आम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून मिरवत असू, तर आम्हाला आमचे चारित्र्य नीट ठेवावेच लागेल. निष्कलंक राहावे लागेल, कारण शेवटच्या घटकाचा सत्य आवाज आपण आहोत ही जाणीव ठेवणे आवश्यक आहे. ज्यांचा आवाज कोणीही नसतो त्यांचा आवाज माध्यमे असतात हे आम्ही रोज रोज लक्षात ठेवून काम करणे आवश्यक आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात माध्यमांची भूमिका अनन्यसाधारण अशी राहिली आहे. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण माध्यमांकडे मोठ्या आशेने पाहतो. माध्यमांमुळे कोणत्याही सरकारवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवता येते हे सर्वश्रुत आहे. माध्यमांमुळे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित या सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे सहकार्य होत असते. जिथे सरकार, शासन, प्रशासन एखाद्याला न्याय देऊ शकत नाही त्यावेळी त्या व्यक्तीला माध्यमांची आठवण होते. कारण माध्यमांमध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर अथवा प्रसारित झाल्यानंतर किंवा प्रक्षेपित झाल्यानंतर त्या बातमीच्या परिणामस्वरूप त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या संस्थेला न्याय मिळण्याची अधिक शक्यता असते. किंबहुना असा विश्वास प्रत्येकाच्या मनात असतो. त्यामुळे माध्यमांकडे समाज एक शस्त्र म्हणून पाहत असतो. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर माध्यमाने बजावलेल्या भूमिकेमुळे शाश्वत विकासाच्या अनुषंगानेही शासन दरबारी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागले. अनेक वेळा शासनाला नमते घेऊन किंवा चार पावले मागे येऊन विचार करावा लागला. अनेक निर्णय मागे घ्यावे लागले. समाजकारणात, राजकारणात, अर्थकारणात आणि देशाच्या प्रत्येक विकासाच्या घटकात नेहमीच माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण अशी राहिली आहे. त्यामुळे माध्यम हा समाजाचा खरा आरसा असतो, असे म्हटले जाते. समाजाचा हा खरा आरसा किंवा प्रतिमा अलीकडच्या काळात काही अंशी मलिन झाल्याचे पहावयास मिळते.
मीडियाला यापूर्वी कधीही कोणीही नाव ठेवले नव्हते; परंतु अलीकडच्या दहा वर्षांच्या काळात माध्यमांना गोदी मीडिया म्हणून हिणवले जाते. यापूर्वी कधीही माध्यमांची इतकी थट्टा झाली नव्हती, तितकी थट्टा या दहा वर्षांमध्ये होते आहे. खास करून इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या बाबतीत ही थट्टा अधिक उघडपणे केली जाते. गोदी मीडिया म्हणून हिणवले जाते. सरकारची बटिक म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियाची मस्करी केली जाते. त्यांचा अवमान, अपमान केला जातो. खरे तर हा अपमान, अवमान, ही थट्टा लोकशाहीची आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण लोकशाहीला बळकटी देण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी, जनतेचा खरा आवाज म्हणून माध्यमे काम करत असतात. ही पृष्ठभूमी लक्षात घेता गोदी मीडिया हा कलंक आम्हाला का लागला? याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.
ज्या ध्येयाने प्रेरित होऊन, ज्या उद्देशासाठी माध्यमे अस्तित्वात आली, तो उद्देश भांडवलशाही मालकांमुळे बाजूला सारला गेला काय? हा प्रश्न सर्वसामान्यांनाही भेडसावतो आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात कधी नव्हे, इतकी माध्यमांची बदनामी होत असतानाही माध्यमे आत्मचिंतन करण्यास तयार नसल्याचेही दिसून येते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांबाबत जनतेच्या मनात असलेले मत आणि पत्रकारांच्याबाबत जनतेच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा निश्चितच चांगली आहे असे वाटत नाही. काही बोटावर मोजता येतील इतकी दैनिके आणि एखादे न्यूज चॅनल सोडले, तर बाकी सर्वत्र गोदी मीडिया म्हणून वावर होत असताना सर्वसामान्यांकडून होणारी टीका निश्चितपणे माध्यमांसाठी आणि माध्यमांच्या भवितव्यासाठी चांगली नाही, हे मात्र खरे.
माध्यमे; खरेतर विरोधी पक्ष म्हणून काम करायला हवीत, असाही एक मतप्रवाह आहे. कदाचित हे सत्यही असेल. शासनाला, प्रशासनाला सर्वसामान्यांच्या विकासाचा विसर पडतो. जिथे काही गोष्टी कमी पडतात, जिथे अत्याचार, अन्याय होतो त्या ठिकाणी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून मूकनायक होण्याची भूमिका माध्यमांनी बजावली आहे आणि ती सक्षमपणे पार पाडली आहे. याच मूकनायकामुळे समाजात, शासन दरबारी अनेक बदल झाल्याचे आपणास दिसून येते; परंतु गेल्या दहा वर्षांच्या काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर होत असलेले आरोप, त्यांना लागत असलेले कलंक हे निश्चितपणे विचार करण्यासारखे आहेत. खरेच माध्यमे विकलीत का? खरेच भांडवलशाही मालकांनी माध्यमांची गळचेपी केली का? माध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी सरकार करते आहे का? सरकारला माध्यमे मुठीत हवी आहेत का? एवढेच नाही तर माध्यमांच्या माध्यमातून सरकार आपल्या खोट्या भूमिका खरे ठरवते आहे का? याचाही आता विचार होण्याची गरज आहे. माध्यमांनी आपली सद्विवेकी बुद्धी जिवंत ठेवून काम करावे ही सर्वसामान्यांची अपेक्षा कोण धुळीस मिळवत आहे? याचाही विचार होणे आवश्यक आहे. बरे हे सगळेच पैशासाठी करत असाल, तर इतका पैसा कमावूनही आपण मरणार आहोतच हेही आपण विसरत चाललो काय? कारण मृत्यूनंतर फुटकी कवडी आपल्यासोबत येत नाही हे अंतिम सत्य माहीत असतानाही आपली लालसा संपत नाही.
माध्यमे धर्मांध नसावीत. माध्यमे लोकमताचा आधार ठेवणारी असावीत. लोकविकासासाठी सरकारशी भांडणारी असावीत. क्वचित वेळी सरकारच्या चांगल्या कामाची स्तुतीही करणारी असावीत; परंतु ती कलंकित नसावीत हा सर्वसामान्य विचार भांडवलदारी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी गुंडाळून ठेवला आहे, अशी जाहीर टीका होत आहे. त्यामुळे आम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून मिरवत असू, तर आम्हाला आमचे चारित्र्य नीट ठेवावेच लागेल. निष्कलंक राहावे लागेल, कारण शेवटच्या घटकाचा सत्य आवाज आपण आहोत ही जाणीव ठेवणे आवश्यक आहे. ज्यांचा आवाज कोणीही नसतो त्यांचा आवाज माध्यमे असतात हे आम्ही रोज रोज लक्षात ठेवून काम करणे आवश्यक आहे. अन्यथा पैसा कमावण्याच्या नादात आम्ही आमच्या हाताने लोकशाहीचा गळा घोटणारे हात ठरलो, तर गोदी मीडिया म्हणून लागलेला कलंक खराच होता असे म्हणावे लागेल. बाकी याहून जास्त सांगण्याची गरज नसेलच, कारण आपण सर्वज्ञानी आहोत.
राम तरटे
८६००८५२१८३
email: tarteram12@gamil.com