लग्नाबाबत तरुणाईत निर्माण होणारा तणाव हा एक गंभीर प्रश्न आहे. त्यासाठी कुटुंब, समाज आणि व्यावसायिक समुपदेशकांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. त्यांच्या मनातील भीती दूर करून, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि समर्थन दिल्यास ही समस्या कमी होऊ शकते.
मागील आठवड्यात ‘निमित’ नावाच्या एका तरुणाचा फोन आला. उच्चशिक्षित आणि प्रगल्भ असलेल्या निमितचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते; पण त्याच्या चेहर्यावरील काळजीचे भाव मात्र नजरेतून निसटले नाहीत. त्याला मोकळेपणा वाटावा आणि निसंकोच संवाद व्हावा यासाठी मी प्रयत्नशील होतो; पण नव्या पिढीचा तो प्रतिनिधी असल्याने त्याने थेट विषयालाच हात घातला. ‘आय यम इन अ रिलेशनशिप, पण मला लग्न करायचं नाहीये. भांडणं होतात आमची; पण ती खूप छान आहे. माझं प्रेम आहे, तिचाही माझ्यावर जीव आहे; मात्र लग्न करण्याचं धाडस होत नाही,’ निमितने एका दमात सगळंच सांगितलं. निमितच्या बोलण्यातून त्याच्यावर लग्नासाठी येत असलेल्या दबावामुळे तो प्रचंड तणावात आहे, हे माझ्या लक्षात आलं होतं. हे काही पहिलंच प्रकरण नव्हतं. मागील काही वर्षांत ‘लग्न करायचं नाही’, असं ठरविलेल्या अनेक तरुण- तरुणींना मी भेटलो आहे. नव्या पिढीतील कित्येक मुलं-मुली रिलेशनशिपमध्ये जातात; पण लग्न करायला धजावत नाहीत, हे एक गंभीर वास्तव आहे. हळूहळू हा प्रश्न आणखी वाढतच जात असल्याचे दिसते. कारणे आणि त्यांच्या मुळाशी असलेल्या गोष्टी: अनेक मुलं-मुली अशा कुटुंबात वाढलेली असतात जिथे पती-पत्नीचे सतत भांडणं, विकोपाचे वाद आणि नकारात्मकता असते. अशा ताणतणावाच्या वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये लग्नाबाबत नकारात्मक भावना निर्माण होतात. त्यांना भीती वाटते, की त्यांचेही वैवाहिक जीवन असेच असणार.
नव्या पिढीतील मुलांना, विशेषतः
मुलींना स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे वाटते. तरुणाईमध्ये करिअरची प्रचंड आवड आहे. अनेकांना वाटते, की लग्न केल्यावर त्यांच्या करिअरमध्ये अडथळे येतील. त्यांना त्यांच्या ध्येयामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित करायचे असते. त्यांना आपल्या निर्णयांवर, स्वतःच्या आयुष्यावर स्वतःचा हक्क, स्वतःचे नियंत्रण हवे आहे, असे वाटते. लग्न हे त्यांना त्यांचे स्वातंत्र्य गमावण्याचे एक कारण वाटते. आपल्याच जन्मदात्यांना ज्या भयंकर स्वरूपात आयुष्यभर बघितलेले असते, अशा पती-पत्नीच्या नात्यात कधी प्रेम फुलू शकते, यावरच त्यांचा विश्वास बसत नाही.
जगभरातील आणि भारतातील आकडेवारी:
२०२१ मध्ये करण्यात आलेल्या जागतिक सर्वेक्षणात असे आढळून आले, की १८-३४ वयोगटातील ४५टक्के लोकांना लग्नाच्या संकल्पनेत स्वारस्य नव्हते किंवा ती संकल्पना त्यांच्या जीवनाच्या ध्येयाशी जुळत नाही असे वाटत होते. भारतातील आकडेवारी पाहता, २०१८ च्या एका सर्वेक्षणात २५-३५ वयोगटातील ४०टक्के पेक्षा जास्त व्यक्तींनी लग्नाला स्थगित करण्याचे कारण म्हणून करिअर आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे महत्त्व दिले. राधिका आणि अरविंद हे एक लक्षात राहण्याजोगं जोडपं रेल्वेच्या लांबच्या प्रवासात भेटलेलं. दोघेही आयटी क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी सात वर्षांपूर्वी रिलेशनशिप सुरू केली. ‘एकमेकांवर आमचं खूप प्रेम आहे; पण लग्नाचं ओझं आमच्या स्वातंत्र्यावर येईल त्यामुळे अद्याप आम्ही लग्नाचा निर्णय घेऊ शकलेलो नाही. आम्हाला आमच्या करिअरमध्ये पुढे जायचं आहे आणि लग्नामुळे अडथळे येतील असं वाटतं,’ असं स्पष्टपणे दोघांनीही निसंकोचपणे सांगितलं.
दुसरे उदाहरण संदीप आणि प्रियाचे. दोघंही एकत्र राहतात; पण त्यांनी लग्न करण्याचा विचार सोडला आहे. ‘आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत; पण लग्नाच्या बंधनामुळे तणाव वाढेल अशी भीती वाटते,’ संदीप म्हणतो. ‘आम्हाला आमच्या नात्याचा आनंद घ्यायचा आहे, ताण-तणाव नकोत. आमच्या आई-वडिलांकडे बघून तरी आम्हाला असेच वाटते,’ असे प्रियाने सांगितले. लग्नाबाबत तरुणाईत निर्माण होणारा तणाव हा एक गंभीर प्रश्न आहे. त्यासाठी कुटुंब, समाज आणि व्यावसायिक समुपदेशकांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. त्यांच्या मनातील भीती दूर करून, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि समर्थन दिल्यास ही समस्या कमी होऊ शकते. नवीन पिढीचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांच्या निर्णयांचा आदर करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील असणे अत्यावश्यक आहे. आणखी यासंबंधी काय उपाययोजना करता येतील हे पुढील लेखात पाहू या!
मनोज गोविंदवार
८८३०४७८७३५
manojgovindwar@gmail.com
पालक समुपदेशक, जळगाव