‘ओ काशिनाथ.. एखांदी लुंगी आहे काय शिल्लक तुह्या घरी? माहे सासू-सासरे आले मुक्कामी.. सासर्याले पाह्यजे राती झोपाले.’
‘लुंगी नाही राजेहो.’
‘मंग आता काय नेसीन सासरा?’
‘बुढ्याचं धोतर नेसाले लावा.’
‘सासर्याले धोतर नेसता येत नाही.’ ‘नाईट पँट नाही काय तुमच्या घरी?’
‘नाही ना.. मीच त टवाल गुंडून झोपतो.’
‘एखांदी लोअर आना.. पावना आला की कामात येते.’
‘हो लेक..एखांदी लोअर आनाच लागते.’
‘मंग आज राती चड्डीवर झोपीन काय तुमचा सासरा?’
‘तोच विचार पडला मले..सासरा म्हनीन की जवाई लय लंब्या गोष्टी करते.. एक लुंगी नाही लेकाच्या घरी.’
‘पतली बेडशीट नाही काय तुमच्या घरी? पतली बेडशीट गुंडली की लुंगीच होते.’
‘एकच बेडशीट आहे.. ते पलंगावर पाह्यजे.’
‘काय नेसते सासरा? फुलपॅड की पायजामा?’
‘सासरा आगुदर फुलपॅड नेसे.. माह्या लग्नापासून पायजामे सुरू केले. त्या बुवानं कपडे आनले नाहीत. पायजाम्यावर झोपले तर चोयमोय होते.’
‘बरमुंडा आहे राजेहो.’
‘हे काय असते? ‘
‘टोंगायलोक हाप पँट असते. फुलपँट कतरला की बरमुंडा होते.. हा घ्या पिंट्याचा बरमुंडा..’
‘हे कसं नेसा लागते?’
‘हापपँड सारखं नेसा लागते.’
‘कुठून आनला बे हा बरमुंडा?’
‘आमचे मोठे भाऊ मिल्टरीत असतात. त्याहिचा फुलपँड खालून कतरला अन् त्याचा बरमुंडा केला.’
‘काय लेका.. सासरा हे नेसल्यावर सासू काय म्हनीन? नवर्याले पाहून तिले हासा येनार नाही काय?’
‘रातभर्याची गोठ आहे.. गावात घालून फिरा लागते काय?’
‘पाह्यतो बुवा सासरा नेसते काय?’
‘अन काहो.. सासरा बरमुंडा नेसीन अन सासू काय नेसीन?’
‘तिच्यासाठी बायकोनं शेजारीनचा गाऊन मागून आनला.’
‘हे बरं केलं.. सासू गाऊनवर अन् सासरा बरमुंडावर.. मोबाईलवर एखांदा फोटो काढून पाठवजा मले..’
नरेंद्र इंगळे
९५६१२२६५७२