत मुल्ये ही योग्य दिशेने, आणि उद्देशाने जगण्यासाठी मदत करतात, पुढचा मार्ग दाखवतात आणि योग्य पर्याय निवडण्यासाठी मदत करतात. नैतिक, सामाजिक मुल्ये आपल्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे. असे हे मूल्य पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत ज्येष्ठांकडून मिळायचे, आज विभक्त कुटुंबपध्दतीत ते मिळत नाहीत तर पाळणा घराच्या वाढत्या संस्कृतित मिळणारही नाहीत. तेव्हा मूल्यआधारित समाजाची संकल्पना धोकयात आली आहे. यासाठी शिक्षणातून नितीमूल्य शिकविल्या जात आहे.
समाजात बेईमानी, भ्रष्टाचार, अनैतिकता, गैरवर्तन, गुंडगीरी, हिंसा, महिलांचे विनयभंग, अत्याचार, चारित्र्यहिन तरुणाई, व्यसनाधिनता, आदी सर्व समस्या मूल्यांच्या लुप्त होण्याने वाढणारच आहेत. तेव्हा हा धोका कमी करण्यासाठी प्रत्येकाने व्यक्तिश: व सामाजिक स्तरावर नितीमूल्ये वाढीस लावण्याचे काम केले पाहिजे. यासाठी आध्यात्माचा मार्ग उपयोगी ठरु शकतो, एवढे मात्र खरे! शेवटी समाजात मूल्य राहण्यासाठी मूल्यनिष्ठ माणसांची गरज आहे, ‘जशी माणसे तसा समाज’ हा सिध्दांतच आहे. मूल्य संपल्यास काय होईल? यासाठी ‘अभी भी वक्त है’ या कवितेतील ओळी आठवतात…
हुए जो खतम ये मूल्य मेरे, सृष्टि का विनाश आयेगा।
प्रलय की आंधी मे सब, चकना चूर हो जाएगा।
राजेश राजोरे
९८२२५९३९०३