Wardha crime :- जिल्ह्यात पोलिसांनी अचानकपणे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम राबविली. त्यामध्ये विक्रमी कारवाई करत १६० गुन्ह्यांत १ कोटी ९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारू (Illegal liquor) विक्रेत्यांवर वर्धा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केल्याने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
अवैध दारु गाळणारे व पुरवठादारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले
सतत पाऊस येत असल्याचा फायदा घेवून अवैधरित्या दारुचा व्यवसाय करणार्यांनी अवैध दारु तयार करण्याकरिता गावाबाहेर, जंगल शिवारात, जाण्या-येण्यास अडचणीचे ठिकाणी गावठी दारुच्या मोठ्या प्रमाणात भट्ट्या लावल्यात. याबाबत पोलिसांनी गोपनियरित्या माहिती काढून अशा ठिकाणावर मागील पाच ते सहा दिवसापासून लक्ष केंद्रीत करुन गुप्तरित्या पाळत ठेवण्यात आली. अवैध दारु गाळणारे व पुरवठादारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले. जिल्ह्यात आगामी गणेश उत्सव व गणेश विसर्जन सणानिमित्त वर्धा पोलीस दल (Wardha Police Force) बंदोबस्तात व्यस्त असल्याचा अवैध दारुविक्रेत्यांना समज निर्माण झाल्याने अवैध दारु विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारु गाळण्याच्या भट्ट्या तयार केल्याने त्यांच्यावर अचानकपणे कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. ३० ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजतापासून अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखेचे व इतर शाखेचे असे ६२६ पोलीस अंमलदार यांची १९ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार करुन गावठी दारुभट्टीच्या ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.
त्यामध्ये जिल्ह्यात १६५ आरोपींवर १६० गुन्हे दाखल करुन १ कोटी ९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत नाश करण्यात आला. या कारवाईत नवीन कायद्याप्रमाणे ‘ई’ साक्ष अॅप्लीकेशनचा वापरुन तांत्रीक पुरावे गोळा केले. पोलीसांनी येणा-या गणेश विसर्जन सणामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहणेकरिता व दारु विक्रेत्याकडून कोणतेही व्यत्यय येणार नाही म्हणून अचानकरित्या मोहीम राबविली. पोलीसांच्या कारवाईमुळे अवैधरित्या दारु तयार करणारे, पुरवठादार व विक्रेते यांचे धाबे दणाणले आहे. भविष्यात सुद्धा कोणत्याही उत्सवात व्यत्यय निर्माण होऊ नये व सर्व सण-उत्सव शांततेने पार पाडण्याच्या उद्देशाने अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल.




