बाळासाहेब ठाकरेंचे माझ्यावर अतिशय प्रेम होते आणि मलाही त्यांच्याबद्दल कायमच आदर वाटत आला आणि म्हणूनच बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून मी उद्धव ठाकरेंनाही कधी शत्रूवत मानले नाही, त्यांची प्रकृती चांगली नव्हती त्यावेळी मी सातत्याने दूरध्वनीवरून त्यांची चौकशी केली, अडचणीत त्यांच्यासाठी धावून येणारा मी पहिला असेल, या मोदींच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात थोडी फार खळबळ उडाली आहे. मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी खिडकी उघडी ठेवली आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली. मोदींचा एकूण स्वभाव बघता भावनेच्या भरात वगैरे ते काही बोलून जातील असे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याकडे राजकीय दृष्टीनेच अधिक पाहिले जात आहे.
उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला खरा; परंतु या नव्या राजकीय मांडणीतून त्यांच्या वाट्याला काय आले किंवा येऊ शकते, यावर त्यांनी पुनर्विचार करावा, अशी अपेक्षा मोदींच्या वक्तव्यातून व्यक्त होत असल्याचे दिसते, शिवाय शिवसेनेत दुभंग निर्माण केल्यावरही शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग आजदेखील उद्धव ठाकरेंसोबत आहे, या वस्तुस्थितीची जाणीव मोदींना झाल्याचेही त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात चलबिचल निर्माण करण्यासाठीच मोदींनी ही गुगली टाकली, असे म्हणता येऊ शकते. मोदींची नजर लोकसभा निवडणुकीनंतरच्या गणितावर आहे.
उद्धव ठाकरेंनाही पुन्हा एनडीएत सामील करून एनडीएची ताकद वाढविण्याची त्यांची योजना असू शकते. अर्थात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे काय करायचे हा प्रश्न आहेच; परंतु राजकारणात अशक्य असे काहीच नसते. कदाचित मोदींच्याच पुढाकाराने शिवसेनेच्या या दोन्ही गटात समझोता होऊ शकतो. दोन्ही गटाचे एकत्रिकरण हे सध्या तरी अवघड वाटत असले तरी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडल्यास काही मध्यममार्ग निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय यशापयशाचा विचार करता सध्या शिवसेनेच्या दोन्ही गटापुढे पुढे कसे जायचे हा यक्षप्रश्न दिसतो. नेमक्या त्याच मुद्याला मोदींनी अप्रत्यक्षपणे स्पर्श केला आहे, शिवाय त्यातून एकनाथ शिंदेंनाही त्यांनी योग्य तो संदेश दिला आहेच.