हिंगोली(Hingoli):- गोवंश जनावरे वाहनातून कत्तलीसाठी नेण्यात येत असताना १४ जुलैला पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत १२ गोवंश जनावरे पकडून चौघांवर गुन्हा दाखल केला.
चौघाविरुद्ध हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली तहसील कार्यालया समोरून पीकअप वाहन क्रमांक एम.एच.२७-एक्स.४४२५ यामधून ५७ हजाराचे पाच गोवंश जनावरे (Bovine animals)कत्तलीसाठी नेण्यात येत होते. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसात अजहरूजमा पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख वहीद शेख मुख्तार रा.बागवानपुरा वाशिम, बबन लोडजी निरगुडे रा.लिंबाळा प्रवाह ता.जि. हिंगोली या दोघांवर गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे हिंगोली शहरातील रिसाला बाजार रेल्वे पुलासमोरील निर्मल जिमच्या समोरील रस्त्यावर हिंगोली शहर पोलिसांनी (City Police) पीकअप वाहन क्रमांक एम.एच.०४- जी.सी. ९५१० यामधून कत्तलीसाठी नेण्यात येणारे ७ गोवंश जनावरे ७७ हजाराचे ताब्यात घेतले.
दोघांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसात संतोष करे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख सलीम शेख गफूर रा.इनामदारपुरा वाशिम, मोहंमद एजाज मोहंमद जब्बार रा.वाशिम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेवाळ, जमादार अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, संतोष करे, गणेश लेकुळे, संजय मार्के, अजहर पठाण, विलास वडकुते, संजय तोडेवाले यांनी या कामगिरीमध्ये सहभाग नोंदविला.