शरद पवार परिस्थितीनुसार रंग बदलतात, ही वस्तुस्थिती सत्य आहे. देशात प्रादेशिक पक्षाची अस्मिता भाजप संपुष्टात आणू पहात असताना पवारांनी नेमका पत्ता फेकला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील विचारसरणीत काही फरक नाही. काँग्रेस पक्षात आपला पक्ष विलीन करणार का? या प्रश्नावर सहकार्यांना विचारून योग्य तो निर्णय होईल, असे ते म्हणाले. याचाच अर्थ ते पुन्हा विलीनीकरणाच्या दिशेने निघालेच.
चित्रपटातील वादग्रस्त अभिनेता सलमान खान त्याच्या एका चित्रपटात म्हणतो की, ‘जो मै बोलता हूँ, वो करता हू और जो मै नही बोलता वो तो जरूर करता हूँ.’ शरद पवारांनी प्रादेशिक पक्षांचे काँग्रेससारख्या समान विचाराच्या मोठ्या पक्षात विलीनीकरणाचे संकेत दिले अन हळूच ते मागेदेखील घेतले; परंतु यानिमित्ताने भारतीय जनता पक्षासह अनेकांना त्यांनी कामाला लावले, याचा विसर राजकीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना जरूर पडला. शरद पवार काहीही करू शकतात, याचा अंदाज त्यांच्या विरोधकांना नेहमी आला आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत एखादे विधान प्रसारित झाले, तर त्याचा ते गांभीर्याने विचार करतात. लहान पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होण्याची शक्यता शरद पवारांनी वर्तवल्यावर सर्वात मोठा हादरा अजितदादा पवार यांनाच बसू शकेल. कारण शरद पवार यांना विरोध करून दादांचे राजकारण उभे राहणार आहे; पण शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन झाला, तर ती एक मोठी ताकद निर्माण होऊ शकते. तिच्याशी समर्थ सामना करणे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ अशक्य ठरू शकेल. त्यावरून सत्ताधार्यांनी शरद पवारांवर टीका करायला सुरुवात केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदान होण्यापूर्वीच त्यांनी हे विधान केल्यामुळे नेमकी काय भूमिका घ्यावी हेच शरद पवारांच्या विरोधकांना समजेनासे झाले आहे. अतिसामान्य विषयसुद्धा कोड्यात-गूढवलयाच्या वेष्टणात सादर करून चर्चा करून आणणे, ही दोन्ही टोके मोकळी सोडण्याची त्यांची भाषा, राजकारणातील अनेक विरोधकांना नामोहरम करण्याची कला फार कमीजणांना अवगत असते. त्यांच्यावर टिका टिप्पणी करण्याची राजकारणातील एक परंपरा महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत तीसुद्धा महाराष्ट्रातील फितुरांच्या संगतीत निर्माण झाली. त्याचा फारसा विचार त्यांनी कधी केला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ज्या पद्धतीने तरुण शेतकर्यांच्या मुलांची मोट बांधली, ती तर लाजवाबच आहे. कारण शरीराने थकलेल्या पवारांनी नवीन मार्ग शोधून, स्वत: आघाडीला राहून पुनर्बांधणीचा एक आश्वासक चेहरा म्हणून नेतृत्वही केले. २००४ मध्ये दुर्दम्य आजारावर मात करत आज २०२४ मध्ये सत्ताधारी पक्षावर ते मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. योद्धा हा कायमच तयार असतो. मग ते युद्ध असो की निवडणूक. राजकीय रणांगणात ४२ डिग्री सेल्सिअस तापमानात वयाच्या ८४ व्या वर्षी फिरणारे पवार आता जर विलीनीकरणाची चाचपणी करीत असतील, तर ती त्यांची खासियतच समजली पाहिजे. ‘एनडीए’ प्रणित भाजपा सरकारला नागरिक कंटाळले असून देशात ‘इंडिया’ आघाडीच्या बाजूने जनतेने झुकते माप दिल्याचे शरद पवारांचे म्हणणे आहे. काही पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होऊ शकतील. एवढेच नव्हे, तर आमच्या पक्षाची विचारसरणी नेहरू- गांधींच्या विचारसरणीशी मिळती जुळती आहे. म्हणून आम्ही ‘इंडिया’ आघाडी सोबत आहोत, असे सांगून एक दिवस पवारांनी वाट पाहिली. नंतर हळूच विलीनीकरणाचा कुठला प्रश्नच येत नाही, शरद पवारांनी असे कुठलेही संकेत दिले नाहीत, असे पक्षाच्या प्रवत्तäयांनी सांगायला सुरुवात केली. त्यामुळे बहुतेक शरद पवार आपला पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करतील हीच खरी शक्यता आहे. कारण वाढते वय व पवारांच्या पश्च्यात तितक्यात ताकतीने पक्ष चालविण्याची ताकद सुप्रिया सुळेंमध्ये असेलच, अशी शक्यता वाटत नाही. याशिवाय सुप्रियाताईं व्यतिरिक्त असा एकही ताकदवान नेता राष्ट्रवादीच्या पवार गटात नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले व विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असलेले सर्वजण काँग्रेसच्या गोटात विलीन झाले, तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची किंमत शून्य झालेली राहील.
पवारांना त्रास देणार्यांना ते याच पद्धतीने संपवतात, हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. म्हणूनच ‘जो मै बोलता हूँ, वो करता हूँ और जो मै नही बोलता, वो तो जरूर करता हूँ’ या वाक्याची आठवण जरूर येते. पवारांनी पुन्हा एकदा विलीनीकरणाचा पत्ता फेकून विरोधकांना गारद करून टाकले आहे. शरद पवार परिस्थितीनुसार रंग बदलतात, ही वस्तुस्थिती सत्य आहे. देशात प्रादेशिक पक्षाची अस्मिता भाजप संपुष्टात आणू पहात असताना पवारांनी नेमका पत्ता फेकला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील विचारसरणीत काही फरक नाही. काँग्रेस पक्षात आपला पक्ष विलीन करणार का? या प्रश्नावर सहकार्यांना विचारून योग्य तो निर्णय होईल, असे ते म्हणाले. याचाच अर्थ ते पुन्हा विलीनीकरणाच्या दिशेने निघालेच. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज असे म्हणतात की, शरद पवार राज्याच्या राजकारणातील असे नेतृत्व आहे की, हवामान खात्याला त्यांच्या खात्याचा अंदाज येऊ शकत नाही, मात्र पवारांचे राजकारणातील अंदाज अचूक असतात. कदाचित भविष्यातील राजकारणाचा अंदाज आल्यामुळेच त्यांनी अश्ाा प्रकारचे स्टेटमेंट करून अंदाज घ्यायला सुरुवात केली असावी. राजीव गांधी यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी नगरमध्ये ज्या पद्धतीने ‘समाजवादी काँग्रेस’ काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली होती, तोच प्रयोग कदाचित आता केला जाईल. ज्यावेळी ‘समाजवादी काँग्रेस’ काँग्रेसमध्ये विलीन झाली, त्यानंतर काही काळानंतर शरद पवार पुन्हा एकदा काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते, याची आठवण संपूर्ण राज्याला आहेच. त्यामुळे बारामतीत ‘मडके’ फोडून कुणाच्या तरी ‘जाण्याची’ वाट पाहणार्यांना दणका देण्याचा विलीनीकरणाचा प्रयोग पवारांच्या सुपीक डोक्यात आला असेल, तर मडके फोडणार्यांना तो गंभीर इशाराच असावा.
प्रा. जयंत महाजन
९४२०६९१४२०