प्रा.डॉ.मोहन खडसे
खरंतर काही गोष्टी, काही मुद्दे म्हणजे मानसिक समस्या असते. प्रत्येकाला दुसरा माणूस अधिक सुखी आनंदी दिसतो, असतोही मात्र स्वतःकडे माणूस पाहत नाही, स्वतःची स्थिती त्याला जाणवत नाही हीच खरी गोम आहे अन् असमाधानाचे कारणसुद्धा! इतरांशी तुलना करत-करत त्यांच्या आनंद आणि समाधानाकडे पाहत स्पर्धा आणि फक्त स्पर्धा करण्याच्या विचारात असलेल्या माणसांना आनंद आणि समाधानाचा स्पर्श लवकर होत नाही, हेही तितकेच खरे!
कोणत्याही परिस्थितीत अन् वातावरणात काही माणसं नुसतीच जिवंत राहत नाहीत तर आनंदात राहण्याचा प्रयत्न करतात. काहीशी, कधी-कधी कुरकुर करतात, पण लगेच कामाला लागतात. कुणी त्याला जगण्याचे भोग म्हणतात तर कुणी नशीब वगैरे म्हणतात. पण फार काळ त्यांच्या त्या विषयाला चिडवत बसत नाहीत. सगळ््याच गोष्टींचे समायोजन करत, जुळवून घेत काही ना काही काम करत राहतात अन् जे वाट्याला येईल ते आनंदाने करतात. खरं म्हणजे कुरकुर करण्याला ते फार वेळच देत नाहीत हे महत्त्वाचं. त्यांना माहीत असतं की नुसती कुरकुर करून काय उपयोग आहे? काहीतरी करावं, प्रयत्न करावा, धडपड करावी, विचार करावा आणि शक्य तेवढी कृती करावी. बस! असा विचार केल्याने त्यांची एकूण स्थिती तर बदलत नाही मात्र मन:स्थिती नक्कीच बदलते. हेच त्यांच्या समाधानाचे आणि आनंदाचे मूळ असते.
सर्वच बाबतीत जे काही मिळालं आहे, त्याची दखल न घेणे अन् जे त्यांच्याकडे नाही त्याकडे जास्त लक्ष देणे ही सर्वसाधारणपणे माणसांची प्रवृत्ती असते. नोकरी करणार्याला वाटतं धंदा बरा, धंदा करणार्याला वाटतं नोकरी बरी. शहरात राहणार्याला वाटतं गावात किती शांतता आहे अन् गावात राहणार्याला वाटतं शहरात किती चमक-धमक आहे, सगळं काही मिळतं. डोक्यावर कुरळे काळे केस असणार्याला वाटतं-किती गुंता, किती काळजी करावी आणि टक्कल पडलेल्या माणसाला वाटतं-असे कुरळे केस माझ्या डोक्यावर असते तर? मुलगी असणार्याला वाटतं- आपल्यालाही मुलगा असावा अन् मुलगा असणार्याला वाटतं मुलगी असती तर? ज्याला मुल नसतं तो विचार करतो काहीही असतं तर चालेल! देशात राहणार्यांना वाटतं परदेशात जावं अन् परदेशात राहणार्यांना वाटतं किती तडजोड करावी हो इथे? अशा विचार केल्यामुळे समाधान आणि आनंद बर्याच जणांना नसतो. खरं म्हणजे कशात आनंद आणि समाधान आहे हेच बर्याच लोकांना जाणवत नाही, कळत नाही असं म्हणायला हरकत नाही. काहीजण मग एखाद्या विचाराकडे वळतात ते असं की संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी म्हटलंच आहे –
ठेविले अनंते तैसेचि राहावे।
चित्ती असू द्यावे समाधान।।
हाही विचार अनेकांना आधुनिक काळामध्ये तरी पूर्णपणे पसंत पडत नाही, आवडत नाही, योग्य वाटत नाही म्हणून ते अधिक चांगलं समजलं जाणार्या जगण्याकडे धडपड करण्याची शक्यता असते. याला हरकत घेण्याचं कारण नाही मात्र जे काही मिळालं आहे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कसे काय करणार? कोणताही विचार प्रत्येकाला पूर्णपणे योग्य वाटू शकत नाही हे खरं, पण विचारच लक्षात घ्यायचा नाही, हे मात्र चुकीचे होऊ शकते. खरं म्हणजे कोणत्याही तत्त्वज्ञानातील-विचारातील जेवढं समजतं, जेवढं मनाला पटतं, तेवढं स्वीकारावं आणि पुढे प्रयत्न करत राहावं, धडपडीचा आधार घेत असलेलं केव्हाही बरंच. खरंतर काही गोष्टी, काही मुद्दे म्हणजे मानसिक समस्या असते. प्रत्येकाला दुसरा माणूस अधिक सुखी आनंदी दिसतो, असतोही मात्र स्वतःकडे माणूस पाहत नाही, स्वतःची स्थिती त्याला जाणवत नाही हीच खरी गोम आहे अन् असमाधानाचे कारणसुद्धा! इतरांशी तुलना करत-करत त्यांच्या आनंद आणि समाधानाकडे पाहत स्पर्धा आणि फक्त स्पर्धा करण्याच्या विचारात असलेल्या माणसांना आनंद आणि समाधानाचा स्पर्श लवकर होत नाही, हेही तितकेच खरे!
माणूस कुणीही असो, त्याच्या विचारांची, इच्छेची गंमतच असते बघा.’ किसी को कोई मुकमल्ल जहां नहीं मिलता’ असं म्हणतात हे खरं पण सगळं मिळत नसलं तरी काहीतरी नक्कीच मिळत असतं. कोणत्याही माणसाच्या खूप इच्छा असतात अन् असल्याही पाहिजे पण सगळंच काही मनासारखं होऊ शकत नसते. जे आहे जसं आहे त्याचा स्वीकार करत, शक्य तेवढा बदल करत, प्राप्त परिस्थितीतच उत्तम करण्याची धडपड करत समाधान शोधायला पाहिजे की नाही? सगळंच काही बदलता येत नसते अन् संधी मिळेल तिथे तक्रारी करूनही काही तरी साध्य होते काय? नाही ना? मग उपाय असा आहेच! एक तरुण लेखक, गझलकार, पत्रकार, सामाजिक अन् राजकीय विषयावर दमदार लेखन करणारे निशांत पोहरे त्यांच्या ‘सरगोशियां’संग्रहात म्हणतात –
अफ्साना-ए-हस्ती मिटी नही
कुछ जकाब बाकी हैं अभी
ये भी हो जायेंगे कभी पुरे
कुछ जो ख्वाब बाकी हैं अभी
(जकाब- शाई)
(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभ लेखक,
शिक्षणतज्ज्ञ असून त्यांच्या
‘सावित्री फाऊंडेशन, अकोला’ च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात)
अकोला
मो.नं.-९८२३२८९०१०