राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या स्थापनेपासून कायम सत्तेत राहिलेला पक्ष आहे, सत्ता असेल तर विकासकामे अधिक गतीने होतात आणि ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच आमदारांना मान्य होती, त्यामुळेच ठाकरे सरकार गडगडल्यावर भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची इच्छा राष्ट्रवादीच्या सगळ्याच आमदारांनी व्यक्त केली होती, आज काही लोक त्या भूमिकेला विरोध करीत असले तरी त्यावेळी आपल्याच दालनात लिहिलेल्या पत्रावर या सगळ्यांच्याच स्वाक्षर्या होत्या, असे सांगत अजित पवारांनी आपली भूमिका योग्यच आहे आणि भविष्यात शरद पवार गटात असलेले आमदारही आपली भूमिका मान्य करतील आणि एकत्र येतील, अशी आशा व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील का, या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी एकत्र येण्याची शक्यता अगदीच फेटाळून लावली नाही, फक्त सगळे एकत्र आले तर ते आपल्या नेतृत्वाखाली येतील, असे त्यांचे म्हणणे आहे.
यातील महत्त्वाचा भाग विकासासाठी सत्ता हा तर्क आहे. या पृष्ठभूमीवर उद्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली किंवा अजित पवार गटाचे आमदार त्या बाजूने गेले तर सत्ता स्थापन करता येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली तर उद्धव ठाकरेंनी केली त्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाच्या तडजोडीवर अजित पवार पुन्हा वेगळी भूमिका घेतील का, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. सत्ता महत्त्वाची हा विचार जिथे अधिक प्रभावी ठरतो तिथे राजकीय विचारधारा वगैरे गोष्टी गौण ठरतात, किमान अजित पवारांच्या संदर्भात तरी हे विधान सत्य आहे.
त्यामुळे उद्या तशी परिस्थिती निर्माण झालीच तर आज अजित पवारांसोबत असलेले आमदार िंकवा त्यावेळी त्यांच्या गटात असलेल्या आमदारांनी आता आपण पुन्हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला हवे, अशी भूमिका घेतली तर त्यांना रोखण्यासाठी अजित पवारांकडे कोणताही तर्क नसेल. विकासासाठी सत्तेसोबत सगळ्यांनी एकत्र यायला हवे, असा तर्क देत आज शरद पवारांसोबत असलेल्या आमदारांनी विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करणार्या अजित पवारांना त्यांचा हाच तर्क उद्या परिस्थिती बदलली तर अडचणीत आणू शकतो. शेवटी सत्ता महत्त्वाची म्हटली की झेंड्याला असा कितीसा अर्थ उरतो?