कोणताही मुद्दा असो, प्रश्न असो, विषय असो की आणखी काही असो, ते इतरांमुळे निर्माण होते तसेच माणसामुळे सुद्धा होत असते. याची जाणीव एकदा झाली आणि ती मनातून मान्य झाली म्हणजे कोणताही क्षण असो, कोणताही प्रसंग असो, माणसाला त्याला सावरून घेणं फार काय कठीण आहे?
माणसाच्या हातून सगळंच काही कसं बरोबर होईल? कधीतरी काहीतरी चुकीचं होऊ शकतं. ते चुकीचं होईल किंवा असतं, असं नाही मात्र इतरांच्या दृष्टीने कदाचित ते चुकीचं असू शकतं. मग अशावेळी अमुक करा किंवा करू नका, असं कोणी म्हटलं म्हणजे एखाद्या माणसाला ते चुकीचं वाटतं अयोग्य वाटतं, बरं वाटत नाही, याची काही कारणं असतील काय? कदाचित असतात. याचं कारणही तसंच आहे. प्रत्येक माणसाला त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या गरजेनुसार एखादं काम करायचं असतं मात्र ते इतरांच्या दृष्टीने कदाचित योग्य नाही असं होऊ शकतं. इथेच खर्या अर्थाने मतभेद म्हणा, विचारभेद म्हणा, निर्माण होऊ शकतो. पण कोणी असं का म्हणालं, याचा विचार करायला हरकत नाही. असा विचार केला जात नाही, हीच खरी अडचण आहे आणि त्यातून मग अनेक भावभावनांचा विरोध निर्माण होऊ शकतो.
दररोजच्या सामान्य जगण्यामध्ये माणसाला अनेक ठिकाणी गरज म्हणून, आवश्यक म्हणून कुणी काही सांगत असतं जे माणसाच्या हिताचं असतं. कुणी कुणाला सल्लाही देऊ शकतं, देत असतं. पण ते माणसाच्या हिताचं आहे किंवा नाही, याचा विचार केला जात तर नाहीच अन् ते आवडलं नाही, पटलं नाही म्हणजे बाजूला ठेवून दिलं जातं आणि एक प्रकारचा मानसिक विरोध निर्माण होत असतो. हे असं का होत असेल बरं ? तर त्याला कारणंही तशी अनेक आहेत. माणसांचा परस्परांविषयी असलेला विचारभेद, सहनशीलतेचा प्रचंड अभाव, स्वाभिमान आणि अहंकार यातली पुसटशी सीमारेषा पार करत वाढत जात असलेला अहंकार, इतरांच्या विचारांचा-माहितीचा योग्यवेळी, योग्य तो सन्मान करण्यासाठी चालढकल करण्याची सवय, एखाद्या सूचनेत माझेही हित आहे अशी सकारात्मक वृत्ती नसणे, सगळं काही मनाप्रमाणे, इच्छेनुसारच झाले पाहिजे असं वाटतं राहणं असलं म्हणजे एखादा सल्ला किंवा सूचना कसे काय पचनी पडेल?
अगदी साध्या-साध्या घटना म्हणा किंवा प्रसंग असतात. कोणाला कोणाच्या गाडीचा हलकासा धक्का जरी लागला तरी तो फक्त प्रश्नार्थक चेहर्याने फक्त पाहत नाही, तर त्यामध्ये काहीसा संतापही असतो. खरंतर त्याला केवळ मनातून म्हणायचं असते- ‘दिसत नाही का तुम्हाला ? कसा काय मारला धक्का ? नीट गाडी चालवत जा ना, वगैरे-वगैरे. ‘ अशातच जर धक्का मारणार्या माणसाने क्षमा मागितली नाही किंवा विनंती केली नाही तर भररस्त्यात भांडण झालेच म्हणून समजावे. जागा रिकामी दिसली म्हणजे लोक आपली वाहन त्या ठिकाणी लावण्याची शक्यता असते. अशावेळी कोणी जर टोकलं अन् म्हटलं ‘ इथं गाडी लावू नका ,थोडी बाजूला घ्या, तिकडे लावा, आमची गाडी इथे लागणार आहे, वगैरे वगैरे …’ तर लोकांना ते मुळीच आवडत नाही प्रसंगी रागही येतो, चिडतात सुद्धा! कधी-कधी तर वादसुद्धा घालतात. सार्वजनिक कार्यक्रमप्रसंगी अनेक गाड्यांच्या रांगा असतात, निश्चित केलेली ठिकाण असतात. त्यावेळेला त्या ठिकाणी कामावर असलेल्या माणसाने जर सांगितलं, की अमुक ठिकाणी गाडी लावा किंवा आणखी काही योग्य म्हटलं तर ते अनेकांना आवडत नाही, ते लगेच उत्तर देतात- ‘लगेच येतो, काय हरकत आहे, इतरांच्या तर आहेतच की इथे गाड्या, वगैरे-वगैरे. पण अमुक ठिकाणी गाडी लावू नका असं म्हणण्यामध्ये सर्वांचीच सोय आहे, आवश्यक आहे, शिस्त आहे, हे मात्र माणूस पार विसरतो आणि तो मनातून नाराज होण्याची शक्यता निर्माण होते.
