मोदींना जागतिक पातळीवरचे नेते व्हायचे आहे, त्यामुळे येथून पुढे ते संघाच्या मर्जीनुसार कसे चालतील? त्यामुळे संघाला आता त्यांची जागा दाखवायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे दोन टप्प्यांतील मतदान बाकी असताना नड्डांनी केलेले विधान धाडसीच म्हणावे लागेल!
भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या आपापसातील नात्याला तडे जात असल्याचे आता जाणवू लागले आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यापूर्वी प्रादेशिक पक्षांना संपुष्टात आणून भारतीय जनता पक्षाला मोठे व्हायचे आहे, असे विधान केले होते. त्यानंतर अनेक प्रादेशिक पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडवून त्यांचे विधान त्यांनी सत्य करून दाखविले होते. महाराष्ट्र हे त्याचे ज्वलंत उदाहरण ठरले; पण आता तर त्यांनी जे विधान केले ते धक्कादायक असून सर्वांनाच विचार करायला लावणारे आहे. भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील भाजपला गरज नसल्याचे त्यांचे विधान ऐकून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात पूर्वीसारखे मधुर संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. ‘भारतीय जनता पक्ष आता स्वयंपूर्ण झाला असून आपला कारभार स्वतंत्रपणे करतो आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही थोडे कमी पडायचो, तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे भाजपा स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळते’, अशी भूमिका जाहीर करून नड्डांनी आरएसएसला त्यांची जागा दाखवून दिली. ‘वापरा व फेकून द्या’ ही उद्धव ठाकरे यांची भाजपवरील टीका किती यथार्थ होती हे दिसून आले.
जर संघाच्या बाबतीत भाजपा अशी भूमिका घेत असेल, तर काल-परवा त्यांनी कवेत घेतलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेचे व अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे भविष्य काय असेल याचा अंदाज सहज आला. ज्यांचे काम संपले असेल, त्यांना धक्का मारून हाकलून देण्याऐवजी दुर्लक्षित केले जाईल हे स्पष्ट झाले. भाजपाला आता संघाच्या पाठिंब्याची गरज पडत नाही का? असा प्रश्न नड्डा यांना विचारलं असता ते म्हणाले होते की, ‘आमच्या पक्षाची आता वाढ पूर्ण झाली आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची कर्तव्ये आणि भूमिका समजते. ‘आरएसएस’ ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे, तर आम्ही राजकीय संघटना आहोत. इथे गरजेचा प्रश्न नाही. आरएसएस ही एक वैचारिक शाखा आहे. ते वैचारिक दृष्टीने आपले काम करतात, आम्ही आमचं काम करतो. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं कामकाज पाहतो’. या त्यांच्या विधानामुळे आजपर्यंत भारतीय जनता पक्षाची वाढ ज्यांच्या बळावर झाली होती, त्यांनाच आता ‘तुम्ही दूर व्हा’ असे सांगितल्याचे जाणवते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या सर्वांनी कधीही संघाला कमी लेखण्याचे प्रयत्न केले नव्हते. ज्यांनी तसे प्रयत्न केले, त्यांना संघाने अलगद बाजूला केले होते; परंतु आता भाजपची ताकद वाढल्याने त्यांनी संघाला देखील ‘हस्तक्षेप करायचा नाही’, अशी जणू मूक धमकी दिल्याचे जाणवते. यामुळे भाजप किंवा आरएसएस मध्ये वाद होईल असे वाटत नाही.
तथापि, ‘गरज सरो वैद्य मरो’ ही भाजपची भूमिका अधिक स्पष्टपणे अधोरेखित झाली. आता संघाविनाही भाजपला राजकीय निर्णय घेता येतात, या नड्डांच्या विधानात दर्पोक्ती दिसून येत आहे. ज्यांचे बोट धरून सत्तेच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसले, त्यांनाही झिडकारण्याची ताकद भाजपमध्ये निर्माण झाली आहे. नड्डा अचानक थेट संघावर कसे बोलू लागले? एकतर भाजप आणि संघ यांच्यामध्ये काही तरी बिनसले असावे किंवा संघाने आपल्या कारभारात लुडबूड करू नये, असे मोदींना वाटत असावे. पूर्वी भाजप कमकुवत असल्यामुळे संघाच्या मदतीची गरज होती. आता संघाविनाही भाजपला राजकीय निर्णय घेता येतात, या विधानाचा अर्थच असा निघतो, की संघाने आता आम्हाला सल्लाही देऊ नये. त्यामुळे नेहमी अनेकांना कमी लेखण्याची किंवा लाथाडण्याची भूमिका घेणार्या भाजपने संघालादेखील कमी लेखायला सुरुवात केली आहे. मोदी-शहा यांच्या आदेशाशिवाय पक्षात काहीही घडू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. एखाद्याने बंडखोरी करायचा प्रयत्न केला, तर त्याची रवानगी ‘मार्गदर्शक मंडळा’त करण्यात येते. एकदा का ती व्यक्ती मार्गदर्शक मंडळात गेली, तर सर्वजण मिळून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपोआपच त्यांची ताकद कमी होऊन त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊन जातो. अशावेळी मोदी, शहांच्या विरोधात भूमिका घेणे कुणालाही जमलेले नाही. आता संघ काय भूमिका घेतो यावर पुढील राजकारण अवलंबून राहील. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांची फक्त हजेरी जाणवली होती.
संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह संघाच्या विचारांचे कार्यकर्ते पाठीशी नसते, तर बाबरी मशीद पडली असती का? या प्रश्नाच्या खोलात जाण्यासही आता भाजपला वेळ नाही. ज्यांच्यामुळे राम मंदिर उभारले गेले ते दुर्लक्षित होऊन मंदिराच्या उभारणीचे सर्व श्रेय फक्त मोदींनाच देण्याचा घाट भाजपमध्ये घातला गेला होता, त्याचवेळी भाजप व संघात काहीतरी घडते याची जाणीव झाली होती. यापूर्वी भाजपाची संघाकडे दुर्लक्ष करण्याइतकी ताकद नसल्याने ‘संघ सांगेल ती पूर्व दिशा’, अशी मोदींची भूमिका होती. नड्डांच्या विधानातील गांभीर्य संघ्ााने गंभीरपणे घेतले की नाही, याचा खुलासा येत्या काही दिवसांत होईलच; पण जाहीरपणे त्याची वाच्यता होणार नाही. कारण संघाची तशी पद्धत नसते. संघाच्या काठीचा आवाज भल्याभल्यांना आला नाही, तिथे मोदी, शहा, नड्डा यांची काय बिशाद असणार आहे? मोदींना जागतिक पातळीवरचे नेते व्हायचे आहे, त्यामुळे येथून पुढे ते संघाच्या मर्जीनुसार कसे चालतील? त्यामुळे संघाला आता त्यांची जागा दाखवायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे दोन टप्प्यांतील मतदान बाकी असताना नड्डांनी केलेले विधान धाडसीच म्हणावे लागेल!
प्रा. जयंत महाजन
९४२०६९१४२०