काही क्षणांसाठी का असेना पण खरंतर कोणी केलेली टीका, कुणी काढलेले दोष, कुणी केलेल्या काही महत्त्वाच्या आवश्यक सूचना ह्या माणसाच्या जगण्याला चांगला आकार देऊ शकतात, नव्हे देत असतात याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. माणसात नकारात्मकता असेल तर चांगल्यासाठी केलेल्या सूचना किंवा माहिती, क्वचितच आदेश हा नकोसा वाटण्याची शक्यता असते. खरंतर हा मानसिकतेचाच भाग आहे. एकदा एक माणूस एका घरासमोरून जात असताना त्या ठिकाणचा रहिवासी त्याच्याशी बोलत त्याचे दोष, त्याच्या चुका, त्याने काय करावं याविषयी सतत बोलत असे. एक दिवस त्याला हा माणूस दिसला नाही तर चौकशी केली. त्यावेळेला समजले की सगळं काही बोलणारा माणूस अनेक दिवसांसाठी बाहेरगावी निघून गेला आहे. दररोज तिथून जाणारा माणूस खूपच निराश झाला. त्या वेळेला दुसर्या कोणीतरी त्याला विचारलं, ‘काय झालं ? का बरं असे करत आहात ? ‘त्याने उत्तर दिले,’ हा माणूस बरेच दिवसांसाठी निघून गेला आहे. आता मला कोण माझे दोष दूर करणार ?’ बरेच दिवस निघून गेलेत. काही दिवसांनी तोच माणूस पुन्हा त्याला घरासमोर दिसला तर खूप आनंद झाला कारण त्याच्या चुका काढणारा अर्थात दोष दूर करणारा माणूस पुन्हा भेटल्याचा त्याला आनंदही झाला. धन्यवाद देत पुढे निघून गेला.
प्रसिद्ध गझलकार दुष्यंतकुमार यांच्यावरील एका पुस्तकाचे संपादन करताना प्रसिद्ध लेखक विजय बहादुर सिंह यांनी ‘ गौतम बुद्ध से ‘ या कवितेत म्हटले आहे –
आज नही तो कल, जब ऋतू बदलेगी,
अपने जख्म भरेंगे, जिनको तुमने छेडा,
हम भी उन प्रश्नाें पर मनन करेंगे!
कोणताही मुद्दा असो, प्रश्न असो, विषय असो की आणखी काही असो, ते इतरांमुळे निर्माण होते तसेच माणसामुळे सुद्धा होत असते. याची जाणीव एकदा झाली आणि ती मनातून मान्य झाली म्हणजे कोणताही क्षण असो, कोणताही प्रसंग असो, माणसाला त्याला सावरून घेणं फार काय कठीण आहे?
प्रा.डॉ.मोहन खडसे
९८२३२८९०१०
( प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभ लेखक, शिक्षण तज्ज्ञ असून त्यांच्या ‘ सावित्री फाऊंडेशन, अकोला’ च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक,
शैक्षणिक कार्य करतात.) अकोला
ईमेल:mvkhadse9@gmail.com